सिंधुताई सपकाळ जेव्हा म्हणाल्या, 'तुला नवरा म्हणून नव्हे तर बाळ म्हणून सांभाळेन'

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (16:17 IST)
'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं काल (4 जानेवारी) निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील सेवेसाठी सिंधुताई सपकाळ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
सिंधुताईंनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपलं आयुष्य जगलं. अखेर, ज्याचं कुणी नाही, त्याचं आपण असं म्हणत त्यांनी आयुष्यात अनेकांची सेवा केली.
अखेर, ज्या नवऱ्याने त्यांना घरातून हाकलून लावलं होतं, त्याला माफ करून त्याचीही सेवा त्यांनी आपल्या संस्थेत केली.
पोटावर लाथ मारुन नवऱ्याने हाकललं
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यात नवरगाव याठिकाणी झाला.
आपली कहाणी व्याख्यानादरम्यान सांगताना सिंधुताई म्हणतात, "मी दहा वर्षांची असताना एका 35 वर्षांच्या व्यक्तीशी माझं लग्न लावून देण्यात आलं. अकराव्या वर्षी मी सासरी नांदायला गेले. अकरा वर्षांची मुलगी काय करू शकते?"
त्या सांगतात, "मला गरोदरपणातच नवऱ्याने पोटावर लाथ घालून हाकलून दिलं. त्यावेळी मी 20 वर्षांची होते. गरोदरपणातही माहेरच्या लोकांनी स्वीकारलं नाही. आईनेही हाकलून लावलं."
अशाच अवस्थेत सिंधुताई रेल्वे स्टेशनवर भीक मागून उदरनिर्वाह करू लागल्या. अखेर, त्यांनी आपलं बाळंतपणही रेल्वे स्टेशनवर स्वतःच केलं.
नवजात बाळाची नाळही सिंधुताईंनी स्वतःच दगडाने मारुन तोडली. दगडाच्या 16 व्या ठोक्याला ही नाळ तुटल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये केला आहे.
 
दहा दिवसांचं बाळ घेऊन भीक मागितली
भाषणांदरम्यान त्या म्हणतात, "मी दहा दिवसांचं बाळ घेऊन रेल्वेत भीक मागत होते. खरा माझा परिचय तोच आहे. मला पतीने तर हाकललंच होतं. पण आईनेही हाकलून दिलं. दहा दिवसांची ओली बाळंतीण. वय वर्षं 20. शिक्षण - चौथी पास, अंगावर एकच पातळ, त्यालाही दोन-चार गाठी मारलेल्या. मला जगायचं होतं. मला मरायचं नव्हतं."
"20 वर्षांचं माझं वय, काय होईल माझं, कुठे जाऊ? म्हणून मी रेल्वेत भीक मागायचे. टीसीने तिकीट विचारलं की उतरुन दुसऱ्या गाडीत चढायचे. आलेल्या परिस्थितीसाठी मी तयार राहिले. दिवसभर भीक मागून रात्री रेल्वे स्टेशनवरच राहायचे. कुणाला दिसू नये म्हणून अंधारात लपून बसायचे."
 
आई चुकेल म्हणून मुलीला पाठवून दिलं
सिंधुताई सपकाळ यांनी रेल्वे स्टेशनवर भिकाऱ्यांची होणारी दयनीय अवस्था पाहिली. त्यांच्या मनात अनेकवेळा मुलीला सोडून देण्याचे, आत्महत्या करण्याचे विचार आले.
पण त्यांनी जिद्द सोडली नाही. भुकेल्याला दोन घास द्यायचे. तहानलेल्याला पाणी पाजायचं, म्हणून त्यांनी दिसेल त्या भिकाऱ्याची सेवा केली.
अखेर पुण्यात त्यांनी 1994 मध्ये पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ममता बाल सदन नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर त्या महाराष्ट्रासह देशभरात अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
पण नंतर इतर अनाथ मुलांची सेवा करत असताना त्यांनी आपल्या मुलीला दुसऱ्या एका संस्थेत पाठवून दिलं होतं.
याबाबत बोलताना भाषणामध्ये त्या म्हणतात, "मला दुसऱ्यांच्या लेकरांची आई व्हायचं असेल, तर स्वतःची मुलगी जवळ ठेवायची नाही, असा लढा माझ्या मनात सुरू होता.
"स्वतःची मुलगी जवळ ठेवून इतरांचीही सांभाळली तर तुझ्यातली आई चुकेल. स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील. सांभाळलेल्या मुलांना पाणी पाजवून गाणं म्हणून झोपू घालशील.
"आई चुकू शकते. मला ते पटलं. म्हणून माझी मुलगी मी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या आश्रमात पाठवून दिली. त्यांनी 12वी पर्यंत सेवासदनला शिकवलं. बीएपर्यंत गरवारे कॉलेजमध्ये शिकवलं. पतंगराव कदमांनी MSW करून दिलं. माझी मुलगी आता एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची आई होऊ शकले."
 
'नवऱ्याला माफ करून लेकराप्रमाणे सांभाळलं'
ज्यांच्यामुळे सिंधुताई सपकाळ यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली होती. त्या सर्वांना त्यांनी माफ केलं.
याविषयी बोलताना सिंधुताई म्हणतात, "वाईटातून चांगलंही घडतं. फक्त चालत राहणं आपल्या हातात आहे. कशाचीही खंत बाळगू नका. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं जर काय काम केलं असेल, तर दगडं मारून हाकलून देणाऱ्या माझ्या पतीला मी माफ केलं. तसंच मला साथ न देणाऱ्या आईलाही माफ केलं."
"माझ्या सासर-माहेरने माझा सत्कार केला. माझ्या सत्काराच्या वेळी माझा पती रडत होता. त्याने हाकललं तेव्हा मी रडत होते. आयुष्य कसं बदलतं पाहा."
"माझ्या सत्कारात ते रडत होते. त्यांना रडताना पाहून मला खूप बरं वाटत होतं. पण क्षणभर बरं वाटलं आणि विचार आला, चुकतेयस सिंधुताई. पण खरं सांग, त्यांनी तुला सोडलं नसतं, तर तू 14 देशांत भाषणं ठोकून आली असती?"
त्या पुढे म्हणतात, "त्यांनी सोडलं नसतं, तर 750 पुरस्कार, अनाथांची माय अशी ओळख तुला मिळाली असती?सिंधुताई, त्यांना माफ कर, असा विचार माझ्या मनात प्रकट झाला. मी त्यांच्या जवळ गेले, त्यांचा हात हातात घेऊन कुरवाळला. इतकी जिव्हाळ्याची वागणूक दिल्यामुळे माझ्या पतीच्या डोळ्यात पाणी आलं."
त्यांना सिंधुताई म्हणाल्या, "तुम्ही मला हाकललं, तेव्हा मी रडत होते. आता तुम्ही रडताय. कुणीच कुणाचं नसतं ना? तुम्ही मला हाकललं तेव्हा माझ्या पातळाला गाठी होत्या. आज माझ्या पातळाच्या गाठी नाहीत. पण तुमच्या धोतराला गाठी आहेत."
त्या म्हणतात, "हे ऐकून ते जोरजोरात रडू लागले. मी त्यांना रडू दिलं. माझ्या पदराने त्यांचं तोंड पुसलं. तुम्ही सोडलं म्हणून माझ्याकडून घडलं. आता मला तुमच्या सेवेची संधी द्या."
सिंधुताई यांनी त्यावेळी आपल्या पतीला संस्थेत आणलं. तू आता नवरा नाहीस तर माझं लेकरू म्हणून इथं आला आहेस, असं त्या म्हणायच्या. इतर लेकरांप्रमाणे तुझीही सेवा करू असं त्या म्हणत असत.
त्या इतर मुलांना म्हणत, "बेटा, हे माझं सगळ्यात खतरनाक बाळ. यांनी सोडलं नसतं तर तुम्हाला आई मिळाली असते का रे? म्हणून आता तुम्ही त्यांचे मायबाप व्हा. त्यांना लेकराप्रमाणे सांभाळा. त्यांचं रिकामी काळीज भरून काढा. त्यांनी तुम्हाला आई दिली. आता तुम्ही त्यांचे गणगोत व्हा."
सिंधुताई कधीही आश्रमात जात, तेव्हा त्यांची भेट त्यांच्या नवऱ्याशी होत असे. पण त्यांचे पती सिंधुताईंशी काहीच बोलायचे नाहीत. एकटक डोळ्यात पाहात ते बसायचे, असा उल्लेख सिंधुताईंनी आपल्या भाषणात केला आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख