आक्रोश पदयात्रा स्थगित! मनोज जरांगेच्या प्रकृतीच्या कारणामुऴे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (20:53 IST)
कोल्हापूर :मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यामागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणामध्ये त्यांची प्रकृती बिघडत चालल्याने १७ ऑक्टोबर पासून सुरू असलेली आक्रोश पदयात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामातील ४०० रूपये प्रतिटन दिल्याशिवाय एक कांडेही उस दिला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
 
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “दि. १७ ऑक्टोबर पासून गत हंगामातील ४०० रूपये द्या या मागणीसाठी ५२२ किमीची पदयात्रा सुरू केली आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून ही पदयात्रा सुरू होऊन आज दि. ३० रोजी करमाळे ता. शिराळा येथे आक्रोश पदयात्रा स्थगित करण्यात आली. सुमारे ३०० किमीची पदयात्रा झाली. समाजीत सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. दि. २४ ऑक्टोंबर पासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिघळत चाललेले आहे. त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे.” असे ते म्हणाले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “आक्रोश पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते. फुले- फटाके आदींने स्वागत होत असताना अशा मनोज जरांगेंच्य़ा प्रकृती अस्वास्थतेच्या पार्श्वभुमीवर हे स्वागत स्विकारणे मला अप्रस्तुत वाटत आहे. म्हणूनच ही आक्रोश पदयात्रा आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती