कॅनडा आणि भारतामधील वाढत्या तणावात ऑस्ट्रेलियाची उडी, परराष्ट्र मंत्री म्हणाल्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (12:03 IST)
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांचा मुद्दा आपण भारतासमोर मांडल्याचं ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, कॅनडातील हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा संशय ‘चिंताजनक’ आहे.
 
"या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. पण हे रिपोर्ट चिंताजनक आहेत आणि आम्ही आमच्या सहकारी देशांसोबत या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत,” असंही त्या म्हणाल्या आहेत.
 
जपान हा क्वाडचा सदस्य असल्यामुळे ऑस्ट्रेलिया हा मुद्दा जपानसमोर मांडणार का?
 
या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “परराष्ट्र मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही की, आम्ही कोणता मुद्दा कधी आणि कसा मांडू. पण, देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर केला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, असं आम्हाला वाटतं."
 
सोमवारी (18 सप्टेंबर) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता.
 
त्यानंतर कॅनडा सरकारने भारतीय राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली होती.
 
यावर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातून एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
 
भारत सरकारने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले असून त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
 
दरम्यान, ट्रूडो यांनी मंगळवारी (19 सप्टेंबर) आणखी एक विधान केलं आहे.
 
ते म्हणाले, “शिख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यामागे आमचा हेतू भारताला चिथावणी देण्याचा नव्हता. पण, भारतानं हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळावं अशी कॅनडाची इच्छा आहे.
 
“भारत सरकारनं या प्रकरणात अत्यंत गांभीर्य दाखवण्याची गरज आहे. आम्ही तेच करत आहोत. आम्हाला कोणाला भडकवायचं नाही किंवा प्रकरण ओढायचं नाही. हे अत्यंत गंभीर आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यात त्याचे दूरगामी परिणाम होतील, आम्ही शांत राहू. आम्ही आमच्या लोकशाही तत्त्वांना आणि मूल्यांना चिकटून राहू. आम्ही पुराव्याचे पालन करू.”
 
प्रवासाची नवी नियमावली
या प्रकारानंतर कॅनडाने भारतातील प्रवासासाठीची एक नवीन नियमावली जारी केली आहे.
 
ज्यात कॅनडाने आपल्या नागरिकांना 'अत्यंत सावध' राहण्यास सांगितलं आहे.
 
कॅनडाच्या सरकारनं ‘अभूतपूर्व सुरक्षा परिस्थितीमुळे’ आपल्या नागरिकांना जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात प्रवास टाळण्यास सांगितलं आहे.
 
मंगळवारी (19 ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या या नियमावलीमध्ये म्हटलंय की, "जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद, अतिरेकी, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. यामध्ये लडाखच्या प्रवासाचा समावेश नाही."
 
याशिवाय नागरिकांना ईशान्य भारतातील काही भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, पंजाब आणि राजस्थानच्या भागात न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
 










Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती