कोरोना, मंकीपॉक्सनंतर 'ओरोपुश'चा जगभर धुमाकूळ; ना औषध, ना लस, जाणून घ्या 7 लक्षणं

बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (16:06 IST)
कोरोना, झिका, मंकीपॉक्स यांसारख्या आजारांनी आधीच चिंतेचं वातावरण निर्माण केलेलं असताना, आता जगभरातील वैद्यकीय क्षेत्राची चिंता आणखी वाढवणारा एक संसर्गजन्य आजार समोर आला आहे.या आजाराचं नाव आहे ओरोपुश.
 
तसं या आजाराचं अस्तित्व अनेक दशकांपासून असलं तरी आता तो वेगानं जगभरात पसरतो आहे. या आजाराची लक्षणं, इलाज, आजारामागची कारणं याबद्दल आपण या बातमीतून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
 
अलीकडेच रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संशोधक सावध झाले आहेत. त्यांनी एका विषाणूमुळे होणाऱ्या आजाराच्या वाढत्या धोक्याचा इशारा दिला आहे.
 
हा विषाणू म्हणजे 'ओरोपुश' (Oropouche).
 
या विषाणूविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळेच सध्या त्यामुळे होणाऱ्या आजारावर औषधे नाहीत आणि लस देखील नाही.
 
ब्राझिलमधील ईशान्येकडील बाहिया राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस दोन तरुणींचा ओरोपुशमुळे (Oropouche) मृत्यू झाल्याची पुष्टी ब्राझिलमधील अधिकाऱ्यांनी केली आहे.
 
क्युबामध्ये देखील या विषाणूचा उद्रेक नोंदवण्यात आला आहे.
 
हा आजार डास आणि मिजेस (midges) या विशिष्ट प्रकारची छोटी माशी चावल्यामुळे पसरतो.
 
या आजारामुळे कोणते धोके आहेत आणि त्याचं निदान कसं केलं जाऊ शकतं. या आजाराला प्रतिबंध कसा घातला जाऊ शकतो आणि त्यावर कोणते उपचार केले जाऊ शकतात?
 
ओरोपुश विषाणू (Oropouche Virus) आहे तरी काय?
ओरोपुश या विषाणूचा संसर्ग कीटक चावल्यामुळे होतो. सर्वसामान्यपणे अतिशय छोटी अशी क्युलिकॉईड्स पॅरेन्सिस (Culicoides paraensis) ही माशी चावल्यामुळे हा आजार होतो. अमेरिकेच्या बऱ्याचशा भागात ही माशी मोठ्या संख्येनं आढळते.
 
1955 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील वेगा दी ओरोपुश या गावात (Vega de Oropouche) या आजाराच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती.
मागील सहा दशकांच्या कालावधीत ब्राझिलमध्ये 5 लाखांहून अधिक लोकांना हा आजार झाल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षात रुग्णांची संख्या कदाचित याहूनही अधिक असू शकते असं ते मान्य करतात.
ब्राझिलमध्ये यावर्षी आतापर्यंत 10 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात चांगलीच वाढ झाली आहे. 2023 मध्ये हा आजार झालेल्या रुग्णांची संख्या फक्त 800 च्या वर होती.
ब्राझिलमधील बहुतांश रुग्ण अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळले आहेत. तिथे ओरोपुश हा एक स्थानिक आजार असल्याचं (त्याच भागात आढळणारा) मानलं जातं.
ब्राझिलबरोबरच मागील काही दशकांमध्ये पेरु, कोलंबिया, इक्वेडोर, अर्जेंटिना, फ्रेंच गयाना, पनामा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, बोलिव्हिया आणि क्युबा या देशांमध्ये देखील ओरोपुश ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे.
युरोपात सुद्धा या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे. जूनपासून स्पेन, इटली आणि जर्मनी ओरोपुशचे रुग्ण आढळले आहेत. मात्र यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हे रुग्ण क्युबा आणि ब्राझिलमधील परतणाऱ्या प्रवाशांपैकी होते.
 
ओरोपुशचं संक्रमण कसं होतं?
किटक, माशी किंवा डास चावल्यामुळे ओरोपुश हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो.
त्वचेशी संपर्क येणं किंवा हवेतून संसर्ग होणं इत्यादी इतर कोणत्याही पद्धतीने या आजाराचा संसर्ग होण्याचा कोणताही पुरावा नाही.
अर्थात ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटलं आहे की समोर आलेल्या पुराव्यांवरून असं दिसतं की हा विषाणू गर्भवती महिलांकडून त्यांच्या गर्भामध्ये संक्रमित होऊ शकतो.
ओरोपुशचे गर्भवती महिलेवर आणि गर्भाशयातील अर्भकांवर काय परिणाम होतात, हे अद्याप स्पष्ट नाहीत. अद्याप यासंदर्भातील अभ्यास व्हायचा आहे.
 
एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे, वाढतं शहरीकरण, जंगलतोड आणि पर्यावरणाची हानी किंवा हवामान बदलासारख्या घटकांमुळे याचा मानवांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात उद्रेक होतो आहे.
 
माकड, स्लॉथ (माकडाप्रमाणेच दिसणारा आणि मुख्यत: झाडावर राहणारा प्राणी) या प्राण्यांमध्ये ओरोपुश निसर्गत: आढळतो.
 
ओरोपुशचा परिणाम काही पक्ष्यांवर देखील होऊ शकतो, अशी शंका वैज्ञानिकांना वाटते.
 
ओरोपुशची लक्षणं काय असतात?
ओरोपुशचा संसर्ग झालेल्यांमध्ये फ्लू सारखी लक्षणं आढळतात. ती बरीचशी डेंग्यूतील तापासारखी असतात.
 
जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) या आजाराची काही लक्षणं सांगितली आहेत. ती अशी आहेत :
 
अचानक तीव्र ताप येणं
डोकेदुखी
डोळ्यामागे वेदना जाणवणं
सांध्यांमध्ये वेदना किंवा ताठरपणा जाणवणं
थंडी वाजून येणं
मळमळ वाटणं
उलट्या होणं
बहुतांशवेळा रुग्णांमध्ये ही लक्षणं पाच ते सात दिवस राहतात.
 
मात्र, युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅंड प्रिव्हेन्शन (US Centers for Disease Control and Prevention)(CDC)चं म्हणणं आहे की, 60 टक्क्यांपर्यंत रुग्णांमध्ये काही दिवसांनी किंवा अगदी काही आठवड्यांनी ही लक्षणं पुन्हा दिसू लागतात. आजार पुन्हा उद्भवल्यावर याच प्रकारची लक्षणं नोंदवली गेली आहेत.
 
हा आजार पुन्हा का होतो किंवा परततो याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. तोच संसर्ग पुन्हा होणे किंवा ओरोपुश विषाणूचा फैलाव करणाऱ्या किटकांचा खूप जास्त प्रमाणात प्रादूर्भाव असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना पुन्हा संसर्ग होणं यासारख्या गोष्टींमुळे हे होत असावं.
 
ओरोपुश किती प्राणघातक असतो?
25 जुलैला ब्राझिलमधील अधिकाऱ्यांनी ओरोपुश तापामुळे झालेल्या सुरूवातीच्या मृत्यूंची नोंद केली. मृत पावलेल्या दोन्ही तरुणी त्यांच्या वयाच्या विशीत होत्या. त्यांना आधी कोणताही आजार किंवा वैद्यकीय समस्या नव्हती, असं डॉक्टर्सनी सांगितलं.
 
ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयानं ओरोपुशसंदर्भात एक इशारा दिला आहे. त्यात म्हटलं आहे की, गर्भाशयातच संसर्ग झालेल्या बाळांमधील मेंदूच्या दोषांशी देखील या विषाणूचा संबंध असू शकतो.
 
संसर्ग झालेल्या मातांच्या नवजात बाळांमध्ये मायक्रोसेफॅली (Microcephaly) च्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली. मायक्रोसेफॅलीमध्ये मेंदूची अपुरी वाढ होते आणि अनेकदा तो झिका विषाणूशी संबंधित असतो.
(मायक्रोसेफॅली हा एक दुर्मिळ आजार किंवा दोष असतो. बाळामध्ये तो जन्मत:च असतो. यात बाळाचं डोक्याचा आकार नेहमीच्या तुलनेनं छोटा असतो.)
गर्भातच बाळाचा मृत्यू होण्यामागे देखील ओरोपुशचा संबंध असण्याची शक्यता आहे.
 
मात्र, वैज्ञानिक ही गोष्ट मान्य करतात की, गर्भावस्थेच्या या विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल पुष्टी होण्याआधी, यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
 
ओरोपुशमुळे आरोग्याशी संबंधित इतरही काही गंभीर स्वरुपाची गुंतागुंत निर्माण होते. यात एन्सेफॅलिटिस (Encephalitis) आणि मेनिनजायटिसचा (Meningitis) समावेश आहे.
 
हे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असणाऱ्या पडदा किंवा आवरणाचे (Membrane)
 
इन्फ्लेमेटरी आजार आहेत.
मात्र, ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेले दोन रुग्णांचे मृत्यू अभूतपूर्व आहेत. आधी झालेल्या मृत्यूंची नोंद घेतली नाही की त्या रुग्णांना डेंग्यू झाल्याचं चुकीचं निदान करण्यात आलं होतं, हे नक्की स्पष्ट नाही. मात्र मागील कित्येक दशकांमध्ये 5 लाखांहून रुग्णांचा विचार करता ही गोष्ट शक्य आहे.
 
ओरोपुशवर कोणता उपचार उपलब्ध आहे?
ओरोपुशवर उपचार करण्यासाठी कोणतंही विशिष्ट असं औषध उपलब्ध नाही.
 
द लँसेट मायक्रोब (The Lancet Microbe) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ओरोपुश तापाचा उद्रेक हा जागतिक आरोग्यासाठी निर्माण होणारा धोका असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर या लेखात ओरोपुशशी संबंधित नवीन उपचारांसाठीच्या संशोधनात अभाव असण्याच्या मुद्द्याबाबतसुद्धा इशारा देण्यात आला आहे.
 
(द लॅंसेट हे जागतिक ख्यातीचं वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नियतकालिक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जगातील सर्वात प्रभावशाली नियतकालिकांमध्ये त्याचा समावेश होतो.)
ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, "या आजारात रुग्णांनी लक्षणांवर आधारित उपचार घेतले पाहिजे आणि वैद्यकीय देखरेखीखाली विश्रांती घेतली पाहिजे."
 
ताप, अंगदुखी आणि मळमळ यांसारखी या आजाराची लक्षणं कमी करण्यासाठी डॉक्टर्स काही विशिष्ट औषधोपचाराची शिफारस करू शकतात.
 
संसर्ग झालेल्या व्यक्तीनं कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवावा किंवा कीटकांचा फैलाव टाळावा, जेणेकरून संसर्ग झालेल्याला कीटक चावण्याची शक्यता कमी करता येईल. यातून ओरोपुश विषाणूचं इतर व्यक्तींमध्ये होणारं संक्रमण टाळता येऊ शकेल. परिणामी या आजाराचा प्रसार टाळता येईल.
 
ओरोपुश टाळला जाऊ शकतो का?
ओरोपुशचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही.
त्यामुळे ओरोपुशपासून लोकांनी स्वत:चा बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डास, माशा किंवा किटक चावण्यापासून सावध राहणे किंवा त्यासाठीची काळजी घेणे.
आरोग्य विभागाकडून यासंदर्भात काही प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे,
मोठ्या प्रमाणात डास, माशा किंवा कीटक असलेली ठिकाणं टाळावीत.
दरवाजे आणि खिडक्यांवर बारीक जाळ्या किंवा जाळ्यांचे पडदे लावावेत.
डास किंवा कीटकाचं चावणं टाळण्यासाठी सर्व शरीर झाकलं जाईल असे कपडे परिधान करणे.
शरीराचा जो भाग किंव जी त्वचा उघडी असते त्यावर डास किंवा कीटकांना प्रतिबंध करणारे (repellent) मलम किंवा क्रीम लावणे.
घर आणि घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे. खासकरून घराबाहेर जिथे झुडपं किंवा प्राणी असतात असा परिसर स्वच्छ ठेवावा.
सांडपाणी, साचलेलं पाणी आणि वाळलेलं गवत किंवा वनस्पती इत्यादी गोष्टी जिथे डास, कीटक अंडी देतात किंवा त्यांची पैदास होते, अशा गोष्टी साफ कराव्यात.
ओरोपुशवर कोणता उपचार उपलब्ध आहे?
एरवी डासांमुळे होणारे मलेरिया, डेंग्युसारखे आजार टाळण्यासाठी मच्छरदाणी बहुधा उपयुक्त असते. मात्र, ओरोपुशसारख्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी त्या कमी प्रभावी ठरतात.
 
कारण अगदी छोट्या माशांमुळेच (midges) ओरोपुशचा प्रादुर्भाव होतो आणि त्या माशा इतक्या छोट्या असतात की मच्छरदाणीमधून देखील आरपार जाऊ शकतात.
 
डेल्टामेथ्रिन (deltamethrin) आणि एन,एन-डायइथाइल-मेटा-टोल्युअमाइड (N,N-diethyl-meta-toluamide) (DEET) सारखी कीटकनाशकं ओरोपुशचा संसर्ग पसरवणाऱ्या अतिशय छोट्या माशांवर नियंत्रण ठेवण्यात प्रभावी ठरतात.
 
सार्वजनिक आरोग्याचा व्यापक विचार करता, अशी मागणी केली जाते आहे की ओरोपुशच्या चाचण्या अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर रोगाचं निदान करण्याचा वेग वाढवला पाहिजे. रोगाचा उद्रेक होण्यापूर्वी किंवा त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव होण्यापूर्वीच त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.
 
जंगलतोड आणि हवामान बदल यात वाढ झाल्यामुळे किंवा त्यांची तीव्रता वाढल्यामुळे ओरोपुशचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याचा धोका वाढतो. यातून या विषाणूच्या शहरी संक्रमणाची नवीन चक्रं तयार होतात. खरंतर डेंग्यू, झिका आणि चिकनगुनियासारख्या आजारांद्वारे ते आधीच होतं आहे.
 
(अँटनी गार्वेद्वारे संपादित)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती