हरतालिका- आधुनिक संदर्भात

दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.

म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.

आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.

आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्‍यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?

  WD
उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.

वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.

आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.

सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्‍याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.

माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.

चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.

हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.