एक मोठा उद्योगपती होता... अतिशय धनाढ्य... भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या त्यांच्याकडे होत्या... काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं...
एक दिवस ते गाडीमधून कंपनीत जाताना, त्याने ड्रायव्हरला रेडिओ लावायला सांगितला... कुठलं तरी अधलं -मधलं चँनेल लागलं... चँनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं... तो प्रवचक बोलत होता, "मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमवतो, ते सर्व काही म्रुत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं... तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही"...
या उद्योगपतीनी हे ऐकल्यावर तो एकदम अंतर्मुख झाला... एकदम सतर्क झाला...
त्याला एकाएकी जाणवलं...
डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला की, आपण जे काही प्रचंड वैभव उभारलं आहे, त्यातला एकही रुपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही... सर्वकाही इथेच सोडून जावं लागणार आहे...
त्याला एकदम कसंतरीच झालं... तो कमालीचा अस्वस्थ झाला.... ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली... बैठकीला झाडून सगळे सहाय्यक, सचिव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की, 'मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो... तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला तुम्ही नीटपणे, विचारपूर्वक सांगा'...
सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की, आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलतायेत!?... मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही... हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढिगभर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलतायेत... हे जमणार कसं?...
साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं... बक्षिसे जाहीर केली की, जो कुणी मला यासाठी १००% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन...
जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला... पण काही जमेना... प्रत्येकजण अथक प्रयत्न करत होता... पण उत्तर काही सापडत नव्हतं... बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होता... त्याला हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की, मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही?... म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं?... का?... मला न्यायचंय हे सर्व... जे मी मेहनतीने मिळवलंय... ते मला का नेता येऊ नये?... त्याला काही सुचेना...
मग त्यांनी यासाठी जाहीरात दिली... भलंमोठं बक्षीस ठेवलं... पण उत्तर सापडेना...
एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या ऑफिसमधे आला... 'साहेबांना भेटायचंय' म्हणाला...
बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं... तो म्हणाला, 'माझं नाव श्याम... मला तुम्हांला काही विचारायचंय... मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन'... बिझनेसमन म्हणाला,' 'विचार'... याने विचारलं की,' साहेब, तुम्ही अमेरिकेला गेलाय?'... 'हो... 'बिझनेसमन म्हणाला... 'खरेदी केलीये तिथे!?.... श्यामने विचारले... 'हो'... बिझनेसमन म्हणाला... 'पैसे कसे दिलेत'?... श्यामने विचारले... 'कसे म्हणजे?... आपले पैसे देऊन अमेरिकन डाॅलर्स विकत घेतले व दिले... बिझनेसमन उत्तरला...
बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात?... तिथे काय खरेदी केलीत आणि काय काय चलने वापरलीत?...
म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून करन्सी चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते... बिझनेसमन म्हणाला...
'म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत"... तर ते तुम्हांला देशानुरूप, जागेनुरूप बदलून घ्यावे लागतात... जिथे जिथे, जी जी करन्सी आहे, ती ती तुमच्याकडचे रुपये देऊन बदलून घ्यावी लागते... 'बरोबर' बिझनेसमन म्हणाला...
मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल... तिथे तुमचे रुपये कसे चालतील?... श्याम म्हणाला...
'मग?'... बिझनेसमनने कुतूहलाने विचारले... तिथे ही करन्सी चालणार नाही, कारण स्वर्गाची करन्सी आहे "'पुण्य"!,... आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल... मगच तुम्हाला ती वापरता येईल!...
तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला 'पुण्य' नावाच्या करन्सीमध्ये रूपांतर करून घ्यावे लागतील... मगच ती बरोबर नेता येईल... आणि तिथे वापरता येईल...
बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख प्रकाश पडला की, शेवटी बरोबर न्यायला 'पुण्यच' कमवायला हवं!...
इथली करन्सी अशीच रूपांतर करावी लागेल की, जी पुण्यांमधे रूपांतर होऊन मिळेल... असा काही विचार, वर्तन, आचरण करावं लागेल की, जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल...
बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं... तो श्यामच्या पायाच पडला... त्याला यथोचित बक्षीस दिले आणि त्याचा सत्कार केला... मनोमन ठरवलं की, या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे... मिळवलं आहे... ते आता 'पुण्य' नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरीत करून घ्याचचं... आणि ते शेवटपर्यंत करतच राहायचं... वरती जाताना घेऊन जायला एवढे पुरेसे आहे.