महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जनजागृती

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (12:26 IST)
करोना महामारीला तोंड देत असतांना रुग्णावर होणारा खर्च कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन महात्मा फुले (Mahatma Phule) जन आरोग्य योजनेची जनजागृती करत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
 
या योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करोना आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. जिल्ह्यत सहा शासकीय रुग्णालयांसह एकूण २७ रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत. नागरिकांनी आपल्याला या योजनेची मदत लागणार नाही यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
 
परंतु, करोनाची बाधा झाल्यास वेळीच रुग्णालयात पोहचून उपचार सुरू करावेत. त्यासोबतच किमान कागदपत्रे ज्यामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवून रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रक्रिया करण्यास सांगावे तसेच याबाबत दूरध्वनीवरून माहिती देण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करण्यास रुग्णालय प्रशासनास सांगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.  या योजनेसाठी यापूर्वीच उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी रुग्णांना मदत करत असल्याची ते वेळोवेळी खातरजमा करत आहेत. या योजनेसाठी पंकज दाभाडे यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. नागरिकांनी या योजनेबाबत काही अडचणी असल्यास दाभाडे यांच्याशी ९४०४५ ९४१६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती