भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जपानच्या केंटा सुनेयमाचा पराभव करत इंडोनेशिया ओपन सुपर1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फ्रेंच ओपन आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचून ऑलिम्पिक पात्रता गाठणाऱ्या सेनची आता सातव्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंग आणि जपानच्या केंटा निशिमोटो यांच्यातील विजेत्याशी सामना होईल.
लक्ष्य सेनने 40 मिनिटांत सुनेयावर 21-12, 21-17 असा विजय मिळवला. भारताच्या किरण जॉर्जला चीनच्या हाँग यांग वेंगकडून 21-11, 10-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत भारताच्या बी सुमित रेड्डी आणि सिक्की रेड्डी यांनी अमेरिकेच्या विन्सन चिऊ आणि जेनी गाय यांचा 18-21, 21-16, 21-17 असा पराभव केला. आता त्यांचा सामना अव्वल मानांकित सी वेई झेंग आणि चीनचा क्विओंग हुआंग आणि रेहान नौफल कुशारजांतो आणि इंडोनेशियाच्या लिसा आयु कुसुमवती यांच्यातील विजेत्याशी होईल.