हवामानाचा दीर्घकालीन अंदाज दिल्याने शेतकरी कर्जमुक्त होतील का?

बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (15:51 IST)
हिवाळा संपत आला की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो आणि तो म्हणजे यावर्षी पाऊस किती होणार?
 
ग्रामीण भागात एकमेकांशी चर्चा करून, वेगवेगळ्या पूजा करून, वर्तमानपत्र आणि शेतीविषयक संस्थांनी दिलेली माहिती बघून पावसाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो.
 
आता अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने भारतातील काही शेतीप्रधान जिल्ह्यांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केलाय.
 
शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे शेतकऱ्याचं कर्ज कसं कमी होऊ शकतं?
 
शिकागो विद्यापीठाने कसा अभ्यास केलाय?
जगभरातील 67 टक्के गरीब लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. वाढत चाललेलं तापमान, पावसाची अनियमितता यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पादन आणि पिकांवर परिणाम झालाय.
 
हे सगळं होत असताना बदलत्या हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच हवामानाच्या अचूक अंदाजांचं महत्त्व वाढत आहे.
 
यावर्षी किती पाऊस होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जर शेतकऱ्यांना मिळालं तर ते त्या वर्षीच्या शेतीचं योग्य नियोजन करू शकतील. पाऊस कमी होणार असेल तर कोणतं पीक घ्यायचं? खतं आणि इतर गोष्टींसाठी किती गुंतवणूक करायची? याचे निर्णय त्यांना घेता येतील.
या सर्वेक्षणासाठी तेलंगणामधल्या 250 गावांचं सर्वेक्षण केलं गेलं. या गावातील अर्ध्याहून अधिक लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून होते.
 
या गावांमधल्या शेतकऱ्यांचे तीन ग्रुप्स बनवले गेले. यातल्या एका ग्रुपला किमान एक महिना आधी त्यावर्षीच्या पावसाचा अंदाज सांगितला गेला, एका ग्रुपला हवामानाचा अंदाज अजिबात सांगितला गेला नाही आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता.
 
पावसाचा काळ वाढला तर कापसासारखी नगदी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो आणि पावसाचा हंगाम कमी असेल तर शेतकरी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवडत करतात असं दिसून आलं आहे.
 
शिकागो विद्यापीठाच्या अहवालात कोणते निष्कर्ष निघाले?
शेतकऱ्यांनी स्वतःहून सांगितलेल्या पावसाच्या अंदाजामध्ये मोठी तफावत दिसून आली. या गावांमध्ये राहणारे बहुतांश शेतकरी हे या माहितीसाठी एकमेकांवर अवलंबून होते.
 
यापैकी खूप कमी शेतकऱ्यांकडे सरकार किंवा इतर संस्थांनी सांगितलेल्या पावसाच्या अंदाजाची माहिती होती.
 
ज्यावर्षी हे सर्वेक्षण केलं गेलं त्यावर्षी सरासरी पावसाचा अंदाज होता. या शेतकऱ्यांना हा अंदाज कळवल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या नियोजनात बदल केले. एवढंच काय तर शेतकरी पावसाचा योग्य अंदाज मिळवण्यासाठी पैसे द्यायलाही तयार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.
 
हवामानाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला?
ज्या शेतकऱ्यांना त्यावर्षी जास्त पाऊस होईल असं वाटलं होतं त्यांनी हवामानाचा अंदाज पाहून शेतीवर कमी खर्च करायचा निर्णय घेतला.
 
त्यांच्या उत्पन्नात 20 टक्क्यांनी घट झाली. पण अशा शेतकऱ्यांनी पैसे कमवण्यासाठी शेतीव्यतिरिक्त इतर मार्ग शोधले. त्यामुळे त्यांनी काढलेल्या कर्जातही पन्नास टक्क्यांची घट झाली. यासोबतच प्रत्येक शेतकऱ्याने सरासरी 46,408 रुपयांची बचत केली.
 
ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीला पाऊस कमी पडेल असं वाटलं होतं त्यांनी हवामानाचा अंदाज पाहून शेतीतली गुंतवणूक वाढवली. त्यांचं उत्पन्नही 22 टक्क्यांनी वाढलं. थोडक्यात काय तर या दोन्ही ग्रुप्सना हवामानाच्या अंदाजाचा फायदाच झाल्याचं दिसून आलं.
 
पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांबाबत काय घडलं?
पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची जोखीम कमी झाली पण त्यांच्या निवडींमध्ये फारसे बदल झाले नाहीत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे त्यांनी शेतीमध्ये जास्त गुंतवणूक तर केली पण योग्य पिकांची निवड करण्यात मात्र ते कमी पडले.
 
त्यामुळे पीकविमा आणि हवामानाचा योग्य अंदाज या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांना मिळाल्या तर त्याचा फायदाच होतो असं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे.
 
हवामानाचा योग्य अंदाजाचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो?
हवामान अभ्यासक उदय देवळाणकर म्हणतात की, "भारतात हवामान कसं आहे यापेक्षा बाजार कसा आहे हे बघून शेती केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीनसारख्या पिकाला अजिबात अनुकूल वातावरण नाही तरीही सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.
 
भारतीय हवामान विभाग जवळपास रोज हवामानाची माहिती देत असतं, त्याची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असते. पण या क्षेत्रात अशास्त्रीय माहिती देणाऱ्यांचाही सुळसुळाट झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चुकीची माहितीही मिळते आणि त्यातून शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होतं.
 
हवामान हा एक मुद्दाच आहे पण बाजाराच्या दबावात येऊन चुकीची पीकपद्धती अवलंबल्यामुळे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होतं.
 
त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळण्याआधी कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या, देशी पिकांची लागवड केली पाहिजे.
 
बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये हवामानाचा अचूक अंदाज जेवढा महत्त्वाचा आहे तेवढीच महत्त्वाची शेती करण्याची पद्धतही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे वळलं पाहिजे.
 
कमी पाण्यात येणारी पिकं कोणती आहेत ते शोधलं पाहिजे, त्या पिकांना बाजारमूल्य मिळावं म्हणून प्रयत्न केले गेले पाहिजेत तर आणि तरच शेतकरी या हवामान बदलाचा समर्थपणे सामना करू शकेल."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती