कमला हॅरिस 85 मिनिटांसाठी अमेरिकेच्या 'राष्ट्राध्यक्ष' का झाल्या?
शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (11:14 IST)
अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी काल 19 नोव्हेंबर रोजी काही प्रमाणात स्वरुपात सांभाळली. त्यामुळे ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या अमेरिकेच्या पहिल्याच महिला बनल्या आहेत.
या पदाची त्यांच्याकडे 85 मिनिटे सूत्रं होती. राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे वैद्यकीय कारणामुळे काही काळ कामासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
जो बायडन यांची शुक्रवारी (19 नोव्हेंबर) कोलोनोस्कोपी ही तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान बायडन यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं होतं.
प्रोटोकॉलनुसार, या कालावधीसाठी 57 वर्षीय कमला हॅरीस यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार तात्पुरता सोपवण्यात आला होता.
तपासणीनंतर बायडन यांच्या डॉक्टरांनी ते आता सुदृढ असल्याबाबत तसंच कामाची जबाबदारी सांभाळू शकत असल्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढलं.
बायडन यांची ही तपासणी त्यांच्या वाढदिवसाच्या (20 नोव्हेंबर) एक दिवस आधी पार पडली.
या दरम्यान, कमला हॅरीस यांनी त्यांच्या नेहमीच्या व्हाईट हाऊस वेस्ट विंग येथील कार्यालयातूनच कामकाज सांभाळला.
कमला हॅरीस या गेल्या वर्षी बायडन यांच्यासोबत उप-राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यासोबतच या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या. तसंच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय- दक्षिण आशियाई अमेरिकन व्यक्तीही बनल्या होत्या.
व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन प्साकी यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकार तात्पुरते हस्तांतरीत करणं हा एक प्रोटोकॉलचा भाग आहे. ही प्रक्रिया अमेरिकेच्या राज्यघटनेत नमूद करण्यात आलेली आहे."
जॉर्ज डब्ल्यू बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना 2002 आणि 2007 मध्ये अशीच प्रक्रिया राबवण्यात आली होती, असं ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे उपचारानंतर पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आता मला छान वाटतं, असं ते म्हणाले.
78 वर्षीय जो बायडन यांच्यावरील कोलोनोस्कोपीची तपासणी यशस्वी झाली. . आता बायडन यांची प्रकृती उत्तम असून ते त्यांची जबाबदारी पुन्हा सांभाळण्यास ते आता सज्ज आहेत, असं राष्ट्राध्यक्षांचे डॉक्टर केविन ओकॉनर यांनी सांगितलं.
जो बायडन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे आजपर्यंतचे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. त्यांनी यापूर्वी आपली संपूर्ण शारीरिक चाचणी डिसेंबर 2019 मध्ये करून घेतली होती.
त्यावेळी बायडन यांच्या डॉक्टरांनी त्यांना निरोगी आणि उत्साही असं संबोधलं होतं. तसंच राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते पूर्णपणे फिट असल्याचंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.
कमला हॅरीस कोण आहेत?
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सोबतच उपाध्यक्षपदी असणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या व्यक्तीही आहेत.
यापूर्वी दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर 1984 साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता.
अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आजवर कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नव्हती आणि आजवर कुठलीच महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षही झालेली नाही.
कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरिस यांनी एकदा जो बायडन यांना डेमोक्रेटिक पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या.
त्यानंतर डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडन यांच्या संगतीने कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली.
कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे. पोलीस सुधारणेच्या त्या कट्टर समर्थक आहेत.
कमला हॅरीस यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा जन्म भारतातला, तर वडिलांचा जन्म जमैकामधला. हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं. स्वतःच्या ओळखीवर आपण समाधानी असल्याचं आणि स्वतःला केवळ एक अमेरिकन नागरिक म्हणणं आवडत असल्याचं त्या सांगतात.
2019 साली वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, राजकीय नेत्यांनी वर्ण आणि पार्श्वभूमी या आधारावर कुठल्याही विशिष्ट भूमिकेत शिरता कामा नये. त्या म्हणाल्या होत्या, "मला म्हणायचं आहे की मी जी आहे ती आहे. मला त्याचा आनंद आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण मी पूर्णपणे आनंदी आहे."
हॉर्वर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या.
कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली सर्वप्रथम त्या खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.