‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.
तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते.
देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.