'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल (Video)

बुधवार, 20 जून 2018 (11:49 IST)
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा येत्या १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्या-वेगळ्या ‘ड्राय डे’ ची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच एक नवा कोरा ट्रेलर आणि पोस्टर लाँच करण्यात आला.
 
मद्याच्या एका धुंद रात्रीची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. पण त्यासोबतच पोस्टरवरील दारूची बाटलीदेखील आपले लक्ष वेधून घेते. या सिनेमाच्या ट्रेलरमध्येदेखील हीच गम्मत दिसून येत असून, चार मित्रांची धम्माल-मस्ती दाखवणाऱ्या या ट्रेलरमधून आजच्या तरुण पिढीची चंगळ आणि आयुष्य जगण्याची त्यांची मनमौजी वृत्ती आपल्याला दिसून येते. तसेच ऋत्विक - मोनालिसा या फ्रेश जोडीचा रोमान्स जरी यात असला तरी, ब्रेकअप नंतरची धम्मालदेखील यामध्ये बघायला मिळते. रात्रीची धम्माल पार्टी आणि त्यातून उलगडत जाणारी या सिनेमाची गोष्ट, प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवेल अशी आहे.
 
'ड्राय डे'च्या या मजेशीर ट्रेलरबरोबरच ‘दारू डिंग डांग’ ‘अशी कशी’  आणि ‘गोरी गोरी पान’ ही गाणीदेखील तुफान गाजत आहे. आजच्या तरुणपिढीचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा एक अनोखा ‘ड्राय डे’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच या सिनेमाचे लेखन केले आहे, तर नितीन दीक्षित यांनी या सिनेमाचे पटकथा व संवाद लिहिले आहेत. या सिनेमात कैलाश वाघमारे, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर आदी.कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ब्रेकअप नंतरच्या खऱ्या धम्माल पार्टीचा आनंद लुटण्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकदेखील या आगळ्यावेगळ्या 'ड्राय डे' च्या प्रतीक्षेत असतील, हे निश्चित !

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती