एकनाथ षष्ठी : असे हे संत म्हणजेच एकनाथ महाराज

मंगळवार, 26 मार्च 2019 (09:46 IST)
संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा अद्‌भुत आहे. त्यांच्या कृपेने तिन्ही लोकांत कीर्ती होते, मुक्ती मिळते. तन-मन-धन संताला अर्पण करतात, तेव्हा सद्‌गुरुंचा साक्षात्कार होतो. निर्गुण, निराकार अशा परम तत्वाचा साक्षात्कार जो शिष्याला करून देतो, तोचसं त होय. जो शास्त्राचे उत्तम अध्यन करतो, त्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि शिष्यांना त्याचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो, त्यालाच संत असे म्हणतात. असे हे संत म्हणजेच एकनाथ महाराज.
 
नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे. नाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी! नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पितृसुख नव्हते, वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले ते काय प्रतीचे होते ते तुम्ही सारे जाणताच. नाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते.
 
शके 1521 फाल्गुन वद्य षष्ठीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली म्हणून या षष्ठीस नाथषष्ठी म्हणतात. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी या एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. एकनाथी भागवत ही भगवंताच्या अकराव्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे, ज्ञानेश्र्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे कामही एकनाथांनी केले. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नाथांनी कधीही मानला नाही. काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतील गंगेचे पाणी नाथांनी तहानेने तळमळणार्‍या गाढवाला पाजले.
 
ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्र्वराने श्रीखंड्या बनून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुलवृत्तांत. एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते. एक यवन त्यांच्यावर थुंकला. नाथांनी परत जाऊन आंघोळ केली. तो परत थुंकला, असे नाथांनी त्या दिवशी 108 वेळा स्नान केले. शेवटी वन थकला. नाथांनी क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले, 'वेड्या, मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गोदावरी स्नान घडले.' काय हा संगम! नाथषष्ठीला भानुदास, एकनाथ नाम घोषणांच्या गदारोळाने पैठणचा आसंत भरून जातो.
 
समाजाच्या सर्व थरात परमार्थ शिरावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला. नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्ठीचा उत्सव गावोगाव होतो. नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्‌गुरुशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होत आहे. परामर्थ सफल व्हावयाचा असेल तर 6 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. 1 शिष्य, 2 गुरु, 3 सेवा, 4 उपदेश, 5 ज्ञान, 6 कृतार्थता प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरुपण संपते. शिष्याचे शिष्यपणा संपते व दोघांचे एकाच तिथीला म्हणजे एकाच क्षणात निर्वाण होते. गुरु आणि शिष्य एकरूप होतात. 
 
नाथ षष्ठीमध्ये हे सहा योग एकत्र येतात. षष्ठी म्हणजे सहाचा समुदाय. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षडरिपूंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे, दीन केले आहे पण श्रीसंत एकनाथ महाराजांनी या सहांना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथषष्ठी म्हणतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती