कावड यात्रा मार्गावरील दुकानांच्या मुस्लीम नावांचा वाद, नेमकं काय घडलं? - ग्राउंड रिपोर्ट
रविवार, 21 जुलै 2024 (15:17 IST)
मुजफ्फरनगरच्या जवळचा बझेडी बागोवाली बायपास हरिद्वारच्या दिशेनं जातो.याठिकाणी असलेला पंजाबी ढाबा मुस्लीम आणि हिंदू मालक एकत्रितपणे चालवतात.पण आता या ढाब्यावर प्रोपरायटर (मालक) शिवाय याठिकाणी काम करणाऱ्यांची नावंही लिहिलेली आहेत.
शाहरूख नावाचा एकमेव मुस्लीम कर्मचारी याठिकाणी होता. आता त्यालाही कामावरून काढण्यात आलं आहे.
ढाब्याचे मॅनेजर प्रवीण सांगतात की, "आता इथं फक्त हिंदू कर्मचारी आहेत. वाद वाढल्यानंतर शाहरूख स्वतःच काम सोडून गेला. माझ्यामुळं इतर काम करणारे किंवा ढाब्याच्या मालकांना त्रास व्हायला नको, अशी त्याची भूमिका होती."
पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये प्रशासनानं एक आदेश जारी केला आहे. त्यात कावड यात्रेदरम्यान खाद्य पदार्थांशी संबंधित दुकानांच्या (ढाबे, रेस्तरां, फळं आणि मिठाईची दुकाने) मालकांना त्यांची आणि त्यांच्याकडं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं स्पष्ट आणि मोठ्या अक्षरांत लिहावी लागतील.
पण नंतर पोलिसांनी लोकांना स्वेच्छेनं तसं करण्यास सांगितलं असल्याचंही म्हटलं.
पोलिसांच्या मते, कावड यात्रा धार्मिक सोहळा आहे. त्यादरम्यान कोणाच्याही मनात संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ नये, तसंच त्यांना धार्मिक भावना दुखावल्या असं वाटू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पण या दुकानांच्या मालकांना मात्र हा निर्णय मुस्लिमांना 'वेगळं' पाडण्याचा प्रयत्न असल्याचं वाटत आहे.
या आदेशाचा आणखी एक परिणाम म्हणजे, आता रस्त्याच्या लागून असलेल्या बहुतांश हॉटेल आणि ढाब्यांवर काम करणाऱ्यांमध्ये मुस्लीम कर्मचारी नाहीत.
काहींनी स्वतः नोकरी सोडली आहे, तर काहींना कामावरून काढण्यात आलं आहे. काही मालकांच्या मते, 'फक्त श्रावण महिन्यात खबरदारी म्हणून असं करण्यात आलं आहे.'
मात्र, पोलिसांनी ते कोणत्याही दुकानावर गेलेले नाहीत, किंवा कुणावरही त्यांच्या दुकानावरील मुस्लीम कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याचा दबाव आणलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दरवर्षी श्रावण महिन्यात लाखो कावड यात्री हरिद्वारहून (कावड) जल घेऊन परत जाताना मुजफ्फरनगर मार्गे जातात.
त्यावेळी कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून दुकान मालकांना त्यांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची नावं दुकानाबाहेर लिहिण्यास सांगितलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलिसांच्या या आदेशानतर याठिकाणच्या बहुतांश मुस्लीम दुकानदारांनी मोठ्या अक्षरांमध्ये दुकान मालकांची आणि काम करणाऱ्यांची नावं लिहिली आहेत.
अनेक दुकानदारांनी स्वेच्छेनं असं केलं असल्याचं सांगितलं आहे. तर अनेकांनी तसं करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा दावा केला आहे.
हरिद्वारहून येणारा मुख्य मार्ग मदिना चौकातून जात मुजफ्फरनगरमध्ये प्रवेश करतो.
सध्या याठिकाणी जवळपास प्रत्येक दुकानाबाहेर पांढऱ्या फलकांवर मोठ्या मोठ्या लाल अक्षरांमध्ये मुस्लीम दुकान मालकांची नावं लिहिलेली आहेत.
दिल्लीहून हरिद्वारला जाणारा हायवे तसंच शहरातील इतर भाग आणि रस्त्यावरही तशीच स्थिती आहे.
मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह म्हणाले की, दुकानदारांना स्वेच्छेनं त्यांची नावं लिहिण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
खरी परिस्थिती काय?
प्रत्यक्षात असलेली परिस्थिती मात्र वेगळीच आहे.
खतौलीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून 'लव्हर्स टी पॉइंट'नावानं सुरू असणाऱ्या चहाच्या दुकानाचं नाव आता बदलून 'वकील साब चाय' असं झालं आहे.
दुकान चालवणारे वकील अहमद यांनी पोलिसांना यावरही आक्षेप होता, असा दावा केला आहे.
त्यांच्या मते, "पोलिसांनी सांगितल्यानंतर मी माझ्या दुकानाचे नाव बदलून वकील साब केलं तर पोलीस कर्मचारी पुन्हा माझ्याकडं आहे. या नावावरून तुम्ही मुस्लीम असल्याचं समजत नाही, असं ते म्हणाले. त्यांनी मला वकील अहमद नावाचा एक मोठा साईनबोर्ड लावण्यास भाग पाडलं."
वकील यांना त्यांच्या दुकानाचं 10 वर्ष जुनं नाव बदलल्याचं फार वाईट वाटलं.
त्यांच्या मते, "हा स्पष्टपणे मुस्लिमांना एकटं पाडण्याचा आणि धार्मिक द्वेष वाढवण्याचा प्रकार आहे. पण आम्हाला व्यवसाय करायचा आहे. प्रशासनासमोर आम्ही काय करणार?"
मुजफ्फरनगरच्याच भंगेला गावात हायवेवर चहाचं दुकान लावणारे आसिफ यांनीही एक धक्कादायक दावा केला. दुकानावर नावाचा बोर्ड लावला नाही म्हणून पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आणि तुरुंगात डांबण्याची धमकी दिल्याचं ते म्हणाले.
"स्थानिक खासदार हरेंद्र मलिक यांच्या हस्तक्षेपानंतर मला सोडण्यात आलं. पण सोडण्यापूर्वी पोलिसांनी माझ्या दुकानावरही माझ्या नावाचे मोठे बॅनर लावले," असं आसिफ म्हणाले.
'मुस्लीम कर्मचाऱ्यांना हटवण्याची सूचना'
पोलिसांनी पथकांसह ढाब्यांवर जाऊन त्याठिकाणी असलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सांगितलं होतं, असा दावाही अनेक ढाब्याच्या मालकांनी केला आहे.
या ढाब्याच्या जवळ असलेल्या दुसऱ्या एका ढाब्याचे हिंदू मालक म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी पोलीस आले होते आणि कुणी मुस्लीम काम करतं का अशी विचारणा केली होती. मी माझ्याकडे मुस्लीम कर्मचारी नाही असं सांगितलं. त्यानंतर पोलीस मुस्लीम कर्मचारी कामाला ठेवू नका अशी सूचना देऊन गेले.
या ढाब्याचे आधीचे चालक मुस्लीम होते. पण गेल्यावर्षी झालेल्या वादानंतर त्यांनी ढाबा बंद केला. आता एक हिंदू मालक हा ढाबा चालवतात.
आता नवे हिंदू मालक म्हणाले की, "जे मुस्लीम आहेत, त्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. आमच्यासारखे जे हिंदू मालक आहे, त्यांचं काम तर सुरुच आहे."
एका मालकानं ढाब्यावरून मॅनेजरसह चार मुस्लीम कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. ते म्हणाले की, "तुम्ही आमची स्थिती लक्षात घ्या. आम्हाला कोणताही वाद नको आहे."
पोलिसांचे म्हणणे काय?
मुजफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक सिंह यांनी या आरोपांवर उत्तर दिलं नाही.
ते म्हणाले की, "पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्याशिवाय आम्हाला काहीही बोलायचं नाही."
शहरातील खतौली परिसरातील अनेक दुकान मालकांनी त्यांना पोलिसांनी बळजबरी मुस्लीम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.
पण या परिसरातील एसएचओ म्हणाले की, "पोलीस कोणत्याही दुकानावर किंवा ढाब्यावर गेले नाहीत. तसंच आम्ही कुणालाही कामावरून काढण्यास भाग पाडलं नाही."
कसा सुरू झाला वाद?
हॉटेल चालकांच्या नावाच्या संदर्भातला वाद गेल्यावर्षी सुरू झाला होता. त्यावेळी स्थानिक हिंदू धर्मगुरू स्वामी यशवीर यांनी हिंदू देवतांच्या नावावर सुरू असलेले मुस्लीम मालकांचे ढाबे बंद करण्याची मागणी करत त्याविरोधात मोहीम सुरू केली होती.
स्वामी यशवीर यांच्या मोहिमेनंतर हिंदू नाव पण मुस्लीम मालक असलेल्या हॉटेल विरोधात प्रशासनानं कठोर भूमिका घेतली होती.
ही मोहीम चालवणारे स्वामी यशवीर यांच्या मते, "मुस्लीम हिंदूंच्या भावनांशी खेळण्यासाठी भोजनाला अशुद्ध आणि अपवित्र बनवतात. आम्ही गेल्यावर्षी आवाज उठवला तर अनेक मुस्लीम ढाबे बंद झाले. यावेळी आम्ही प्रशासनाला सांगितलं की, आम्हाला मुस्लीमांची काही अडचण नाही. फक्त त्यांनी त्यांची नावं मोठ्या अक्षरांत लिहावी म्हणजे हिंदू भाविक विचार करून त्यांच्या दुकानांवर थांबतील."
या मोहिमेमुळं समाजात भेदभाव निर्माण होऊ शकतो. या प्रश्नावर बोलताना यशवीर म्हणाले की, "ज्या दुकानात खायला जायचं आहे त्याच्या मालकाचं नाव माहिती असणं, हा हिंदुंचा अधिकार आहे. प्रशासनानं आमच्या मागणीवर त्याची व्यवस्था केली. संपूर्ण उत्तर प्रदेश आणि भारतात खाद्य पदार्थांशी संबंधित दुकान चालवणाऱ्यांची नावं सार्वजनिक करावी, अशी आमची मागणी आहे."
असं असलं तरी मुस्लीम व्यवसायिकांना विरोध नसल्याचा दावाही यशवीर करतात.
"कावड यात्रेतील भाविकांना ते कुणाकडून खरेदी करत आहे, हे माहिती असावं," असं ते म्हणाले.
यशवीर यांच्या मते, "हिंदू मुस्लिमांच्या दुकानावर जात नसल्यानं त्यांच्या रोजगारावर परिणाम होत असला, तरी आम्हाला त्यांच्या रोजगाराचा नाही, तर आमच्या धर्माच्या पवित्रतेचा विचार करायचा आहे."
बझेडी गावाचे रहिवासी असलेले वसीम अहमद गेल्या नऊ वर्षांपासून 'गणपती टूरिस्ट ढाबा' चालवत होते. पण गेल्यावर्षी वाद झाल्यावनंतर त्यांनी ढाबा विकला.
त्यांच्या मते, "माझं नाव वसीम अहमद आहे. सध्या काही लोक त्याच्या राजकीय अजेंड्यासाठी चर्चेत येण्यासाठी आमच्या सारख्या लोकांविरोधात प्रोपगंडा राबवत आहेत. मी 2014 पासून गणपती ढाबा चालवत होतो. गेल्यावर्षी पोलीस माझ्याकडं आले आणि माझं नाव विचारल्यानंतर, तुम्हाला ढाब्याचं नाव गणपती ठेवण्याचा अधिकार कोणी दिला असं विचारलं? त्यावर मला राज्यघटनेनं व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे," असं मी म्हटलं.
त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या ढाब्याची बदनामी करण्याची मोहीम राबवली गेली. नंतर नाईलाजानं ढाबा विकावा लागला, असा दावा वसीम अहमद यांनी केला.
जे मुस्लीम ढाबा मालक हिंदू पार्टनरच्या साथीनं ढाबा चालवत आहेत, त्यांनाही आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
'पंजाब तडका' ढाब्याचे मालक नाजिम त्यागी म्हणाले की, "गेल्यावर्षी वादानंतर प्रचंड नुकसान झालं होतं. वाटलं होतं, यावेळी ते भरून काढू. पण आता नवं फर्मान आलं आहे."
नाजिम त्यागी म्हणाले की, "आमच्या ढाब्यावर कोणतंही धार्मिक चिन्ह नाही. पण अनेकदा ग्राहकांना मालक मुस्लीमही आहे हे समजतं तेव्हा ते टेबलवरून उठून निघून जातात. आधी वाईट वाटत होतं. पण ज्यांना खायचं असेल ते खातील आणि जे आपल्याला मिळायचं ते मिळेल, असा विचार करून शांत राहतो."
कावड यात्रींचं म्हणणं काय?
कावड यात्रा 22 जुलैपासून सुरू होईल. पण लांब अंतरावरून कावड घेऊन जाणारे किंवा जास्त वजनाचे कावड नेणारे जे भाविक आहेत, त्यांनी यात्रा सुरू केली आहे.
आकाश भोला हे दोनशे किलोची कावड घेऊन प्रवास करत आहेत. त्यांच्याबरोबर चालणारे विशाल शंभर किलोचे कावड उचलत आहेत. काही पावलं चालून लगेचच ते थांबतात.
"कुटुंबात सुख-शांतता नांदावी म्हणून एवढे मोठे कावड उचलत आहे," असं ते सांगतात.
नावा बाबतच्या वादावर विशाल म्हणाले की, "दुकान हिंदुंचं आहे की मुस्लिमांचं यानं आम्हाला फरक पडत नाही. सगळेच शंकराचा आदर करतात. खरेदी करताना तर आम्ही नाव पाहणार नाही. हिंदू-मुस्लीम हे फक्त राजकारणासाठी आहे."
हिमांशू 18 वर्षांपासून कावड यात्रेत सहबागी होतात. ते 47 किलो वजनाची कावड घेऊन चालत आहेत. बोल बम.. म्हणत ते पुढं जात राहतात.
हिमांशू म्हणाले की, "मी 18 वर्षांपासून कावड यात्रा करत आहे. जीवनभर मी ते करत राहील. कावड घेऊन मी घरी पोहोचतो तेव्हा माझ्या मनाला शांती मिळते."
नावाच्या वादाबाबत हिमांशू म्हणाले की, "कावड आमच्यासाठी खूप पवित्र आहे. आमच्या भावनांशी खेळ होऊ नये, असं आम्हाला वाटतं. स्वच्छता असावी. मुस्लिमांची आम्हाला अडचण नाही. मनाला पटलं तर एखाद्या मुस्लिमाच्या दुकानातील सामान खरेदी करेल. त्यानं माझी यात्रा खंडित होत नाही. रस्त्यात अनेक मुस्लीमही जय शंकर म्हणतात, तेव्हा फार चांगलं वाटतं."
सोनू शर्मा कावड मार्गावर त्यांच्या समुहाबरोबर यात्रा करत होते. ते म्हणाले की, "कुणालाचा आमचा काही त्रास नाही, किंवा आम्हालाही कुणाचा काही त्रास नाही. आम्ही पवित्र भावनेनं कावड घेऊन निघालो आहोत. हे जे काही सगळं घडत आहे, त्यामागे राजकारण आहे. माझ्या मते सामान्य लोकांनी यात पडायला नको."
बझेडी बायपासवर राशीद एका टपरीवर चहा विक्री करतात. बॅनर बवायला पैसे नसल्यानं त्यांनी पांढऱ्या कागदावर स्वतःच्या हातानेच मोठ्या अक्षरात स्वतःचं नाव लिहिलं.
राशीद कुटुंबासह झोपडीत राहतात. त्यांच्या दुकानावर अनेक कावड यात्री थांबून चहा घेत होते.
राशीद म्हणाले, "मी 12 वर्षाचा होतो तेव्हापासून भाविकांची सेवा करत आहे. मला ते चांगले वाटते. माझ्याकडे थांबण्यात कुणाला काहीही अडचण नाही."
कावड घेऊन सोनिपतला जाणारे दीपक शर्मा यांच्या ग्रुपबरोबर याठिकाणी थांबले होते. ते म्हणाले,"आम्ही धर्माचं काम करत आहोत. आमच्या मनात काहीही भेदभाव नाही. समाजातील भेदभाव संपवणं हाच तर धर्म आहे. आम्हीच हिंदु मुस्लीम यांच्यात फरक करू लागलो तर आमचा धर्म काय कामाचा?"
'वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न'
मुजफ्फरनगरमध्ये दरवर्षी पैगाम-ए-इन्सानियत ही संस्था कावड यात्रींसाठी कॅम्प लावत असते. पण ते यावेळी कॅम्प लावणार नाहीत.
संस्थेचे अध्यक्ष आसीफ राही म्हणाले की, "आम्ही दरवर्षी कॅम्प लावून भाविकांची सेवा करायचो. पण यावेळी खबरदारी म्हणून कॅम्प लावायचा नाही, असं ठरवलं आहे. आमच्या कॅम्पमध्ये लांबून लांबून येणारे कावड यात्री थांबायचे. आम्ही मुस्लीम आहोत, हे त्यांना माहिती असायचं. तरीही ते आमच्या इथे थांबायचे. आमच्या प्रेमापोटी ते थांबायचे. पण यावेळी वातावरण वेगळं आहे. आमच्या मनात अनेक शंका आहेत."
राही पुढं म्हणाले की, " मुजफ्फरनगरनं आधीच दंगलीचे वार झेलले. आता पुन्हा समाजाला दुभंग देणारी नवी सुरुवात झाली हे दुर्दैवी आहे. गंगा-जमुनी संस्कृती संपवली जात आहे. राम चाट भांडरमधून खायचं की आसीफकडून फळं घ्यायची हे खरेदी करणाऱ्याच्या मनावर आहे. पण आता काही शक्तिंना लोकांच्या या आवडीनिवडीवरच हलला करायचा आहे, असं वाटतं. या नव्या परंपरेचा परिणाम समाजासाठी योग्य ठरणार नाही,” असंही ते म्हणाले.
(मुजफ्फरनगरहून अमित सैनी यांनी या रिपोर्टसाठी सहकार्य केले.)