वजन कमी करण्यासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरू शकतं धोकादायक, WHO चा इशारा

रविवार, 23 जून 2024 (08:06 IST)
वजन घटवणं (Weight Loss) याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. वजन घटवण्यासाठीचा असाच कुठलाही शॉर्टकट धोक्याचा ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
 
हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल. हे औषध कोणतं आहे? आणि WHOने त्याबद्दल काय म्हटलंय? हे सविस्तर आपण जाणून घेऊ.
 
ओझेम्पिक (Ozempic) हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला स्किनी जॅब (Skinny Jab) असंही म्हटलं जातंय.
 
पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्या इतर अनेक आवृत्त्याही बाजारात आल्यायत. याचविषयीचा खबरदारीचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.
 
बनावट ओझेम्पिकमुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
 
ओझेम्पिक काय आहे?
डेन्मार्कमधली नोव्हो नॉर्डिस्क ही कंपनी गेले शतकभर इन्सुलिन तयार करतेय.
 
2004 मध्ये सेमाग्लुटाईड (Semglutide) चा शोध त्यांनी लावला आणि कंपनीने झेप घ्यायला सुरुवात केली. या कंपनीचं ओझेम्पिक हे औषध खरंतर टाईप-2 डायबिटीससाठी वापरलं जातं.
 
पण याच इंजेक्शनचा वापर करून वजन घटवता येतं आणि हे हॉलिवुडचं वजन घटवण्यासाठीचं सिक्रेट असल्याच्या बातम्या झळकल्या आणि ओझेम्पिकसाठीची मागणी वाढली.
 
हे ओझेम्पिक GLP-1 म्हणजे ग्लुकोन लाईक पेप्टाईड -1 (Glucon-like Peptide-1) औषध आहे. यामध्ये semaglutides नावाचा घटक असतो.
 
हे औषध रक्तातील शर्करेचं प्रमाण कमी करतं. पण या सोबतच यामुळे पोटामधल्या अन्न पचन प्रक्रियाचा वेग कमी होतो आणि पोट भरलंय, असा संदेश मेंदूकडे गेल्याने भूक मंदावते आणि वजन घटण्यास मदत होते.
 
याचमुळे डायबिटीस नसणाऱ्या व्यक्तींनीही हे औषध विकत घ्यायला सुरुवात केली. टाईप - 2 डायबिटीससाठी हे औषध घेणाऱ्यांना ते मिळणं कठीण झालं.
 
वजन कमी करणारं औषध म्हणून ओझेम्पिक प्रसिद्ध झाल्यानंतर ते तयार करणाऱ्या नोव्हो नॉर्डिस्क कंपनीनेच लठ्ठपणावरील वेगोव्ही (Wegovy) नावाचं इंजेक्शन स्वरूपातलं औषध आणलं. या औषधांसाठीची मागणी इतकी वाढली की ती तयार करणारी ही डेनिश कंपनी 2023मधली युरोपातील शेअरबाजारात सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी (Most Valuable Listed Comapany) ठरली. इतकंच नाही तर डेन्मार्कच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा झाला.
 
त्यापाठोपाठ वजन घटवणारी इतरही काही औषधं बाजारात आली.
 
डेन्मार्क, जर्मनी, आईसलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, युएई, अमेरिका, युके आणि जपान सारख्या जगभरातल्या काही देशांमध्ये यापैकी काही औषधांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. पण या औषधांची किंमत जास्त असली तरी त्यांच्यासाठी असणारी मागणी प्रचंड आहे. म्हणूनच या औषधांचा काळाबाजार सुरू झालाय आणि सोबतच बनावट औषधं किंवा तेच परिणाम कमी किंमतीत मिळवून देण्याचं सांगणारी औषधं बाजारात आली आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटनेनं याचबद्दलचा इशारा दिला आहे. चुकीच्या वा छुप्या मार्गांनी मिळवलेली औषधं ही बनावट वा चुकीची असू शकतात आणि यामधल्या टॉक्सिक घटकांचे शरीरावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतात असा इशारा देण्यात आलाय.
 
बनावट ओझेम्पिक सापडल्याच्या बातम्या जगभरातून 2022 पासून येत असल्याचं WHO ने म्हटलंय.
 
