शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही!

गुरूवार, 11 जुलै 2019 (17:00 IST)
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? त्यामुळे नेमके होते तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण समजा आपले डोळे कानाच्या जागी असते, कानाच्या जागी मान असती, नाक गुडघ्यांवर असते तर काय झाले असते? शरीर विकृत दिसले असते. बरोबर ना. वास्तुशास्त्राचेही तसेच आहे. वस्तूची नेमकी जागा, तिची लाभदायकता याविषयीचे योग्य मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते. 
 
हे शास्त्र वैज्ञानिक आहे. मध्ययुगात सुप्तावस्थेत असलेल्या या शास्त्राला आता एकवीसाव्या शतकात चालना मिळाली आहे. एकाएकी याची चर्चा होण्याचे कारण काय? कारण त्याला चालना मिळण्याची ही वेळ ठरली होती. वास्तुच्या बाबतीत हे शास्त्र फार महत्त्वाचे आहे. देशातील अनेक मंदिरे, प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंवर या शास्त्राचा प्रभाव आहे. वास्तूंमधील गुणदोषामुळे अनेक चमत्कारिक बाबी घडत असतात, त्याची कारणेही आपण देऊ शकत नाही. एखाद्या मोडकळीस आलेल्या घरात रहाणारा माणूस कोट्यधीश बनतो आणि कोट्यधीश माणसाचे दिवाळे निघते, असे नेमके का होते, हे आपल्याला कळत नाही. याचे कारण वास्तुशास्त्र आहे. 
 
हे शास्त्र म्हणजे कुठले रहस्य नाही. स्पष्ट शब्दात दिलेली उत्तरे आहेत. वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते. ब्रह्मांड असेल, नक्षत्रे असतील, ग्रह असतील तर वास्तुशात्रसुद्धा आहेच. 
 
आपण नेहमी पाहतो, काही घरातील कर्ता पुरूष किंवा स्त्रीचा अचानक मृत्यू होतो. काहींच्या घरात नेहमी आजारणपणे चालत असतात. काहींची वंशवेल खुरटलेली असते. काही घरांत नेहमी पती-पत्नीत भांडणे होतात. काहींची मुले दिवटी निघतात. हे सगळे कशामुळे? याचे कारण वास्तुदोष आहे. 
 
तुम्हाला माहितीये? ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील पुरूष साठ वर्षांहून अधिक काळ जगत नाही. हा त्यांच्यातील शारीर दोष नाही. ग्वाल्हेरच्या राजवाड्यात असा कोणता तरी दोष असेल, ज्यामुळे पुरूषाचा मृत्यू लवकर होतो. हा निकष उचलली जीभ लावली टाळ्याला असा नाही. याबाबत वेदात, पुराणातही काही संदर्भ सापडतात. इसवी सन 1480 मध्ये उदयपूरचे राजे कुंभकर्ण यांच्या काळात श्रीमंडन याने वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिला होता. त्यावर 1891 मध्ये राजवल्लभ नावाचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते. हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक मानले जाते. पृथ्वीवरील चुंबकीय प्रवाह, दिशा, सूर्याची किरणे, वाऱ्याची दिशा, गुरूत्वाकर्षण या साऱ्यांचा वास्तुशास्त्रात विचार केल्याचे या ग्रंथात म्हटले आहे. राजवल्लभशिवाय मयशिल्पम, शिल्प रत्नाकर, समरांगण सूत्रधार हे दुर्मिळ ग्रंथही वास्तुशास्त्रासंदर्भात महत्त्वाची माहिती देतात. अथर्ववेद, यजुर्वेद, भविष्य पुराण, मत्स्यपुराण, वायूपुराण, पद्मपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, गर्ग संहिता, नारद संहिता, सारंगधर संहिता, वृहत संहिता यातही वास्तुशास्त्राविषयी बरीच माहिती मिळते.
 
वास्तुशास्त्र काय सांगते? तर प्रत्येक वस्तूचे स्थान काय आहे, ती कुठे असायला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन करते. घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोपऱ्यात असावे. पूजेची खोली वा स्थान उत्तर- पूर्व कोपऱ्यात हवे. बेडरूम दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात हवी. पाहुण्यांची खोली व मुलांची खोली उत्तर पश्चिम कोपऱ्यात हवी. पहिल्या खोलीतील बैठक उत्तर-पूर्व बाजूला हवी. झोपताना डोके दक्षिण वा पूर्वेला हवे. याला काही कारणेही आहेत. पूर्वेला सूर्याचे स्थान आहे. तो स्थिर आहे. दिवसभर थकल्यानंतर आपण झोपतो तेव्हा सूर्याची ऊर्जा आपल्या मेंदूला मिळते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करण्याची शक्ती आपल्यात उत्पन्न होते. जे डोके उत्तर किंवा पश्चिम दिशेला करून झोपतात ते नेहमी आजारी, रोगी, निराश मनःस्थितीत आढळतात. 
 
वास्तुशास्त्राची काटेकोर अंमलबजावणी नवी वास्तू बांधतानाच होऊ शकते. याचा अर्थ सध्या अस्तित्वात असलेली वास्तू या शास्त्रास अनुकूल करता येत नाही, असे नाही. सुख, समृद्धी, समाधान हवे असल्यास घर, दुकान यात अनुकूल बदल केले पाहिजे. त्याचवेळी वास्तुशास्त्र म्हणजे लॉटरीचे तिकिट नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे तिकिट लागले की जो धनलाभ होतो, तसाच लाभ लगेचच बदल केल्यानंतर मिळतो असे नाही. तो हळूहळू जाणवू लागतो. अनुकूल वास्तूरचना झाल्यानंतर आपल्य मनात सुख, समाधान या भावना वास करू लागतील. आनंद, उत्साह आपल्या आयुष्यात येतील. नवी ऊर्जा मिळेल. कोणतेही काम हाती घेतल्यास यश लाभेल. हे बदल हळूहळू जाणवतील. वास्तुशास्त्र पाळल्यास ही फळे मिळतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती