हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनोतनं हिमाचल प्रदेशात मोदींची लाट असल्याचं म्हटलं आहे. मतदारांना मोठ्या संख्येन बाहेर पडण्याची विनंतीही कंगनानं केली.
पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली की, नरेंद्र मोदी राजकारणात येण्यापूर्वीही ध्यान करायचे. त्यांनी अनेक दशकं तपश्चर्या आणि ध्यान केलं.
“लोकशाहीच्या महापर्वात उत्साहानं सहभागी व्हावं आणि आपल्या सर्वोच्च अधिकाराचा वापर करावा. मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी कितीतरी लोकांचं रक्त सांडलं. त्यामुळं या अधिकाराचा फायदा उचलावा,” असंही कंगना म्हणाली.
कंगनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केली. “मोदीजींनी यावेळी किमान 200 सभा घेतल्या. 80-90 हून जास्त मुलाखती दिल्या. हिमाचल प्रदेश आणि संपूर्ण देशाला त्यांच्या गॅरंटीवर विश्वास आहे. आपण सगळे मोदींचे सैनिक आहोत. मला मंडीच्या लोकांचा आशिर्वाद मिळेल आणि आम्ही हिमाचलच्या चारही जागा जिंकू,” असं कंगना म्हणाली.
अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी नरेंद्र मोदी कन्याकुमारीत ध्यान करत आहेत. त्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवरही कंगनानं प्रतिक्रिया दिली.
“मोदी हे आज नव्हे तर नेता नव्हते, राजकारणात नव्हते तेव्हापासून ध्यान करतात. आपण त्यांचे अनेक फोटो पाहिले आहेत. अनेक दशकं त्यांनी तपश्चर्या केली आहे.
या लोकांना त्यावरही आक्षेप आहे. कोणीही आपली मूळ जीवनशैली विसरू शकत नाही. ते ध्यान करतात आणि ही त्यांची जीवनशैली आहे,” असं कंगनानं म्हटलं.