भारतातही होतोय काळाबाजार
नोव्हो नॉर्डिस्कच्या ओझेम्पिक आणि वेगोव्ही या औषधांना भारतात मान्यता देण्यात आलेली नाही, त्यामुळे ती अधिकृतरित्या उपलब्ध नाहीत. भारतामध्ये याच नोवो नॉर्डिस्क कंपनीच्या गोळ्या उपलब्ध आहेत ज्यांमध्ये ओझेम्पिक आणि वेगोव्हीसारखेच घटक आहेत. पण ही गोळी इतर दोन इंजेक्शन्सइतकी प्रभावी ठरली नाही.
 
भारतातली लठ्ठपणाची समस्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेली आहे.
 
सरकारच्या आरोग्य आणि सामाजिक निर्देशकांचे सर्वात व्यापक घरगुती सर्वेक्षण असलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) च्या आकडेवारीनुसार, जवळपास 23% पुरुष आणि 24% महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स (BMI) हे 25 आणि त्याहून अधिक असल्याचं आढळून आलं आहे. 2015-16 च्या तुलनेत ही वाढ 4% ने जास्त आहे. तर पाच वर्षाखालील 3.4% मुले लठ्ठ असल्याचं आकडेवारी सांगते. 2015-16 मध्ये ही टक्केवारी 2.1% एवढी होती.
 
भारतामध्ये अनेक आजारांसाठीची इतर देशांत वापरली जाणारी औषधं उपलब्ध नाहीत. अशी औषधं योग्य प्रिस्क्रिप्शन्स आणि कागदपत्रांच्या सहाय्याने फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे औषधांचं वितरण करणाऱ्या कंपन्या परदेशातून मागवून घेऊ शकतात. या मार्गाचा वापर वजन घटवण्यासाठीची औषधं मिळवण्यासाठी भारतात केला जात असल्याचं आणि काळ्याबाजारातून ही औषधं घेण्यात येत असल्याचं ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय. परदेशातून येतानाही ही औषधं सोबत आणली जात आहेत.
भारतामध्येही या औषधांच्या चौकशीचं ती मागण्याचं प्रमाण वाढलंय, पण अशा मार्गांनी मिळवलेली औषधं फसवी वा बनावट असण्याचा मोठा धोका असल्याचं डॉक्टर्स सांगतात.
 
याविषयी बोलताना फॉर्टिस हॉस्पिटलचे जनरल फिजीशियन डॉ. मनीष इटोलिकर सांगतात, "शुगर कमी करण्याची जी औषधं असतात त्यामध्ये बऱ्याच वेळेस हेवी मेटल्स म्हणजे धातू असू शकतात. त्याचा परिणाम हा थेट किडनीवर किंवा लिव्हरवर होऊ शकतो. आणि नसांवर किंवा डोळ्यांवरपण होऊ शकतो. बऱ्यावेळेस वजन कमी करण्यासाठी जी औषधं असतात त्यामुळे डायुरिटिक्स म्हणजे लघवीतून वजन वा साचलेलं पाणी जाण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या मिश्रित असतात. ते अतिप्रमाणात वा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलंत, तरी शरीरावर परिणाम होऊ शकतो आणि वजन कमी होण्यासोबतच किडनीवर किंवा मांसपेशींवर फरक जाणवू शकतो. अशा औषधांमध्येही धातू वापरलेले असतात. ज्याचा परिणाम किडनी किंवा लिव्हरवर होऊ शकतो."
 
वजन घटवण्यासाठीच्या औषधांची (Anti Obesity Medications) जागतिक बाजारपेठ 2030 सालापर्यंत 100 बिलियन म्हणजेच 10,000 कोटी डॉलर्सच्या उलाढालीची असेल असं गोल्डमन सॅक्स रिसर्चनी त्यांच्या अहवालात म्हटलंय.
 
सध्या जागतिक बाजारपेठ उपलब्ध असणारी काही औषधं पुढच्या वर्षांत भारतात दाखल होतील. सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी, बायोकॉन, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससारख्या भारतीय बाजारपेठेतल्या कंपन्या त्यांची स्वतःची लठ्ठपणावरची वेट लॉस ड्रग्स - जेनेरिक ड्रग्स विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
 
वजन घटवण्याची औषधं घेणं थांबवल्यावर काय होतं?
वजन घटवण्यासाठी Wegovy औषध घेणाऱ्यांचं त्यांच्या एकूण वजनाच्या 10% पर्यंत वजन कमी झाल्याचं आढळून आलंय. पण सोबतच त्यातल्या काहींना मळमळणं, उलट्या होणं याचा त्रासही झाला.
 
औषध घ्यायचं थांबवल्यानंतर वजन पुन्हा वाढल्याचंही संशोधनात आढळून आलं.

Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती