वसुधैव कुटुंबकम्

PIB
व्यक्तिच्या आयुष्यात कुटुंब हा अत्यंत महत्वाचा घटक मानला गेला आहे. मानव उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत असताना ‍समूहाने राहण्याची गरज त्याच्या मनात निर्माण झाली. भावनांचे आदान-प्रदान करण्यासाठी मानव समुहाने राहू लागला आणि त्यातून कुटुंब ही संकल्पना उदयास आली. तेव्हापासून कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ बनला.

जीवनात होणार्‍या चांगल्या-वाईट घटनांचे पडसाद आपल्या कुटुंबात उमटत असतात. लहानपणी आपण टाकलेल्या पहिल्या पावलाचे कोडकौतुक आपले आजी आजोबा, काका काकू, आई बाबा, तसेच घरातील इतर वडिलधारी मंडळी करायची. बाळाचं पहिलं पाऊल हा संपूर्ण कुटुंबाचा आनंदोत्सव असतो. आपण केलेल्या प्रगतीला प्रोत्साहन देणारं कुटुंब आपल्या अडखळणार्‍या पावलांनाही सावरायचं.

आपण लहानाचे जसे मोठे होत जातो ‍तसतसे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिबद्दलची स्वतंत्र ओळख आपल्याला होत जाते. या सर्वांच्या प्रेमातून ‍तर कधी रागाने सांगितल्या जाणार्‍या गोष्टीतून आपली जडणघडण होत जाते. म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्व घडण्यासाठीचे पहिले संस्कार केंद्र आपले कुटुंब असते. कोणत‍ी कृती चांगली कोणती वाईट, कुठला निर्णय योग्य, कुठला अयोग्य अशा मनाच्या द्वंद्वात्मक परिस्थित‍ीत कुटुंबच आपल्याला सांभाळते, सावरते. योग्य निर्णयाची जाण करुन देते. बाहेरच्या जगाशी लढण्याचे बळ इथूनच आपल्याला मिळते. कुटुंबातून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळेच आपण आपले पाऊल आत्मविश्वासाने बाहेर टाकू शकतो.

ND
व्यक्ती समाजात मिसळते तेव्हा समाजातील अनेकविध प्रवृत्तींशी जुळवून घेताना खरा कस लागतो. आपण ज्या पद्धत‍ीने समाजाला आपलसं करु तसाच प्रतिसाद आपल्यालाही मिळतो. मनातील भावनांचे विचारांचे आदानप्रदान कर‍ताना समाजाशी आपले नाते अधिक दृढ होत जाते. कुटुंब संस्थेचे व्यापक स्वरुप म्हणजेच समाज संस्था.

कुटुंब, समाज राज्य देश आणि हे संपूर्ण जग ही याच कुटुंबव्यवस्थेची व्यापक रुपे आहेत. फक्त आपला दृष्टिकोन व्यापक केला तर ही संपूर्ण साखळी एकमेकांवर अवलंबून असल्याचे आपल्याला जाणवेल. या साखळीचा मुलाधार सर्वप्रथम आपले कुटुंबच आहे. परंतु, आजच्या युगात आपली एकत्र कुटुंब व्यवस्थाच जर मोडकळीस आली असेल तर एकसंध समाज तसेच राष्ट्राचे स्वप्न आपण कसे पूर्ण करणार?

'वसुधैव कुटुंबकम्' हा सिध्दांत आपण जगासमोर मांडला. परंतु, आपल्याच देशात वाढत जाणारी वृध्दाश्रमांची संख्या पाहिली तर जिथे कुटुंबच एकत्र राहू शकत नाहीत तिथे या संकल्पनेला कसे मूर्त रुप मिळणार? ही विसंग‍ती टाळायची असेल तर आधी घरातील माणसांनी एकत्र यायला हवं. जुन्या पिढीचे आदर्शवादी विचार व नवीन पिढीचे वास्तववादी विचार यांत कुठेतरी तडजोड होणे आवश्यक आहे.

लग्न झाल्यानंतर आपल्याच आई वडिलांची अडचण वाटल्याने कोणताही विचार न करता त्यांना वृध्दाश्रमाची वाट दाखवणार्‍या मुलांची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढते आहे. 'हम दो हमारे दो'च्या या आधुनिक विचारसरणीने कुटुंबाची व्याख्याच इतकी संकुचित केली की ज्यांनी आपल्याला जगण्याचे सामर्थ्य दिले, ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढण्याचा आपल्याला काय अधिकार? हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही.

ND
परंतु, हे प्रमाण जरी अधिक असले तरी जुन्या पिढीनेही आपली मते थोपवली जात नाहीत ना याची काळजी घ्यायला हवी. नवीन पिढी ही अधिक स्वावलंबी, स्वत:चे निर्णय स्वत:च घेणारी आहे. हे निर्णय घेताना काही वेळा चुका होतील पण यातूनच योग्य तेच घेण्याची समज त्यांना येईल.' विचारांमधील मतभेद ' हेच घर विभक्त होण्याचे मुळ कारण आहे. विचारातील फरकाने तसेच समोरच्या व्यक्तिचे म्हणणे समजून न घेतल्याने नात्यांमधे दुरावा निर्माण होत जातो ‍तेव्हा जुन्या पिढीने एखाद्या निर्णयाविषयी मार्गदर्शन जरुर करावे. पण आपल्या मतांचा अट्टहास धरु नये. म्हणून काही जुन्या परंपरांची कास आपण धरताना नव्या मतांची आस आपण मनातून स्वीकारली तर घरातील व्यक्ती आधी मनाने एकसंध होतील मगच कुटुंब खर्‍या अर्थाने एकत्र आल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

जागतिक कुटुंबदिन साजरा करत असताना भारतासारख्या देशात ज्यांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना सर्वप्रथम मांडली ‍त्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे अवलोकन आपण केले तर लक्षात येईल की 'विश्वाएवढ्या व्यापक अंत:करणानी विश्वात्मक देवाजवळ विश्वकल्याणाचे पसायदान ज्ञानदेवांनी मागितले' या पसायदानातील भावार्थ जाणून जर प्रत्येकानेच हे दान मागितले ‍तर 'वसुधैवकुटुंबकम्' ही संकल्पना प्रत्यक्ष साकारताना आपल्याला दिसेल. ज्यात धर्म, जात, पंथ, देश या सीमा ओलांडल्या गेल्या असतील. मनाने एकरूप झालेल्या या विश्वात हिंसाचार, दहशतवाद, अराजकता, विध्वंस या कुप्रवृत्तींचे समुळ उच्चाटन होऊन 'हे विश्वचि माझे घर 'हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात नांदताना दिसेल.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा