ग्लोबल मार्केट मध्ये सुरू असलेल्या घसरणीच्या विळख्यात भारतीय शेअर बाजारही अडकला आहे. पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात घसरणीने झाली. BSE सेन्सेक्स 2393.76 अंकांच्या घसरणीसह 78,588.19 अंकांवर उघडला, तर NSE निफ्टी 50 देखील 414.85 अंकांच्या घसरणीसह 24,302.85 अंकांवर उघडला. गेल्या आठवड्यात शुक्रवारीही शेअर बाजारात मोठी घसरण पाहावयास मिळाली. शुक्रवारी सेन्सेक्स 885.60 अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी 293.20 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.
सोमवारी जेव्हा भारतीय शेअर बाजार उघडले तेव्हा सेन्सेक्समधील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करताना दिसले, तसेच फक्त सन फार्मा आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.
तसेच शेयर मार्केट मध्ये आलेल्या या भयानक घसरणीमागे दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत. अपेक्षेपेक्षा वाईट यूएस नोकऱ्यांच्या अहवालामुळे मंदीचा धोका वाढला आहे. तर याशिवाय मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारही तणावात आहेत. यामुळेच गुंतवणूकदार आता शेअर बाजारातील शेअर्स विकून आपले पैसे काढून घेत आहेत, त्यामुळे बाजारात मोठी घसरण होतांना दिसत आहे.