कोरोनाची लस घेतलेल्यांना नवीन व्हेरियंटपासून किती संरक्षण मिळणार?
रविवार, 25 डिसेंबर 2022 (17:11 IST)
कोरोनाचे रुग्ण चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत वाढल्यानंतर भारतातही एका नवीन व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे सरकारने खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केलीय, प्रशासन सतर्क झालंय आणि पुन्हा मास्कची सक्ती होणार की काय, म्हणून तुमची-आमची काळजी वाढलीय.
पण अशात एक गोष्ट सगळेच विचारतायत, की मी मागे ती कोव्हिडची लस घेतली होती, आणि तो बूस्टर डोसही घेतला होता. त्याचं काय? या नवीन कोरोना व्हेरियंटपासून मी सध्या किती सुरक्षित आहे?
सुरुवातीला थोडक्यात नजर टाकू या आजवरच्या लसीकरण मोहिमेवर – ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लशींना मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2021मध्ये सरकारने फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण सुरू केलं. यासोबतच 50 वर्षांवरील पण सहव्याधी असलेल्यांचंही लसीकरण सुरू झालं.
त्यानंतर मे 2021 मध्ये 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. त्यानंतर एक ते तीन महिन्यांनी दुसरा डोसही घ्यायला सांगण्यात आलं होतं, आणि त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी आणखी एक बूस्टर डोस.
याच दरम्यान आपण डेल्टाची भीषण दुसरी लाट आणि ओमिक्रॉनची वेगाने पसरणारी पण कमी घातक लाट पाहिली. अर्थात मृत्यू आणि ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत गेल्याने आता कोरोना मागे पडला, असं म्हणत आपण पुन्हा जगात मनमोकळेपणाने वावरू लागलो. आणि त्यातच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय.
अशात लसीकरणाचा किती फायदा झाला?
कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं जगभरातल्या सर्व तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळेच आपण युद्धपातळीवर लसीकरण केलं. पण तरीही कोरोना पुन्हा हल्ला करतोय, असं लक्षात आल्यावर खरंच लसीकरणाचा काही फायदा झाला का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. याचं उत्तर कॉमनवेल्थ फंडने अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासातून सापडतं.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड तसंच यॉर्क आणि येल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं कळतं की, जर लस उपलब्ध झाली नसती तर एकट्या अमेरिकेत दोन वर्षांत 12 कोटी जास्त लोकांना कोव्हिड झाला असता.
त्यापैकी 1 कोटी 85 लाखांपेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं असतं आणि 32 लाख आणखी लोकांचा मृत्यू झाला असता. आणि अमेरिकेतल्या लसीकरण मोहिमेमुळे त्या देशाने 1.3 ट्रिलियन डॉलर्स इतका वैद्यकीय खर्च वाचवला. हा अभ्यास अमेरिकेपुरता मर्यादित असला, तरीही यातून भारताने कोव्हिडवर कशी मात केली, याचा एक अंदाज घेता येतो.
लस घेतली असेल तर मी किती सुरक्षित?
सध्या तुमच्या-आमच्या मनातला सर्वांत मोठा प्रश्न हाच, की जर मी लशीचे दोन्ही आणि पात्र असल्यास तिन्ही डोस घेतले आहेत, तर मी या नवीन व्हेरियंटपासून किती सुरक्षित आहे. तुम्ही घेतलेली लस BF.7 व्हेरिअंट ओमिक्रॉनवरही काम करेल, असंच तज्ज्ञ आताच्या घडीला तरी सांगत आहेत.
पण लशींपासून मिळणारं संरक्षण डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांपर्यंतच लागू असतं, असं अनेक अभ्यासांमधून पुढे आलंय.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशातल्या 90 टक्के लोकांनी कोव्हिडचे दोन्ही डोस घेतले आहेत तर फक्त 22.3 कोटी पात्र लोकांनी तिसरा अर्थात बूस्टर डोस घेतला आहे. हा आकडा फारच कमी आहे, आणि तो वर नेण्याची आणि स्वतःला आणखी सुरक्षित करण्याची जबाबदारी तुमच्या-आमच्यावरच आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला पॅनिक न होता, आपल्याला एकच काम करणे आहे – आवश्यक त्या कोव्हिड अनुरूप वर्तणुकीचं पालन करणं, आपलं लसीकरण पूर्ण करणं.