राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना सभागृहातील बत्तीगुल; रोहित पवार म्हणाले…
बुधवार, 21 डिसेंबर 2022 (08:36 IST)
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुर येथे सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असतांनाच सभागृहात बत्तीगुल झाली. त्यामुळे सभागृहामधील सर्वांना वीज गेल्यावर कशी समस्या निर्माण होते, याचा अनुभव आला. वीजेच्या समस्येमुळे तब्बल ५० मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आले. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाचा वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाज देखील बंद पडले. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावे लागते! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांना आणि निधीला स्थगिती देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जुंपली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर झालेल्या अनेक कामंना स्थगिती दिल्याचा दावा केला आहे. यावरुन सभागृहामध्ये विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. बजेटमध्ये मंजूर झालेली कामे होती, ही महाराष्ट्रामधील कामे आहेत. ही काही कर्नाटक आणि गुजरातची कामे नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे. तसेच आम्ही अनेक सरकार बघितली, मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार बघितले, देवेंद्रजी तुमचे देखील सरकार ५ वर्ष बघितले. सरकार येतात-जातात, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या सात-सात टर्म झाल्या आहेत. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामे कधी थांबली नव्हती, असा घणाघात अजित पवारांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले…
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा मांडला, पण मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही सात-सात वेळा निवडून आले असाल, आम्ही कमी निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी तुम्ही आमची सगळी कामे रोखली, माझ्या मतदारसंघातील कामे तुम्ही रोखली. अनेक वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
तसेच, ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू आणि कुणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असे ही फडणवीस म्हणाले.