गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या वादाचा परिणाम आता व्यवसायावर दिसून येत आहे. भारताने सध्या कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, महिंद्रा समूहानेही कॅनडाला मोठा धक्का दिला आहे. आनंद महिंद्रा यांची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने कॅनडा स्थित कंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनसोबतची भागीदारी संपवण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये 11.18 टक्के भागीदारी होती.
महिंद्राने सांगितले की, यामुळे रेसनचे ऑपरेशन थांबले आहे आणि भारतीय लेखा मानकांनुसार 20 सप्टेंबर 2023 पासून त्याचा काहीही संबंध नाही. कॅनडा कॉर्पोरेशन कॅनडा कडून 20 सप्टेंबर 2023 रोजी विसर्जनाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे.
रेसन ही शेतीशी संबंधित टेक सोल्यूशन्स बनवणारी कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा देखील शेतीशी संबंधित उत्पादने बनवते. मात्र, महिंद्र अँड महिंद्राच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे. ही बातमी येताच स्टॉक एक्सचेंजमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर 3.11 टक्क्यांनी किंवा 50.75 रुपयांनी 1583 रुपयांवर बंद झाला
कॅनडा पेन्शन फंडाने अनेक भारतीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सार्वजनिक खुलाशानुसार, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डाने सहा भारतीय कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कंपन्यांमध्ये झोमॅटो,पेटीएम, इंडस टावर, नायका, कोटक महिंद्रा बैंक, डेल्हीवरी यांचा समावेश आहे.