मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज (31 ऑक्टोबर) उपोषणाचा सातवा दिवस आहे.महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाचं आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांची तब्येत कालपासून (30 ऑक्टोबर) खालावली आहे. सहावेळा डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी येऊन गेले. मात्र, मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
दुसरीकडे, राज्यातील काही ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचं दिसलं. विशेषत: बीड जिल्ह्यात हिंसेच्या काही घटना घडल्या.
बीडमधील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील कार्यालयालाही आग लावण्यात आली.
पण मनोज जरांगे यांनी या घटनांना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. हिंसेत सत्ताधारी कुणाचा हात आहे का, अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली. कुणीही हिंसा करू नये, अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगेंनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
मुख्यमंत्र्यांशी आरक्षणाबाबत चर्चा झाली. नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही, असे त्यांना सांगितलं.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असे त्यांना सांगितलं. अर्धवट आरक्षण घेणार नाही ते देऊ नका असेही सांगितले.
मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, त्या धर्तीवर आरक्षण द्यावे लागणार आहे.
बीड, धाराशिवमध्ये संचार बंदी, हिंगोलीत भाजपचं कार्यालय जाळलं
बीडमध्ये सोमवारी (31 ऑक्टोबर) जाळपोळीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालयापासून 5 किमी अंतरावरील हद्दीपर्यंत तसंच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.
संपूर्ण बीड शहर आणि जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. दरम्यान बीडमधील जाळपोळीनंतर आतापर्यंत कोणावर गुन्हे दाखल केलेले नाहीयेत.
धाराशिव जिल्ह्यातही खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी जारी केले आहेत.
बीडनंतर संचारबंदी लागू होणारा धाराशिव हा दुसरा जिल्हा ठरला आहे.
हिंगोलीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसत आहे. सोमवारी (30 ऑक्टोबर) रात्री शहरातील भाजपचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला.
या घटनेनंतर पोलिसांनी ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची भालकी ते पुणे जाणारी बस रात्रीच्या सुमारास धाराशिवमधील तुरोरी गावाजवळ बस पेटवून देण्यात आली. बसमधील 39 प्रवाशांना खाली उतरवून ती पेटवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मंगळवारी नाशिकमध्ये शांततापूर्ण मार्गाने सुरूआहे. तर चांदवड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आल्याचं बीबीसी प्रतिनिधींनी सांगितलं.
राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे आज (31 ऑक्टोबर) एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात येत आहेत. त्या नाशिकमधील देवळाली येथील आमदार आहेत.
कार्तिकी एकादिशच्या दिवशी विठ्ठलाच्या पूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना 'त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करायला विरोध करू, असं नाशिकच्या सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते करण गायकर यांनी म्हटले आहे.
सोलापूरमध्ये पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव येथे एसटी बस पेटवण्यात आली. ही बस पुण्याहून पंढरपूरकडे जात होती. त्याआधी प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं.
तसंच मोहोळ तालुक्यातील अंकोली गावाजवळही दुसरी एसटी बस जाळण्यात आली. एसटी पेटवत एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आला. ही बस सोलापूरहून पंढरपूरला जात होती.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगर या ठिकाणी मराठा समाजाने आंदोलन केले. तेव्हा रस्त्यावर टायर जाळल्याने दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.
तसंच सोमवारी दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
यात एसटी बसचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे बीड, धाराशिव, जालना व इतर जिल्ह्यांतील जवळपास 3 हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी मात्र या जाळपोळीमागे सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसंच, त्यांनी जाळपोळ करू नका, नेत्यांच्या घरी जाऊ नका अशा सूचना दिल्या आहे.
जाळपोळीच्या घटना घडत राहिल्यातर मी वेगळा निर्णय घेईन असा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलकांना हिंसक घटना बंद करण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये जरांगे यांनी उपोषण चालूच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.
अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांचं घर आणि माजलगाव नगर परिषदेची इमारत पेटवण्यात आली आहे.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इमारतीलाही आग लावण्यात आली आहे. तसंच दिवसभर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.
कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या बससेवा थांबवली
आंदोलकांनी बस पेटवून दिल्याने कर्नाटकने महाराष्ट्रात येणारी बससेवा तात्पुरती थांबवली आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भालकी येथून पुण्याच्या दिशेने निघालेली बस धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी गावात जाळण्यात आली.
बसमधील प्रवाशी आणि वाहन चालक यांना त्याआधी खाली उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती स्थीर झाल्यावर आम्ही बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असं कर्नाटकचे वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.
1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक स्थापना दिवस साजरा केला जातो.
तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याचा काही भाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याआधीच ही घटना घडली आहे.
कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस हा त्याठिकाणी राज्योत्सव दिवस म्हणून साजरा केला जातो.
एक खासदार आणि दोन आमदारांचे राजीनामे
शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी काल (30 ऑक्टोबर) राजीनामा दिला.
त्यापाठोपाठ आता बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
मात्र, यातील कुणाचेही राजीनामे स्वीकारल्याचे अद्याप अधिकृतरित्या कळू शकले नाही.
मराठा आरक्षणासंबंधीच्या समितीची बैठक
सोमवारी (30 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समितीची बैठक झाली.
एकाबाजूला निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची पडताळणी करण्याचं काम करत आहे तर दुसरीकडे मराठा उपसमितीच्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामाचा आढावा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत अतिशय तपशिलवार चर्चा झाली, त्यात न्या. शिंदे यांच्या समितीने प्रथम अहवाल सादर केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आज मंगळवारी (31 ऑक्टोबर) रोजी तो कॅबिनेटकडून स्वीकारून पुढची कार्यवाही करू असं त्यांनी सांगितलं.
विरोधी पक्षांची भूमिका
सोमवारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
यात बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू यांच्यासह तीनही पक्षांचे आमदार उपस्थित होते.
राज्यपालांनी मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागणी त्यांनी केली.