घरात असावे एक मंदिर

ND
प्रत्येकाला वाटते की आपले एक घर असावे. त्यात आवश्यक त्या सर्व वस्तू असाव्यात. परंतु, हे स्वप्न पाहत असताना घरात सुख शांती नांदावी म्हणून विधात्याचे म्हणजेच परमेश्वराचे एक छोटेसे मंदिर असायला पाहिजे. तरच घराला घरपण येते. घरात परमेश्वराचा फोटो, मूर्ती असायलाच हवी. मनात श्रद्धा असली तर घराच्या एका कोपर्‍यात छोटेसे देवघर असले तरी पुरे.

शहरात दोन खोल्यांचे घर मिळणे देखील कठीण असते. त्यात मोठे देवघर करणार कसे? असा प्रश्न पडतो. घर लहान असले तरी ते अधिक सुंदर कसे बनवता येईल, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. घर लहान असले तरी देवघर तरी असावे अशी इच्छा असणार्‍यांसाठी लहान 'रेडीमेड मंदिर' हा चांगला उपाय आहे. कमी जागेत त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो.

बाजारात लाकडी, लोखंडी तसेच संगमरवरी रंगबिरंगी सुंदर मंदिरे सहज मिळतात. आपल्या घरातील रचनेनुसार आपण देवघर तयार करून घेऊ शकतो.

लाकडी मंदिरे दिसण्यास आकर्षक व आर्थिकदृष्टीने फायदेशीर असतात. बाजारात सहजरित्या उपलब्ध होतात. बाभूळ, सागवान व प्लायवूडपासून ही मंदिरे बनवलेली असतात. लाकडावर अथवा प्लायवूडवर सनमाइका लावल्याने मंदिरे अधिक सुंदर दिसतात. लोखंडी मंदिरांच्या तुलनेत ती वजनाने हलकी असतात. घराचे बांधकाम करतानाच आपल्याला संगमरवरी फरशीचे मंदिर 'फिक्स' करावे लागते. कारण वजनाने जड अडल्याने त्याला इकडून तिकडे हालवता येत नाही.

घरातील दरवाजे व खिडक्या सनमायकाच्या आहेत तर सनमायकाचे मंदिर घराच्या आंतरिक सौंदर्यात नक्कीच भर घालेल. लाकडी अथवा लोखंडाच्या मंदिरावर तांब्याचा कळस लावल्याने त्याला पारंपरिक 'लुक'ही येतो.

ND
लाकडी मंदिराची किंमत त्याचा आकार व त्यावर करण्यात आलेल्या कलाकुसरीनुसार असते. तसेच लाकडाची जात व त्याचा टिकाऊपणा हाही त्यात महत्त्वाचा ठरतो.संगमरवरी मंदिरे राजस्थानी कारागीर तयार करतात. त्यांच्या किमतीबाबतही तसेच असते.

बाभळाच्या लाकडाचे व प्लायवूडचे मंदिर सागवानच्या लाकडाच्या मंदिराच्या तुलनेत स्वस्त मिळते. बाभळाच्या लाकडाचे छोटे मंदिर 60 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत तयार होते. तर तेच सागवानच्या लाकडाचे मंदिर 300 रुपयापासून ते 7000 रुपयापर्यंत मिळते. संगमरवराचे लहान मंदिर ऑर्डरनुसार तयार करायचे झाले तर ते दहा हजार रुपयाच्या पुढे तयार होते. आपण त्यात आणखी काही वेगळे करायला सांगितले तर त्याचे अतिरिक्त रुपये मोजावे लागतात.