अभिनंदन वर्तमान यांनी आमचं F 16 विमान पाडलंच नाही- पाकिस्तानचा दावा
बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:21 IST)
विंग कमांडर पदावरून बढती मिळून ग्रुप कॅप्टन बनलेले अभिनंदन वर्तमान यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानचं एक एफ16 फायटर जेट पाडलं होतं, हा दावा पाकिस्ताननं पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षात शौर्य आणि धाडस दाखवल्याबद्दल भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्तमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2019 मध्ये वीर चक्र देऊन सन्मानित केलं आहे.
भारतात त्यांचं प्रचंड कौतुक केलं जात आहे, मात्र पाकिस्ताननं भारताच्या दाव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त भारतीय जवान ठार झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं रात्रीच्या वेळी नियंत्रण रेषा ओलांडत बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवाही संघटनेच्या 'प्रशिक्षण शिबिरांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याचा दावा केला.
दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या हवाई दलाचं विमान भारतीय हद्दीत दाखल झालं आणि डॉगफाइटमध्ये भारतीय हवाई दलाचे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं लढाऊ विमान क्रॅश झालं. त्यामुळं ते पाकिस्तानात पोहोचले होते. त्याठिकाणी पाकिस्ताननं त्यांना पकडलं होतं. पण दोन दिवसांनी 1 मार्च 2019 ला त्यांना सोडण्यात आलं आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं.
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी त्यांच्या मिग-21 ने पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक एफ-16 विमान पाडल्याचा दावा, भारतानं केला आहे.
पाकिस्ताननं काय म्हटलं?
याच दाव्याबाबत पाकिस्ताननं पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननं यापूर्वीही हे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
"एका भारतीय पायलटनं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडल्याला भारताचा आधारहीन दावा पाकिस्तान फेटाळत आहे," असं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं म्हटलं आहे.
पाकिस्तानची सर्व एफ-16 विमानं पाहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यादिवशी पाकिस्तानचं कोणतंही एफ-16 विमान पाडलं नव्हतं, याला दुजोरा दिला आहे, असा दावाही पाकिस्ताननं केला आहे.
"भारताचा हा दावा खोटा असून. भारतीय नागरिकांना खूश करण्यासाठी आणि अपमान लपवण्यासाठी केलेला हा खोटा दावा आणि काल्पनिक कथांचा उत्तम नमुना आहे," असंही पाकिस्ताननं म्हटलं.
"शौर्याच्या 'काल्पनिक' घटनांसाठी अशाप्रकारे लष्करी गौरव करणं लष्कराच्या मूल्यांच्या आणि मापदंडांच्या विरोधी आहे. भारतानं हा गौरव करून स्वतःचीच खिल्ली उडवली आहे," असं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
"भारताच्या शत्रूत्वाच्या चुकीच्या विचारानं प्रेरीत आक्रमक कारवाईनंतरही पायलट (अभिनंदन वर्तमान) यांना सोडणं हा शांतता राखण्याच्या पाकिस्तानच्या इच्छेचा पुरावा होता," असं या वक्तव्यात अभिनंदन यांच्या सुटकेबाबत पाकिस्ताननं म्हटलं.
"27 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानच्या हवाई दलानं भारताची दोन विमान पाडली होती. त्यात एक मिग-21 बायसन होतं. ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आलं होतं. पायलटला पाकिस्तानच्या लष्करानं पकडलं होतं. त्यानंतर सौहार्दाच्या भावनेनं त्यांना सोडण्यात आलं होतं.
पाकिस्तानच्या हवाई दलानं सुखोई 30 एमकेआय हे विमानही पाडलं होतं, ते भारताच्या हद्दीत कोसळलं होतं. त्याचदिवशी भारतानं त्याचंच एमआय17 हेलिकॉप्टर चुकून श्रीनगरजवळ पाडलं होतं. सुरुवातीला नकार दिल्यानंतर भारतानं ते मान्य केलं होतं," असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं.
पाकिस्तानहून परतल्यानंतर अभिनंदन विमान उड्डाण करणार का याबाबत अनेक शंका होत्या. पण सहा महिन्यांनी त्यांनी पुन्हा उड्डाण घेतलं. याच महिन्यात (नोव्हेंबर 2021 मध्ये) त्यांना ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या पायलटला डॉगफाइट दरम्यान "कर्तव्याची असाधारण भावना" दर्शवण्यासाठी भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या युद्धकालीन शौर्य पदकानं सन्मानित केलं जात आहे, असं वीर चक्रच्या प्रमाण पत्रावर लिहिण्यात आलं आहे.
"राष्ट्रपती कोविंद यांनी विंग कमांडर (आता ग्रुप कॅप्टन) अभिनंदन वर्तमान यांना वीर चक्र प्रदान केलं आहे. त्यांनी प्रचंड शौर्य आणि धाडस दाखवलं. स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता शत्रूसमोर शौर्य दाखवत कर्तव्याच्या भावनेचं प्रदर्शन केलं," असं राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं.
केंद्र सरकारनं 2019 मध्येच वर्तमान यांना वीर चक्र देण्याची घोषणा केली होती.
सोशल मीडियावर वाद
अभिनंदन वर्तमान यांना वीर चक्रनं सन्मानित केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारत आणि पाकिस्तानचे यूझर्स त्यांच्या देशाच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत.
पाकिस्तानमधील सोशल मीडिया यूझर्स या सन्मानामागचं सत्य आणि भारताच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर भारताचे समर्थक अभिनंदन यांच्या शौर्याचं कौतुक करत आहेत.
"अभिनंदन यांच्या मनात असा विचार असेल की, 'मला कुठे घेऊन जात आहात. मी काय केलं... भारताच्या राष्ट्रपती भवनात कॉमेडी चित्रपटाचं शूटिंग झालं," अशी पोस्ट पाकिस्तानचे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी केली.
"आज भारताच्या फायटर पायलटला पाकिस्तानचं एफ16 जेट पाडण्यासाठी शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पण प्रत्यक्षात ते विमान पाडलं नसल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता," असं ट्वीट आशिया प्रोगामचे उपसंचालक मायकल कुगलमॅन यांनी केलं.
"औद्योगिक कारणांचा विचार करता अमेरिका कधी वेगळा दावा का करेल? पण तुम्ही तर एक नव्हे दोन विमानं पाडली आणि दोन पायलटला अटक केली, असा दावा केला होता. पण नंतर तुम्हीच दव्यावरून पलटले," असं उत्तर एका भारतीय यूझरनं दिलं.
"राष्ट्रीय आपत्ती - स्वतःचंच विमान पाडून तुकडे केल्याबद्दल आणि युद्ध बंदी बनल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं," असं जर्मनीत पाकिस्तानचे राजदूत डॉ. मोहम्मद फैसल यांनी पोस्ट केलं.
"अभिनंदन यांना पुरस्कार मिळायलाच पाहिजे होता, पण एफ16 विमान पाडण्यासाठी नाही. कारण ते कधी घडलंच नाही. तर शत्रूच्या हवाई हद्दीत बिनधास्तपणे शिरण्यासाठी पुरस्कार द्यायला हवा. योग्य शत्रूचा कायम सन्मान करायला हवा," असं एका पाकिस्तानी यूझरनं लिहिलं.
"लष्करी पुरस्कारांबाबतची अडचण म्हणजे, ती विनाकारण, निरर्थकपणे दिली जातात. मला ग्वाटेमालामध्ये अमेरिकेनं दखल दिल्यानंतर दिलेल्या पुरस्कारांची आठवण येत आहे. त्यावेळी जेवढे सैनिक त्या कारवाईत सहभागी होते, त्यापेक्षा अधिक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते," असं मत संरक्षण तज्ज्ञ आयेशा सिद्दीका यांनी मांडलं.
एफ16 क्रॅश झालं होतं का?
एप्रिल 2019 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध 'फॉरेन पॉलिसी' नावाच्या एका मॅगझिनमध्ये एक लेख आला होता. त्यात "अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानांची संख्या मोजली आहे. ती पूर्ण आहे," असं त्यात म्हटलं होतं.
फॉरेन पॉलिसी मॅगझिननुसार एफ-16 लाइन ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण रेषेवर डॉग फाइटमध्ये सहभागी होतं, तसंच त्यातून एआयएम-20 मिसाइलही फायर करण्यात आलं. मात्र ते पाकिस्तान भागातून स्वसंरक्षणासाठी फायर केलं होतं, की भारतीय काश्मीरमध्ये घुसून फायर केलं, याबाबत निश्चित सांगितलं जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं होतं.
"नेहमी सत्याचाच विजय होतो आणि तेच सर्वोत्तम धोरण आहे. युद्धाचा उन्माद पसरवून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आणि पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान पाडण्याचा डाव उलटला आहे. पाकिस्तानच्या ताफ्यातून एकही एफ-16 विमान बेपत्ता नसल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे," असं त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.