मिळालेल्या माहितीनुसार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार अॅप-आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच, प्रवासी वाहतुकीसाठी अॅप-आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा आता केवळ खाजगी कंपन्यांपुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू केलेल्या अॅपवर देखील असतील. या अॅपचे नाव जय महाराष्ट्र, महा-राइड, महा-यात्री, यापैकी कोणतेही असू शकते, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मंजुरीनंतर, सदर सरकारी अॅप लवकरच कार्यान्वित होईल. अॅप विकसित करण्यासाठी 'महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट' आणि 'मित्र' सारख्या खाजगी कंपन्यांशी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये प्रणालीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक समाविष्ट आहे आणि हे अॅप लवकरच तयार होईल असे देखील परिवहन मंत्री म्हणाले.