भारताचा सर्वात अनुभवी टेबल टेनिस खेळाडू आणि राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेता शरथ कमल यांनी 5मार्च रोजी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीच्या निर्णयासोबत, शरथ कमलने स्पष्ट केले की तो 26ते 30 मार्च दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस म्हणजेच WTT स्पर्धक स्पर्धेत व्यावसायिक खेळाडू म्हणून शेवटचा खेळताना दिसेल.
शरथ कमलने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस सामना चेन्नईमध्ये खेळला, त्यानंतर तो आता त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चेन्नईमध्ये खेळणार आहे. शरथने निवृत्तीची घोषणा करताना आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळलो आणि माझी शेवटची स्पर्धा देखील चेन्नईमध्ये खेळेन. व्यावसायिक खेळाडू म्हणून ही माझी शेवटची स्पर्धा असेल. मी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. मी ऑलिंपिक पदक जिंकू शकलो नाही. आशा आहे की, येणाऱ्या तरुण प्रतिभांच्या माध्यमातून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकेन.
शरथ कमल ने एकूण 13 पदके जिंकली. 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शरथ कमलने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते, तर त्याआधी 2006 मध्ये त्याने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. शरथ कमलने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 7 सुवर्णपदके जिंकण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये शरथ कमल तिसऱ्या क्रमांकावर आहेत.