ट्रंप यांच्यावर पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी आज होणार आरोपनिश्चिती
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (09:45 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना आता ग्रँड ज्युरींसमोर आपल्यावरच्या आरोपांना उत्तर द्यावं लागेल. या प्रक्रियेला इंडाईक्टमेंट असं म्हणतात.
इंडाईक्टमेंट म्हणजे औपचारिक लेखी आरोप किंवा अभियोग असाही असा याचा अर्थ होतो.
थोडक्यात, गुन्हा दाखल करणे, असंही या प्रक्रियेला संबोधलं जाऊ शकतं.
इंडाईक्टमेंटमध्ये गुन्ह्यात दाखल आरोपांसंदर्भात सविस्तर माहिती असते. यामध्ये गंभीर गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांचाही समावेश असतो.
या अंतर्गत दाखल गुन्ह्यात एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
या 76-वर्षीय माजी राष्ट्राध्यक्षांवर स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्नस्टारला गप्प राहाण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे असं म्हटलं जातंय. पण अजून त्यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
न्यूयॉर्कमध्ये मंगळवार, 4 एप्रिल रोजी ट्रंप यांना ग्रँड ज्युरीसमोर हजर व्हावं लागेल. त्याचवेळी त्यांच्यावरचं आरोपपत्र वाचून दाखवण्यात येईल. स्थानिक वेळेनुसार ही प्रक्रिया दुपारी 2 वाजता सुरू होईल.
ट्रंप न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण दिवस त्यांच्या कायदेशीर सल्लागारांसोबत घालवला असं सांगितलं जातंय.
ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि त्यांच्या फ्लोरिडातल्या निवासस्थानाहून ते सोमवारी, 3 एप्रिलला न्यूयॉर्कला येण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी ट्वीट करून म्हटलं की हा विच हंटचा प्रकार आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधल्या ट्रंप टॉवरबाहेर लोकांची आणि समर्थकांची गर्दी आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
2016 साली ट्रंप यांनी स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्नस्टारला 1,30,000 डॉलर्स दिल्याचा आरोप आहे.
ही 2006 ची गोष्ट आहे. तेव्हा ट्रंप 'व्हाईट हाऊस'पासून कित्येक मैल दूर होते.
डॅनिअल्स यांच्या मते त्या ट्रंप यांना कॅलिफोर्निया आणि नेवाडा या राज्यांच्या सीमेवर असलेल्या एका रिसॉर्टवर भेटल्या होत्या.
2011 मध्ये त्यांनी Touch weekly या मासिकाला एका मुलाखत दिली होती. ती संपूर्ण मुलाखत 2018 मध्ये प्रकाशित झाली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की ट्रंप यांनी त्यांना एकदा जेवायला बोलावलं आणि त्या ट्रंप यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेल्या होत्या.
“ट्रंप त्यांच्या खोलीत सोफ्यावर रेलून बसले होते. त्यांनी पायजमा घातला होता,” असं त्यांनी मुलाखतीत सांगितलंय.
डॅनियल यांनी आरोप लावला की त्यादिवशी त्यांनी सेक्स केला. ट्रंप यांच्या वकिलांनी हे धादांत खोटं असल्याचं सांगितलं.
डॅनियल यांचं म्हणणं खरं असेल तर हे ट्रंप यांच्या सगळ्यांत लहान मुलाच्या जन्माच्या चार महिन्यानंतर झालं असेल.
एका टीव्ही मुलाखतीत त्यांनी आरोप लावला होता की ट्रंप यांनी या अफेअरबद्दल बोलण्यास मनाई केली होती. ही मुलाखत 2018 मध्ये झाली होती.
2011 मध्ये एक व्यक्ती तिला लास वेगासच्या एका कार पार्किंगमध्ये भेटला होता. त्या व्यक्तीने ट्रंप यांना एकटं सोड अशा शब्दात डॅनिअल यांना धमकी दिली होती, असासुद्धा त्यांचा दावा आहे.
हे सगळं प्रकरण आताच का बाहेर आलं आहे?
2018 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने एक लेख प्रकाशित केला होता. त्यात असा दावा करण्यात आला होता की ट्रंप यांचे वकील मायकेल कोहेन यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये 1,30,000 डॉलर डॅनिअल्स यांना दिले.
नोव्हेंबर 2016 मध्ये ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. डॅनिअल National Enquirer या वृत्तपत्राकडे त्यांची कहाणी विकण्यासाठी गेल्या होत्या असाही दावा करण्यात आला होता.
मात्र आमच्यात या प्रकरणाविषयी कोणतीही वाच्यता न करण्याबद्दल करार झाला आहे, असं त्यांनी या वर्तमानपत्राला सांगितलं.
हे बेकायदेशीर आहे का?
वकिलाला असे पैसे देणं बेकायदेशीर नाही. मात्र जेव्हा ट्रंप यांनी कोहेन यांना पैसे दिले तेव्हा ते कायदेशीर फी म्हणून दिले.
सरकारी वकिलांचा आरोप आहे की ट्रंप यांनी त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये अफरातफर केली आहे. हा अमेरिकेत गुन्हा आहे.
ट्रंप यांची तेव्हाची निवडणूक कायद्याच्या विरोधात आहे, असंही सरकारी वकिलांचं मत आहे. कारण मतदारांना या अफेअरबद्दल काही कळायला नको म्हणून हा पैसा डॅनियल यांना देण्यात आला होता.
एखादा गुन्हा लपवणं मूळ गुन्ह्यापेक्षा मोठा गुन्हा मानला जातो.
आता ट्रम्प 2024ची निवडणूक लढवू शकतात का?
होय. ट्रम्प हे अजूनही 2024 ची निवडणूक लढवण्यास पात्र आहे.
त्यांच्यावरील कोणतेच आरोप त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाहीत.
अमेरिकेच्या घटनेनुसार, राष्ट्राध्यक्ष होण्यासाठीच्या पात्रता निकषांमध्ये स्वच्छ गुन्हेगारी रेकॉर्डचा उल्लेख नाही.
महाभियोग चालवून अपात्र ठरलेल्यांना आपलं पद नक्कीच गमवावं लागतं. मात्र, ट्रम्प यांनी त्यांच्यावरील दोन्ही महाभियोग चाचण्यांमधून सहीसलामत सुटका करून घेतली होती.
बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झुर्कर यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणतात, “खरं तर, अमेरिकेच्या कायद्यात एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या उमेदवाराला प्रचारापासून रोखणं किंवा निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करणं, असं कुठेही म्हटलेलं नाही. अगदी तुरुंगात गेला तरी त्याला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही, असं काहीही कायद्यात सांगितलेलं नाही.”