ISWOTY : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर : तुमच्या आवडत्या खेळाडूला मत द्या

मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (17:20 IST)
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचं हे तिसरं वर्षं आहे आणि या पुरस्कारासाठीची नामांकनं जाहीर झाली आहेत.
तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
 
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2021साठी नामांकन मिळालेल्या पाच खेळाडू आहेत- गोल्फर आदिती अशोक, बॉक्सर लव्हलिना बोर्गेहेन, वेटलिफ्टर मीराबाई चानू, पॅरा शूटर अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु.
 
बीबीसीच्या भारतातील प्रमुख रूपा झा सांगतात : "मला खेळाडूंची नामांकन जाहीर करताना आनंद वाटतो आहे. BBC ISWOTY च्या प्रत्येक अध्यायात नवी नावं समोर आली आहेत. यंदा नामांकन मिळालेल्या पाचहीजणी वेगवेगळ्या खेळांचं प्रतिनिधित्व करतात. गोल्फपासूनन ते पॅरालिंपिकपर्यंत, भारतीय खेळांच्या लखलखत्या तारकांचं यश साजरं व्हायला हवं."
 
या पुरस्कार सोहळ्यात एका दिग्गज महिला खेळाडूचा बीबीसी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान केला जाईल, आणि एका युवा महिला खेळाडूला, बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात येईल.
 
नामांकनं जाहीर झाली, तेव्हा गेल्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळवणाऱ्या अंजू बॉबी जॉर्जनं आपलं मत व्यक्त केलं. तिनं भारतीय खेळांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी आशा व्यक्त करताना म्हटलं आहे, "भारतात गुणवान महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरेसे प्रयत्न सुरू आहेत, आता परिस्थिती बदलते आहे. खेळांसाठी नव्या सुविधा तयार होतायत, पण आपल्याला चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे. पालकांनाही वाटतं, की आपल्या पाल्यांनी खेळात यश मिळवावं, पण कधीकधी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो."
 
हा पुरस्कार भारतीय महिला खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक करण्यासाठी प्रदान केला जातो. 
 
तुम्ही तुमच्या आवडीच्या खेळाडूला मत देण्यासाठी तुम्ही बीबीसीच्या भारतीय भाषांच्या कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करू शकता किंवा बीबीसी स्पोर्टच्या वेबसाइटवरही लॉग इन करू शकता.
 
व्होटिंग 28 फेब्रुवारी 2022 रोजी  रात्री 11.30 वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पर्यंत खुलं राहील. विजेत्या खेळाडूची घोषणा 28 मार्च 2022 रोजी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात केली जाईल. मतदानासंबंधीच्या अटी-शर्ती आणि गोपनीयतेसंबंधीची माहिती वेबसाइटवर आहे.
 
निकालांची घोषणा बीबीसीच्या भारतीय भाषांच्या साइटवर आणि बीबीसी स्पोर्ट वेबसाइटवर केली जाईल. ज्या महिला खेळाडूला सर्वाधिक मतं मिळतील, ती बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर ठरेल.
 
नामांकनं मिळालेल्या खेळाडूंची नावं
आदिती अशोक
आदिती अशोक ही व्यावसायिक स्तरावर खेळायला लागल्यापासून महिला गोल्फमधलं आघाडीचं नाव बनली आहे.  
 
वयाच्या 18 व्या वर्षी आदिती 2016साली पार पडलेल्या रिओ ऑलिंपिक्समध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी भारताकडून सहभागी झालेल्या सर्वांत लहान खेळाडूंपैकी ती एक होती.
टोकियो ऑलिंपिक्समध्येही आदितीनं गोल्फमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. आदितीच्या यशामुळे महिला गोल्फमधला अनेकांचा रस वाढला आहे. या खेळात भारताला जागतिक पातळीवर आतापर्यंत तसं मर्यादितच यश मिळालं आहे.
 
2016 मध्ये लेडीज युरोपियन टूर जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.
 
अवनी लेखरा
पॅरालॅम्पिक्स खेळात सुवर्णपदक मिळवणारी अवनी लेखरा ही पहिली भारतीय महिला ठरली. 20 वर्षांच्या अवनीनं एक ऐतिहासिक कामगिरी केली होती.
 
टोकियो पॅरालॅम्पिक्समध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात तिनं नवा विक्रम रचला.
 
अवनीनं टोकियो पॅरालॅम्पिक्समध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल शूटिंगच्या प्रकारातही ब्राँझ पदक जिंकलं होतं.
लहानपणी झालेल्या एका भीषण कार अपघातात अवनीचा कमरेखालचा भाग निकामी झाली. या अपघातानंतरच अवनीच्या वडिलांनी तिला नेमबाजी शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तिनं कधी मागे वळून पाहिलंच नाही.
 
खेळातील आपली आवड जोपासत असताना ती कायद्याचं शिक्षणही घेत आहे.
 
लव्हलिना बोर्गेहेन   
लव्हलिना बोर्गेहेननं टोकियो ऑलिंपिक्समध्ये ब्राँझ पदक जिंकलं. ऑलिंपिक्समध्ये बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी लव्हलिना ही केवळ तिसरी खेळाडू आहे.
 
लव्हलिनानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत. 2018मध्ये इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर लव्हलिना प्रकाशझोतात आली. त्यानंतर लव्हलिनानं ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं.
24 वर्षांची लव्हलिना मूळ आसामची आहे. तिनं आपल्या दोन मोठ्या बहिणींकडून प्रेरणा घेत किक बॉक्सर म्हणून सुरूवात केली. पण तिला बॉक्सिंग रिंग खुणावत होती.
 
मीराबाई चानू
वेटलिफ्टिंग चॅम्पियन मीराबाई चानूनं टोकियो ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकलं आणि एक इतिहास रचला. ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली होती.
 
2016मध्ये रिओ ऑलिंपिक्समध्ये मीराबाई चानूला वजन उचलण्यात अपयश आलं होतं. हे अपयश इतकं जिव्हारी लागणारं होतं की, मीराबाईनं खेळाला जवळपास अलविदाच म्हटलं होतं.
मात्र, 2017 मध्ये तिनं जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं.
 
मणिपूरमध्ये जन्मलेल्या मीराबाईच्या वडिलांचा चहाचा स्टॉल होता. कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिला प्रचंड आर्थिक संघर्ष करावा लागला होता. पण या सर्वांवर मात करत ती ऑलिंपिक चॅम्पियन बनली.
 
पीव्ही सिंधु
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ही ऑलिंपिक्समध्ये दोन वैयक्तिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
 
सिंधुनं 2016 मध्ये रिओ ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. टोकियो ऑलिंपिक्समध्ये तिनं ब्राँझ पदक जिंकत ऑलिंपिकमधल्या दुसऱ्या वैयक्तिक पदकाची कमाई केली.
 
सिंधुने 2021 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. जानेवारी 2022 मध्ये सिंधुनं सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. 
सिंधुनं 2019 मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. सप्टेंबर 2012 मध्ये BWFच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या 20मध्ये सिंधुनं स्थान मिळवलं होतं. त्यावेळी ती केवळ 17 वर्षांची होती.
 
सिंधुनं सर्वाधिक मतं मिळवत 2019 मधला बीबीसीचा पहिलावहिला 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला होता.
 
बीबीसी 28 मार्चला होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात एका ज्येष्ठ महिला खेळाडूचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. बीबीसी एका उदयोन्मुख महिला खेळाडूलाही पुरस्काराने सन्मानित करणार आहे.
 
यंदा या पुरस्काराचं तिसरं वर्षं आहे.
 
गेल्या वर्षी बुद्धिबळपटून कोनेरु हंपीला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
 
बीबीसीनं निवडलेल्या पॅनेलनं यावर्षीच्या पुरस्कारासाठी पाच भारतीय महिला खेळाडूंची नाव शॉर्टलिस्ट केली आहेत. ज्युरींमध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ आणि क्रीडा लेखकांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती