'भ्याड हल्ल्याचा भ्याडपणा' जीवाच्या मुंबईचा जातोय जीव..

WD
देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या मुंबईत २६ नोव्हेंबरला अतिरेक्यांनी पुन्हा एकदा (नव्हे दुसर्‍यांदा) असा हल्ला करून अतिरेकी भ्याडपणा सिध्द केला. भ्याडपणाला सुध्दा लाजवेल अशी भ्याड कृत्त्य करून मुंबईसह संपूर्ण देशाची झोप उडवली आहे.

देशातल्या निरनिराळ्या भागातून दररोज हजारो नागरीक मुंबईला जीवाची मुंबई करण्यासाठी भेट देतात. अहोरात्र राबता असणार्‍या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर झालेल्या हल्ल्यात गावी परतणारे, घरी परतणारे अनेक जीव मारले गेले असतील. कुठेतरी शासनाने आता अतिरेक्यांना खरोखर शासन करण्याची वेळ आली आहे. आता नागरीकांच्या सहनशक्तीचा सुध्दा अतिरेक झाला असून केवळ आपसात हेवे-दावे न करता, राजकारणी मंडळींनी एकत्र येऊन देशहितासाठी अतिरेक्यांचा समूळ बिमोड करणे आवश्यक आहे. अन्यथा अतिरेकी आपले इप्सित सहजगत्या साध्य करू शकतील.
काही वर्षांपुर्वी मुंबईमध्ये बॉ़म्बस्फोटाची मोठी मालिका अतिरेक्यांनी करून देशाला हादरवून सोडले होते. त्यात संबंधितांवर खटले भरून शासनाने आपली जबाबदारी पार पाडल्याचे सूतोवाच केले, अगदी आता-आतापर्यंत मुंबई बॉम्बस्फोटासंदर्भात न्यायालयीन कामकाज सुरू होते. पण हाती काय लागले? काळ, वेळ आणि पैसा यांचा अपव्ययच केवळ झाल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून वाटत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. खर्‍या दोषींना शासनाने शिक्षा ठोठावण्यात मागेपुढे पाहू नये, घटना घडविताना अतिरेकी केवळ त्यांच्या इप्सितासाठीच काम करतात, अतिरेकी हल्ल्यात शहीद होणार्‍या अधिकारी, बळी जाणार्‍या निरपराध नागरीकांचा ते विचार करीत नाहीत.. मग, का म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगावी? अशा अतिरेक्यांना न्यायदेवतेने शिक्षा ठोठावताना, "काळ सुध्दा विचार करेल अशी शिक्षा ठोठावण्याची वेळ आता आली आहे.

देशाच्या सुरक्षा यंत्रणेचे करावे तेवढे कौतुक थोडेच...! आपल्या सुरक्षा यंत्रणेने करायचे तेवढे प्रयत्न केले आहेत, त्वरीत कारवाईसाठी पावले उचलल्याबद्दल संभाव्य हानी तरी टळली. किंबहुना अनेकदा सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर खात्याकडून आधी सूचना देखील दिल्या जातात, मात्र त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. एकदा काय तो सोक्ष-मोक्ष लागून जाऊ द्या..अशी प्रतिक्रिया सामान्य नागरीक व्यक्त करतोय, आणि त्यात तथ्य सुध्दा वाटू लागले आहे. वारंवार होणार्‍या अशा भ्याड हल्ल्ल्यांपेक्षा एकदाच काय ते होऊन अतिरेक्यांचा आणि शत्रूंचा बिमोड करून देशाला शासनाने सामान्य नागरिक मोकळ्या मनाने फिरू शकतील, शांतता प्रस्थापित होईल याचे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अतिरेकी कुठून आले याचा विचार न करता, पुन्हा अशा घटना केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशात घडणार नाहीत यादृष्टीने सुरक्षायंत्रणांनी दक्ष रहाण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा