भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी येथे पूल स्टेजमध्ये जर्मनीचा 2-1असा पराभव करून एफआयएच ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. लालरेमसियामी (दुसरे मिनिट) आणि मुमताज खान (25वे) यांनी पेनल्टी कॉर्नरमध्ये रूपांतर केले. जर्मनीचा एकमेव गोल ज्युल ब्ल्युएलने 57 व्या मिनिटाला केला. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी शनिवारी ड गटातील आपल्या पहिल्या सामन्यात वेल्सचा 5-1 असा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात जर्मनीला पराभूत करून निराश केले.
जर्मनीविरुद्ध भारतीय संघाला दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाचा ड्रॅग फ्लिक जर्मन गोलरक्षकाने वाचवला पण लालरेमसियामीने रिबाऊंडवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर जर्मनीने भारतीय बचावफळीवर सतत दबाव टाकत अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण गोलरक्षक बीचू देवी करिबमच्या तत्परतेपुढे त्यांना भेदता आले नाही.
8 एप्रिलपासून सुरू होणार्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी भारत 5 एप्रिलला मलेशियाविरुद्ध पूल स्टेजच्या शेवटच्या सामन्यात मलेशियाशी खेळेल. भारतीय संघ सध्या दोन सामन्यांतून दोन विजयांसह पूल डी मध्ये अव्वल स्थानावर आहे तर जर्मनीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. प्रत्येक पूलमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.