दोन्ही हात नसणाऱ्या शीतल देवीचा पॅरिस पॅरालिंपिक पर्यंतचा प्रवास

मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (15:20 IST)
तिरंदाजी करणारी शीतल देवी अत्यंत निर्धाराने बो (धनुष्य) उचलते, त्याची स्ट्रिंग (दोर) खेचून त्यावर अ‍ॅरो (बाण) लावते आणि तिच्यापासून सुमारे 50 मीटर(164 फूट) अंतरावर असलेल्या लक्ष्यावर नेम धरते.
भारतातील प्रशिक्षण अकादमीत तिच्यासोबत सराव करणारी आणखीन एक खेळाडू देखील हेच करत असते. पण या दोघींमध्ये एक मूलभूत फरक आहे.

तो फरक असा की शीतल तिच्या उजव्या पायाच्या मदतीने बो उचलते, उजव्या खांद्याचा वापर करून त्याची स्ट्रिंग मागे खेचते आणि तिच्या जबड्याचा वापर करून अ‍ॅरो (बाण) सोडते.
या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मात्र कधीही बदलत नाही आणि ती म्हणजे शीतलचा स्थितप्रज्ञ स्वभाव.
जम्मू जिल्ह्यात जन्मलेल्या शीतलला जन्मतःच फोकोमेलिया या दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामुळे शीतल देवी ही हात नसताना तिरंदाजी करणारी आणि सक्रिय असणारी एकमेव खेळाडू ठरली आहे
एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी शीतल देवी, आता 28 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत उतरणार आहे.
 
शीतल देवी म्हणते की, "मला सुवर्णपदक मिळवण्याची इच्छा आहे, मी आत्तापर्यंत जिंकलेल्या पदकांवर नजर टाकते तेव्हा, मला आणखीन पदकं जिंकण्याची प्रेरणा मिळते. मी आता कुठे सुरुवात केली आहे."
यंदाच्या पॅरालिंपिक स्पर्धेत जगभरातून 4,400 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 22 खेळ खेळले जातील.
1960 ला झालेल्या पहिल्या पॅरालिंपिक स्पर्धेपासूनच तिरंदाजी या खेळाचा समावेश झालेला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात या खेळावर युनायटेड किंगडम, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलेलं आहे. भारताला आजवर झालेल्या 17 पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये फक्त एक कांस्यपदक मिळवता आलं आहे.
पॅरालिंपिकमध्ये सहभागी झालेल्या तिरंदाजांना त्यांच्या शरीरातील इंपेअरमेंट अर्थात अपंगत्वानुसार दोन वेगवेगळ्या गटांत विभागलं जातं.
या वर्गवारीनुसार या खेळाडूंसाठी ठरवलेलं अंतरसुद्धा ठरवलं जातं. या वर्गवारीनुसार या खेळाडूंना व्हिलचेअर आणि इतर उपकरणं दिली जातील की नाही हे ठरवण्यात येतं.
डब्ल्यू-1 (W1) कॅटेगरीतील तिरंदाज हे व्हीलचेअरचा वापर करत. या कॅटेगरीतील तिरंदाजांच्या चार (दोन हात, दोन पाय) पैकी तीन अवयवांमध्ये स्नायूंची ताकद, समन्वय कमी झालेला असतो, किंवा त्यांची हालचाल मर्यादित झालेली असते.
 
ओपन कॅटेगरीमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे दोन्ही हात किंवा दोन्ही पायांमध्ये किंवा शरीराच्या एका बाजूला अपंगत्व आलेलं असतं आणि ते व्हीलचेअरचा वापर करतात. किंवा ते बॅलन्स इंपेअरमेंटचा वापर करत असतात, किंवा ते उभे राहून किंवा स्टूलचा आधार घेऊन तिरंदाजी करतात. खेळाच्या प्रकाराप्रमाणे ते रिकर्व किंवा कंपाऊंड बो (धनुष्य) वापरतात.
 
महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये शीतल देवी या सध्या जगात पहिल्या स्थानावर आहे.
 
2023 साली झालेल्या 'पॅरा-आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप'मध्ये रौप्यपदक मिळाल्याने शीतल देवी पॅरिसच्या स्पर्धेसाठी पात्र ठरली.
पॅरिसमध्ये, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली जेन कार्ला गोगेल आणि जागतिक चॅम्पियनशिप विजेती ओझनूर क्युर यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान शीतल देवी समोर असणार आहे.
शीतल देवी यांना ओळखणाऱ्या लोकांच्या मते, शीतल देवी हाच खेळ खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी बनली आहे.
शीतल देवी यांच्या दोन राष्ट्रीय प्रशिक्षकांपैकी एक असणाऱ्या अभिलाषा चौधरी म्हणतात की, "शीतलने तिरंदाजीची निवड केली नाही तर या खेळानेच तिला निवडलं आहे."
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शीतलने, वयाच्या 15 वर्षांपर्यंत तिरंदाजीमध्ये वापरला जाणारा 'बो आणि अ‍ॅरो' (धनुष्य आणि बाण) बघितलेला देखील नव्हता.
2022 मध्ये तिच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने, तिला जम्मूच्या कटरामध्ये असणाऱ्या, श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जायचा मार्ग सुचवला. आणि तोच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
तिथे शीतलची भेट तिचे प्रशिक्षक कुलदीप वेदवान आणि अभिलाषा चौधरी यांच्याशी झाली. या दोन प्रशिक्षकांनी तिला तिरंदाजीच्या जगाची ओळख करून दिली. त्यानंतर ती लवकरच कटरा शहरातील प्रशिक्षण शिबिरात राहायला गेली.
शीतल देवीचे प्रशिक्षक म्हणतात की, तिच्यातली जिद्द पाहून ते आश्चर्यचकित झाले होते.
शीतल देवीला तिरंदाजीत तरबेज बनवणं हे एक आव्हानात्मक काम होतं. पण तिच्या दोन्ही पायांची आणि शरीराच्या वरच्या भागाची ताकद वापरून, तिला खेळाडू बनवण्याची योजना अखेर यशस्वी ठरली.
 
देवीने सांगितले की, अनेकवर्षे पायांचा वापर करून दैनंदिन कामं केल्यामुळे तिच्या पायांमध्ये एवढी ताकद आली होती. तिरंदाजीची सुरुवात करण्याआधी शीतल देवी पायांनीच लिहिणे, मित्रांसोबत झाडावर चढणे अशी कामं करत होती, आणि याच कामांनी या खेळासाठी आवश्यक असणारं सामर्थ्य निर्माण केल्याचं ती सांगते.
मात्र, याच खेळात करियर करण्याच्या निर्णय घेण्याआधी तिलाही अनेक शंकाकुशंकांचा सामना करावा लागला.
शीतल म्हणते की, "मला हे सुरुवातीला अशक्यच वाटलं होतं. माझे पाय खूप दुखायचे, पण शेवटी मी हे शक्य करून दाखवलं."
 
सुरुवातीला खेळताना आलेल्या अनेक निराशेच्या क्षणांमध्ये, अमेरिकन तिरंदाज मॅट स्टुटझमन यांच्याकडून तिने प्रेरणा घेतली. मॅट त्यांच्या पायांचा वापर करून तिरंदाजी करतात. यासाठी ते सहाय्यक उपकरणाचा देखील वापर करतात.
 
मॅट जे उपकरण वापरायचे, ते उपकरण घेऊन देणं हे शीतल देवी यांच्या वडिलांसाठी शक्य नव्हतं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते परवडत नव्हतं. अशावेळी तिचे प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांनी स्वतः शीतलसाठी एक विशिष्ट बो (धनुष्य) बनवला.
 
स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून आणि तिथल्याच फोर्ज शॉपमध्ये जाऊन त्यांनी शीतल देवीसाठी हे मशीन बनवलं.
 
तिच्या गिअरमध्ये बॅगच्या बेल्टसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीपासून बनवलेला वरच्या शरीराचा पत्ता (अप्पर बॉडी स्ट्रॅप) होता. त्यासोबतच एक छोटं उपकरण देखील बनवलं होतं, जे उपकरण तोंडात धरून अ‍ॅरो सोडण्यासाठी शीतल देवीला मदत होत होती.
 
मात्र, फक्त पायांव्यतिरिक्त इतरही अवयवांचा वापर करून एक परिपूर्ण आणि टिकाऊ खेळण्याची पद्धत विकसित करणं हे खरं आव्हान होतं.
 
याबाबत बोलताना चौधरी म्हणतात की, "तिच्या पायांमधील ताकदीचं संतुलन तयार करणं आणि त्याच ताकदीच्या बळावर तिरंदाजीचा खेळ खेळण्यासाठी तिला तयार करणं गरजेचं होतं. देवीचे पाय तर मजबूत होतेच पण आम्हाला शूट करण्यासाठी तिच्या पाठीचा वापर कसा करायचा? हे शोधावं लागलं."
 
उपकरणं विकसित झाल्यानंतर या त्रिकुटाने प्रशिक्षणासाठी एक शिस्तबद्ध वेळापत्रक बनवलं. सुरुवातीला धनुष्य वापरण्याऐवजी त्यांनी रबरबँड किंवा थेराबँड वापरून सरावाला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 5 मीटर अंतरावर ठेवलेली लक्ष्य भेदून शीतल देवीने सराव केला.
 
हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यासोबतच त्यांनी खेळाची काठिण्यपातळी देखील वाढवली.
फक्त चारच महिन्यांमध्ये शीतल देवी नियमित बो आणि अ‍ॅरोचा वापर करून 50 मीटर अंतरावर ठेवलेलं लक्ष्य भेदू लागली. आणि अशारितीने कंपाउंड ओपन कॅटेगरीसाठीचे निकष पाळून शीतल देवी सराव करू लागली.
फक्त दोनच वर्षांमध्ये, अगदीच कमी अंतरावर ठेवलेल्या लक्ष्यावर शूट करून सराव करणाऱ्या शीतलने, 2023 साली झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये, महिलांच्या जागतिक वैयक्तिक कंपाउंड स्पर्धेच्या, अंतिम फेरीत सलग सहावेळा 10 पॉईंट मिळवले. आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 
तिरंदाजीमध्ये टार्गेट बोर्डाच्या मधोमध शूट करून, बुल्सआयचा वेध घेणाऱ्या खेळाडूंना 10 पॉईंट दिले जातात. या खेळात एका शूटसाठी मिळणारे हे सर्वाधिक पॉईंट्स आहेत.
 
देवी म्हणाली की, "मी जरी नऊ पॉईंट मिळवले तरी माझ्या डोक्यात नेहमी मी कशा पद्धतीने 10 पॉईंट मिळवू शकते, हाच विचार सतत सुरु असतो."
 
शीतल देवीचा प्रवास हा फक्त कठोर परिश्रमामुळेच नाही तर तिने वेळोवेळी केलेल्या त्यागाचा सुद्धा एक परिपाक आहे.
देवीने सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी तिरंदाजीसाठी कटराला आल्यापासून, ती आजवर एकदाही तिच्या घरी गेली नाही. आता पॅरिस पॅरालिंपिकमध्ये पदक मिळवल्यानंतरच तिचा घरी परतण्याचा मानस आहे.
तिला पॅरिसमध्ये तिचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे.
देवी म्हणते की, "माझा विश्वास आहे की जगात काहीही अशक्य नाही. फक्त तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याची तुमची किती इच्छा आहे आणि त्यासाठी किती कष्ट उपसण्याची तयारी आहे. यावर बरच काही अवलंबून आहे."
"जर मी हे करू शकते, तर कुणीही ते करू शकतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती