1861 ते 1901 या काळात भोपाळ संस्थानची प्रमुख असलेल्या बेगम शहजहान हिने स्वत: राहण्यासाठी राजमहाल बांधला परंतू याचे सौंदर्य इतके अप्रतिम होते की त्याचे ताजमहाल असे आपोआपच नामकरण झाले. या महालात 120 खोल्या आहेत. 8 मोठे हॉल आहेत. हा बांधण्यासाठी 13 वर्षे लागली. सतरा एकर परिसरात याचे बांधकाम पसरले आहे. यासाठी त्याकाळात तीन लाख रूपये खर्च आला होता. हा महाल तयार झाल्यानंतर तीन वर्षे बेगमने जल्लोष साजरा केला होता.
या ताजमहालाबाबत एक आठवण सांगितली जाते. याच्या प्रवेशद्वारावर एक विशिष्ट प्रकारची काच बसवण्यात आली होती, त्यातून परावर्तीत होणारी किरणे प्रवेश करणार्या व्यक्तीच्या डोळ्यावर पडत. त्यामुळे त्याला प्रवेश करताना खाली मान घालूनच आत जावे लागे. एका ब्रिटिश अधिकार्याला हा अपमान वाटला, म्हणून त्याने बेगमला ती काच काढण्याचा हुकूम केला. बेगमने तो साफ नाकारला. दहावेळा इशारा देऊनही बेगमने ती काच काढली नसल्याचे पाहून अधिकारी स्वत: तेेथे आला. त्याने आपल्या सैनिकांकरवी बंदुकीचे शंभर राऊंड फायर केले, तरीही ती काच फुटली नाही. या महालातून एक भुयार असून ते 40 किलोमीटर लांब असलेल्या रायपूर शहरात जाते, असे सांगितले जाते.