पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केल्या 'या' 16 मोठ्या घोषणा
रविवार, 15 ऑगस्ट 2021 (22:45 IST)
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधताना शेतकरी, मुली आणि तरुणांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. काय म्हणाले पंतप्रधान बघूया.
1) सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश
पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांपैकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे देशभरातील मिलिट्री स्कूल म्हणजेच सैनिकी शाळांमध्ये यापुढे मुलींनाही प्रवेश मिळेल. ते म्हणाले, "अलिकडच्या काळात मिझोरममधल्या सैनिकी शाळेने मुलींनाही प्रवेश द्यायला सुरुवात केली. यानंतर देशातील सर्व सैनिकी शाळा मुलींसाठी खुल्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे." याआधी सैनिकी शाळांमध्ये केवळ मुलांनाच प्रवेश दिला जायचा.
2) मातृभाषेला प्राधान्य देण्यावर भर
भाषा विकासाच्या मार्गातील अडथळा ठरता कामा नये, असं म्हणत पंतप्रधानांनी मातृभाषेला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "मातृभाषेत लोक प्रगती करू शकतात. मातृभाषेत शिक्षण घेऊन प्रगती केली तर त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जनतेच्या प्रतिभेला स्थान दिलं जाणार आहे आणि म्हणूनच हे धोरणही दारिद्र्यविरोधातील लढ्यात मोठं अस्त्र ठरणार आहे." "मातृभाषेचं महत्त्व आहे. प्रतिष्ठा आहे. खेळाच्या मैदानात भाषा अडसर ठरली नाही. या देशाचा तरुण खेळतोय आणि बहरतो आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळांनाही महत्त्व देण्यात आलं आहे. आयुष्याच्या पूर्णत्वासाठी खेळही गरजेचं आहे."
3) चीन आणि पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा
भारत मोठ्या धाडसाने दहशतवाद आणि विस्तारवादाच्या आव्हानाचा सामना करत असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून भारताने कायमच पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. तर विस्तारवादाचा विषय काढत मोदींनी चीनवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून भारताने आपल्या शत्रूंना कठोर निर्णय घेण्यास सक्षम अशा नवीन आणि आधुनिक भारताचा उदय होत असल्याचा संदेश दिला आहे."
4) नवीन शैक्षणिक धोरण
भारताचं नवं शिक्षण धोरण दारिद्र्याशी मुकाबला करणं आणि 21 व्या शतकाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आखण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिवाय, नवीन शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांनाही महत्त्व देण्यात येणार आहे. इतकंच नाही या नव्या धोरणात खेळ अतिरिक्तऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा अविभाज्य भाग असणार आहे.
5) ध्येयपूर्ती असेल लक्ष्य
आजवर देशाच्या कानाकोपऱ्यात सोयी-सुविधा पुरवणं, हे आतापर्यंतच्या सरकारांचं लक्ष्य होतं, मात्र, यापुढे सर्व सोयी-सुविधा 100% गरजूंपर्यंत पोहोचणं, हे लक्ष्य असायला हवं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले, "आता आम्हाला विकासाकडे नाही तर पूर्णत्वाकडे जायला हवं. म्हणजे सर्व सोयी-सुविधा देशातील 100% जनतेला मिळाव्या, हे आपलं लक्ष्य असायला हवं." "प्रत्येक कुटुंबाला सर्व सुविधा मिळायला हव्या आणि आता आपल्याला सॅच्युरेशनकडे जायला हवं. हे आपलं लक्ष्य असायला हवं."
6) शहर आणि खेड्यातली दरी दूर करण्याची वेळ
शहर आणि खेड्यातली दरी दूर करण्यासाठी आता गावागावांपर्यंत ऑप्टिकल केबलचं जाळं पोहोचत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "अनेक गावांमध्ये स्त्रिया सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सहभागी होऊन नवीनवीन उद्योग सुरू करत आहेत. अशा महिलांची उत्पादनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावीत, यासाठी सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल." सरकार गरीब आणि वंचितांसाठी आरक्षण व्यवस्था निश्चित करण्याचं काम करत असून यासंबंधीचं विधेयक मंजूर करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. वंचितांची ओळख पटवण्याचं काम राज्य सरकारांवर सोपवण्यात आल्याचंही ते म्हणाले.
7) अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य
शहरांप्रमाणेच खेड्याच्या विकासाकडेही लक्ष देणं गरजेचं असल्यचं पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले, "गावात शेतकऱ्यांकडे छोट्या-छोट्या जमिनी असतात. कुटुंबात वाटणी झाल्यावर जमिनीचे आणखी छोटे-छोटे तुकडे होत जातात. यापूर्वीच्या धोरणांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आलं नव्हतं. मात्र, आता त्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जात आहेत. येत्या काळात ब्लॉक स्तरावर गोदामं उभारण्याची मोहीम राबवली जाईल."
ते म्हणाले, "देशातल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे मोठी शेती नाही. यापूर्वी देशाच्या धोरणांमध्ये लहान शेतकऱ्यांसाठी धोरण नव्हतं. मात्र, आता देशात कृषी सुधारणा लागू करण्यात येत आहेत. पीक विम्यात सुधारणा करणं सुरू आहे. लहान शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळावेत. सोलार योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. लहानातल्या लहान शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन पीएम कृषी सन्मान योजना राबवली जात आहे. 'छोटा किसान बने देश की शान' हे आमचं स्वप्न आहे. येणाऱ्या काळात देशाच्या लहान शेतकऱ्यांची ताकद वाढवायला हवी."
8) कृषी क्षेत्रात वैज्ञानिकांचा सल्ला
संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना भारताने कोरोना लस विकसित केली आणि लोकांना देण्याचं काम केल्याचं पंतप्रधान म्हणाले. असं झालं नसतं तर भारतात किती भयंकर परिस्थिती उद्भवली असती, याची कल्पनाच केलेली बरी, असंही ते म्हणाले. येत्या काळात देशाची लोकसंख्या बघता त्यांच्या अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्रातही वैज्ञानिकांचा सल्ला घेण्याची वेळ आल्याचं ते म्हणाले.
9) नागरिकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी होणार
देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत सरकारी सोयी-सुविधा सुलभपणे पोहोचवण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सुधारणा लागू केल्या जातील, असंही मोदी म्हणाले. ते म्हणाले, "शहर आणि गावात सारख्याच सोयी-सुविधा असाव्या, जिथे नागरिकांच्या आयुष्यात सरकारचा विनाकारण हस्तक्षेप नसेल, जिथे जगातील सर्व आधुनिक पायाभूत सुविधा असतील असा भारत निर्माण करणं, हेच या अमृत काळातील लक्ष्य आहे. यासाठी बदलत्या काळानुरूप आपणही बदलायला हवं."
नागरिकांच्या जीवनात पूर्वी सरकार स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसायचं, मात्र, आजच्या आधुनिक काळात याची गरज नाही म्हणत नागरिकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप शक्य तेवढा कमी करायला हवा, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
ते म्हणाले, "अनावश्यक कायदे आणि प्रक्रियेच्या जाळ्यातून जनतेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यासाठी सरकारने अलिकडच्या काळात 15 हजार अडचणी (compliances) दूर केल्या आहेत. आपल्याला 'ईज ऑफ लिव्हिंग' आणि 'ईज ऑफ डुईंग बिझनेस'ची नितांत गरज आहे. डझनभर कामगार कायद्यांना चार कोडमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे आणि कररचनेतही अनेक बदल केले जात आहेत."
10) ईशान्य भारताला संपूर्ण भारताशी जोडणार
आपल्या संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, "उत्तर भारतात सरकार कनेक्टिव्हिटीचा इतिहास रचत आहे आणि ही कनेक्टिव्हिटी केवळ पायाभूत सुविधांची नाही तर मनं जोडणारी आहे. लवकरच उत्तर भारत संपूर्ण देशाशी रेल्वे जाळ्याच्या माध्यमातून जोडला जाईल."
11) जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेणार
जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेसाठा समिती स्थापन करण्याचं काम पूर्ण झालंय आणि तिथे विधानसभा निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. "तिथे ऑईल फार्म, हर्बल फार्मिंग आणि सेंद्रिय शेतीची अमाप संधी आहे. येणाऱ्या काळात यावरही काम केलं जाईल."
12) नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा
पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करताना ऊर्जा क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर व्हावं आणि हळू-हळू अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश दिला. 2030 पर्यंत 450 गिगाव्हॅट अक्षय्य ऊर्जा निर्मितीचं आपलं लक्ष्य आहे आणि मुदतीआधीच हे लक्ष्य आपण पूर्ण करू, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
13) 14 ऑगस्ट रोजी 'फाळणी भयस्मृती दिन'
यापुढे 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी भयस्मृती दिन' म्हणून पाळण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले, "त्यावेळी ज्यांनी अडचणींचा सामना केला आणि ज्यांच्यावर अंत्यसंस्कारही होऊ शकले नाही, त्यांच्या आठवणींना 14 ऑगस्ट रोजी उजाळा देण्यात येईल."
15) 75 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पुरेशा पायाभूत सुविधा नसतील तर देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नवीन जलमार्ग किंवा नवी ठिकाणं सी-प्लेनने जोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेही वेगाने आधुनिक रंगात रंगताना दिसत आहे."
"75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशात पुढील 75 आठवडे अमृत महोत्सवाचं पालन केलं जाईल. येणाऱ्या काळात देशातल्या प्रत्येक कोपऱ्याला जोडण्यासाठी 75 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू केल्या जातील." सरकार लवकरच 100 लाख कोटी रुपयांची एक नवी गतीशक्ती योजनाही सुरू करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. ही योजना म्हणजे देशासाठीचा नवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन असेल आणि त्यातून देशाचा सर्वांगिण (हॉलिस्टिक) विकास होईल, असंही ते म्हणाले.
या माध्यमातून स्थानिक उद्योगांना जागतिक मार्केटशी जोडलं जाईल. यातून आगामी काळात अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी संधी मिळेल आणि त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सज्ज करता येईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
16) नागरिकांनी कॅशलेस आणि स्वच्छतेचा अंगिकार करावा
देश डिजीटल होत असल्याने आपण कॅश ट्रॅन्झॅक्शन कमीत कमी करायला हवं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर रोखण्याचं आवाहनही केलं. तसंच नदी प्रदूषित करू नये आणि समुद्र किनारेही स्वच्छ ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.