कांदा आवक वाढली, सरासरीच्या दरात घसरण

गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (22:40 IST)
नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती पुढील आठवड्यात बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे सरासरी कांद्याच्या दरात ८०० ते ९०० रुपयांची घसरण झाली आहे.
 
काही दिवसांपासून कांद्याचे दर चांगल्या प्रकारे वाढले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने बाजार समितीत देखील आवक वाढली होती. मात्र यामुळे मागील पाच दिवसात कांद्याच्या दारात सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाली असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. 
 
दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात ८०० डॉलर प्रति टन दराने वाढ केली. तसेच नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजार २५ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने परिणाम झाला आहे.  
 
मागील पाच दिवसात कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने ८०० ते ९०० रुपयांची घसरण होत कांद्याची दर ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असून पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक  शेतकऱ्यांना ३५ ते ४० कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती