'सेबीमार्फत शेअर मार्केट घोटाळ्याची चौकशी करा', इंडिया आघाडीची मागणी

बुधवार, 19 जून 2024 (15:34 IST)
लोकसभा निवडणूक निकालाच्याआधी शेअर मार्केटने अचानक उसळी घेतली. पण निकालानंतर मार्केट कोसळल्याने अनेक गुंतवणूकदारांना फटका बसला. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
 
या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी करावी अशी गांधी यांनी मागणी केलीय.
 
त्यानुसार मंगळवारी (18 जून) INDIA आघाडीचे नेते सेबीकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
सेबीनेही याबाबत चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. सेबीकडे तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
 
यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते.
 
तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
 
लोकसभा निवडणुकीआधीच्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाचे 300 हून अधिक खासदार निवडून येतील, असा अंदाज मांडला होता. त्यामुळे शेअर मार्केटने अचानक उसळी घेतली होती.
 
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालाआधी लोकांना शेअर्स खरेदी करण्यास प्रोत्साहित केले.
 
पण शेवटी मार्केट कोसळले. यात सामान्य लोकांचे पैसे बुडाले, असंही राहुल गांधी यांनी 6 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
 
या दरम्यान, भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांचे हे आरोप फेटाळले आहेत.
 
गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याची टीका गोयल यांनी केलीय.
 
शेअर बाजार कोसळल्याने जवळजवळ 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यत येत आहे.
 
नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांनी लोकांना 4 जूनपूर्वी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. भाजपचा विजय होणार आणि शेअर मार्केट आणखी वाढणार, असं भाजप नेत्यांनी म्हटल्याचा दावा गांधी यांनी केला होता.
 
मे महिन्यात शाह यांनी NDTVला एका मुलाखतीत म्हटलं की, "सध्याच्या शेअर बाजारातील घसरणीचा संबंध निवडणुकांशी जोडला जाऊ नये. अशा अफवा पसरवल्या गेल्या तरीही, माझ्यामते, 4 जून आधी तुम्ही काही शेअर्स खरेदी केले पाहिजेत. कारण ते वाढणार आहेत."
 
पण भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील 'सर्वात मोठा घोटाळा' झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
 
भाजप नेत्यांच्या या भूमिकांमुळे परदेशातील काही ठराविक गुंतवणूकदारांना फायदा झाला. यात भारतीयांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं कांग्रेसचं म्हणणं आहे.
 
6 जूनच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते खालीलप्रमाणे :
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला का लावली?
लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देण्याचं काम मोदींना कुणी दिलं?
मोदींनी ज्या दोन चॅनलला मुलाखती दिल्या, ते चॅनेल्स अदानींचे आहेत. त्यामुळे यामध्ये त्या चॅनलची भूमिका काय आहे?
एक्झिट पोल समोर आले आणि परदेशातील गुंतवणूक वाढली, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एक्झिट पोल यांचा काय संबंध आहे?
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती