Mpox काय आहे? महाराष्ट्रात आढळणाऱ्या माकडतापाशी त्याचं साधर्म्य आहे का?
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (11:51 IST)
आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.
या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या घोषणेनंतर, स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एम् पॉक्स (Mpox) चा पहिला रुग्ण सापडल्याची खात्री केली आहे. या संसर्गजन्य आजाराचा आफ्रिका खंडाबाहेर सापडलेला हा पहिलाच रुग्ण आहे.
संबंधित व्यक्ती आफ्रिकेत राहत होता आणि तिथे त्याला या रोगाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. आफ्रिकेतल्या या भागामध्ये mpox या रोगाचा उद्रेक झालेला आहे असं स्वीडनच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे.
या Mpox मुळे आफ्रिका खंडातल्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DR Congo) या देशात किमान 450 जणांचा बळी गेलाय.
त्यानंतर हा आजार मध्य आणि पूर्व आफ्रिकेच्या भागांमध्ये पसरला आहे. या संसर्गाचे नवे व्हेरियंट वेगाने पसरत असून त्यामुळे जीव जाण्याचं प्रमाण अधिक असल्याने संशोधक काळजीत आहेत.
आफ्रिका खंडात आणि जगात इतरत्रही हा आजार पसरण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती चिंताजन्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घिब्रयसुस यांनी म्हटलंय.
Mpox काय आहे?
Mpox हा मंकीपॉक्स व्हायरसमुळे होणारा - विषाणुजन्य आजार आहे.
हा Zoonosis Disease म्हणजे प्राण्यांमधून माणसांकडे येणारा संसर्ग आहे. विविध प्रजातींची माकडं, उंदीर, खारींकडून हा विषाणू माणसांमध्ये येतो.
Smallpox म्हणजे देवी पसरवणाऱ्या विषाणूंच्या गटामधलाच हा विषाणू आहे, पण त्या तुलनेत कमी घातक आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोसारख्या आफ्रिका खंडातल्या उष्णकटीबंधातल्या देशांच्या जंगलांमधल्या दुर्गम गावांमध्ये हा विषाणू सर्रास आढळतो.
या भागांमध्ये दरवर्षी या विषाणू संसर्गाच्या हजारो केसेस आढळतात आणि दरवर्षी शेकडो मृत्यूही होतात. 15 वर्षांखालच्या मुलांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो.
1970 मध्ये आफ्रिका खंडात पहिल्यांदा मंकीपॉक्स आढळला होता. आफ्रिकेबाहेर पहिल्यांदाच मंकीपॉक्स पसरला 2003मध्ये. अमेरिकेत तेव्हा याचे रुग्ण आढळले होते.
जुलै 2023 अखेरपर्यंत भारतात मंकीपॉक्सचे 27 रुग्ण आढळले होते.
Mpox चे दोन प्रकार आहेत. Clade 1 आणि Clade 2
2022 मध्ये झालेला एमपॉक्सचा उद्रेक हा Clade 2 प्रकारचा होता. हा तुलनेने सौम्य असतो. त्यावेळी हा संसर्ग अशा तब्बल 100 देशांमध्ये पसरला जिथे सहसा हा विषाणू आढळत नाही. 2022मध्ये युरोप आणि आशियामधल्या काही देशांमध्येही या संसर्गाचे रुग्ण आढळले, पण त्यावेळी लसीकरणाच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली होती.
पण यावेळी मात्र Clade 1 या तुलनेने गंभीर प्रकारच्या Mpox चा संसर्ग पसरतोय. यापूर्वीच्या उद्रेकांत याचा संसर्ग झालेल्यांपैकी 10% रुग्णांचा मृत्यू झाला होता.
2024 च्या सुरुवातीपासून जुलै 2024 अखेरपर्यंत Mpox चे 14,500 पेक्षा अधिक संसर्गग्रस्त रुग्ण आढळले असून 450 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असल्याचं आफ्रिका CDC ने म्हटलंय.
2023 वर्षाच्या याच कालावधीशी तुलना केल्यास रुग्णसंख्या 160% जास्त आहे तर मृत्यूंची संख्या 19% नी वाढलेली आहे.
Mpox चे सर्वाधिक - 96% टक्के रुग्ण डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहेत. शिवाय शेजारच्या बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडामध्येही ही साथ पसरलेली आहे.
डीआर काँगोमध्ये या एमपॉक्सवरची लस सहजासहजी उपलब्ध नसल्याने हा आजार आणखी पसरण्याची भीती आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे.
Mpox चा हा नवा व्हेरियंट अधिक लवकर पसरतो, गंभीर परिणाम करतो आणि त्यामुळे लहान मुलं आणि मोठ्यांच्याही मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे.
Mpoxची लक्षणं काय?
संसर्ग झाल्यावर सुरुवातीला आढळणारी लक्षणं म्हणजे
ताप
डोकेदुखी
सूज येणं
पाठदुखी
अंगदुखी
ताप येऊन गेल्यावर अंगावर पुरळ उठतो. चेहऱ्यावर फोड यायला सुरुवात होते आणि मग अंगावर इतरत्रही हे फोड येतात. हाताचे पंजे आणि पायाच्या तळव्यांवरही हा पुरळ येतो.
हा पुरळ अतिशय खाजरा आणि वेदनादायक असतो. काही दिवसांनंतर यावर खपली धरते आणि नंतर ती पडून जाते. या पुरळाच्या फोडांचे व्रण कायमचे शरीरावर राहू शकतात.
हा संसर्ग स्वतःच नीट होतो पण त्यासाठी 14 ते 21 दिवसांचा काळ लागू शकतो.
Mpox च्या संसर्गाच्या गंभीर प्रकरणांमध्ये अंगभर, विशेषतः तोंडामध्ये, डोळ्यांमध्ये आणि गुप्तांगावरही पुरळ येतो.
Mpox चा संसर्ग कसा पसरतो?
Mpox चा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्कात वा संबंध येणाऱ्या व्यक्तीला हा संपर्क होऊ शकतो. शरीरसंबंध, स्पर्श वा मिठी याद्वारे हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसरीकडे पसरू शकतो. सोबतच बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे - खोकण्याद्वारे वा बोलताना उडणाऱ्या तुषारांमधूनही संसर्ग पसण्याची काहीशी शक्यता असते.
तुमच्या त्वचेला भेगा असतील किंवा जखम असेल तर त्याद्वारे, श्वसनमार्गाद्वारे किंवा डोळे - नाक वा तोंडाद्वारेही ही विषाणू शरीरात शिरकाव करू शकतो.
Mpoxचा संसर्ग असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे, पांघरूण वा टॉवेल वापरल्याने किंवा त्या गोष्टींना स्पर्श केल्यानेही संसर्ग पसरतो.
माकड, उंदीर वा खार या प्राण्यांद्वारेही हा विषाणू पसरतो.
2022 मध्ये या साथीचा उद्रेक झाला तेव्हा संसर्ग हा शारीरिक संबंधांमुळे अधिक पसरला होता.
संसर्गाचा सर्वाधिक धोका कुणाला?
शारीरिक संबंध हेच यावेळीही डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये हा संसर्ग पसरण्यामागचं मोठं कारण आहे. शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती, समलिंगी पुरुषांमध्ये हा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे.
पण यासोबतच रुग्णाच्या - बाधित व्यक्तीच्या जवळून संपर्कात येणारे आरोग्य कर्मचारी किंवा कुटुंबीय यांनाही संसर्ग होण्याचा झोका असतो.
Mpox चा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीने अंगावरील पुरळ पूर्ण बरा होईपर्यंत इतरांपासून दूर रहावं.
संसर्गबाधित व्यक्तींनी बरं झाल्यानंतरही पुढचे 12 आठवडे शारीरिक संबंधांच्या वेळी काँडोमचा वापर करावा असं WHO ने म्हटलंय..
Mpox वर उपचार आहेत का?
संसर्ग पसरणं रोखणं, हाच या Mpox वरचा सर्वात मोठा उपाय आहे. या Mpox वरच्या लशी उपब्ध आहेत पण त्या सर्वांसाठी सहजासहजी उपलब्ध नाहीत. ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे, जे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत अशांनाच या लशी देण्यात येतायत.
Mpox चा माकडतापाशी काही संबंध आहे का?
महाराष्ट्रात कोकणामध्ये आढळणाऱ्या माकडतापाचा Monkey Feverचा Mpoxशी संबंध आहे का? तर तसं नाहीये.
माकडतापात होणारं इन्फेक्शन वेगळं असतं. हे Tick-Borne Encephalitis प्रकारचं इन्फेक्शन असतं. यामध्ये हा आजार Tick - लहानशी माशी - कीटक चावल्यामुळे पसरतो.
याला Kyasanur Forest disease - KFD असंही म्हटलं जातं.