कोरोना : मध्य प्रदेशमध्ये खरंच एका दिवसात 17 लाख लोकांचं लसीकरण झालं?
रविवार, 4 जुलै 2021 (13:08 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनला लसीकरणासंदर्भात नवं धोरण लागू होत असल्याचं जाहीर केलं. त्याच दिवशी मध्य प्रदेशात विक्रमी 17 लाख 44 हजार जणांना लशीचा डोस देण्यात आला.
सरकारी आकडेवारीनुसार, देशात त्यादिवशी 88 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. सर्वाधिक लसीकरण मध्य प्रदेश राज्यात झालं.
मध्य प्रदेशात सत्तारूढ भाजपच्या शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने 'सर्वाधिक लसीकरण करणारं राज्य' असा जोरदार प्रचार केला.
मात्र काही दिवसातच लसीकरणाचं सत्य समोर आलं.
विक्रमी आकडेवारीसंदर्भात अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या. 13 वर्षीय किशोरला 56 वर्षांचा प्रौढ व्यक्ती दाखवण्यात आलं होतं. त्यांना असा मेसेज पाठवण्यात आला की, तुमचं लसीकरण झालं आहे. एका व्यक्तीच्या नावावर तीनवेळा लसीकरण दाखवण्यात आलं.
मध्य प्रदेशचे ज्येष्ठ मंत्री विश्वास सारंग या आरोपांनी चिंतित नाहीत. यासंबंधी विचारल्यावर त्यांनी म्हटलं की, याची चौकशी केली जाईल.
विक्रमी लसीकरणाच्या दिवशी भोपाळच्या रजत डोंगरे यांना मोबाईलवर मेसेज आला की, त्यांचा मुलगा वेदांतचं लसीकरण झालं आहे. वेदांत 13 वर्षांचा आहे. सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. मग वेदांतला लस देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
रजत डोंगरे यांनी कोविन पोर्टलवरून लस देण्यात आल्याचं प्रमाणपत्रदेखील डाऊनलोड केलं.
अन्य कामासाठी वेदांतची ओळख पटवणारी कागदपत्रं स्थानिक सरकारी कार्यालयात जमा केली होती असं रजत सांगतात. याच कागदपत्रांचा वापर करून वेदांतचं लसीकरण झाल्याचं दाखवण्यात आलं असावं असं रजत सांगतात.
हे प्रमाणपत्र रद्द व्हावं यासाठी रजत सरकारी कार्यालयांमध्ये खेटे घालत आहेत. मात्र आता प्रमाणपत्र रद्द करणं कठीण असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. मात्र जेव्हा लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल तेव्हा तुमच्या मुलाला लस देण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी रजत यांना दिलं आहे.
वेदांत यांनी सांगितलं की, मेसेजनुसार माझं वय 56 आहे. मेसेजमध्ये त्यांचा पत्ता कुठलातरी वेगळाच आहे.
अमिताभ पांडेय यांना लसीकरण झाल्याचा मेसेज 22 जून रोजी आला. मात्र त्यात त्यांचं नाव अमिताभ पांडेयच्या ऐवजी भूपेंद्र कुमार जोशी लिहिण्यात आलंय.
मेसेजमध्ये लिहिण्यात आलं की, "तुम्हाला लशीचा पहिला डोस देण्यात आला. अमिताभ पांडेय यांनी एप्रिलमध्ये लशीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस मिळणं बाकी आहे."
हसत हसत ते म्हणतात, माझं नाव अमिताभ पांडेयच्या ऐवजी भूपेंद्र कुमार जोशी कधी झालं माहिती नाही.
त्यांच्या मते 21 जूनला ते लसीकरणासाठी कुठेही जायचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या घरच्यांपैकीही यादिवशी कोणी लसीकरणासाठी गेलं नव्हतं.
लोकांच्या तक्रारी
भोपाळ शहरातल्या नुजहत यांनाही लस देण्यात आल्याचा मेसेज आला, मात्र प्रत्यक्षात त्यांना लस मिळालेली नाही.
नुजहत सांगतात, "अशा पद्धतीच्या घोळाचा फटका बसतो. अनेकांना तसंही लस घ्यायची नाहीये. ज्यांना लस न मिळता मेसेज आला आहे ते नंतर लस घेणारच नाहीत. कारण आता त्यांच्याकडे लस घेतल्याचं प्रमाणपत्र आहे."
राजधानी भोपाळपासून दूर परिस्थिती वेगळी नाही.
सतना मध्ये चयनेंद्र पांडेय यांच्या मोबाईलमध्ये तीन मेसेज आले. तिन्ही वेगवेगळ्या नावांनी आहेत. पहिल्या मेसेजमध्ये कालिंदी, दुसऱ्या मेसेजमध्ये चंदन तर तिसऱ्या मेसेजमध्ये कार्तिक राम असं नाव लिहिण्यात आलं आहे. त्यांना लस मिळाल्याचं लिहिलं आहे.
प्रत्यक्षात चयनेंद्र यांना लशीचा डोस मिळालेला नाही.
लसीकरणाच्या नोंदणीचं काम पाहणारे भोपाळ परिसराचे अधिकारी संदीप केरकट्टा यांनी सांगितलं की, लस न मिळता मेसेज कसे आले तसंच एकाच व्यक्तीला अनेक मेसेज कसे आले यासंदर्भात तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकं काय घडलं ते सांगू शकू.
विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा म्हणाले, "विक्रमी लसीकरण दाखवण्याच्या नादात सरकारला लोकांच्या जीवाचीदेखील पर्वा नाही. सरकारने प्रामाणिकपणे लोकांना लस द्यावी. जेणेकरून तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार नाही".
मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विश्वास सारंग एवढंच सांगतात की,प्रकरणाची चौकशी केली जाईल
जनस्वास्थ अभियान या स्वयंसेवी संस्थेचे अमूल्य निधी यांच्या मते, "लसीकरणासारख्या कामात पारदर्शकता खूपच महत्त्वाची आहे. सरकारने कोरोनाविरोधात लढाईसाठी लस हाच अंतिम उपाय असल्याचं मानून विक्रमी लसीकरणाचे दावे केले जात आहेत".
त्यांच्या मते मास्क परिधान करणं, रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधं आणि उपकरणं उपलब्ध करून देणं यासारख्या पायाभूत गोष्टींवर सरकारने लक्ष केंद्रित करायला हवं जेणेकरून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईल.