यासंदर्भात सर्वच अंगांनी तपशीलवार तपास आणि परिस्थितीची पहाणी केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी जाहीर केले. जुमैराह एमिरात टॉवर या पंचतारांकित हॉटेलच्या बाथरूममध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याच्या तीन दिवसांनी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि श्रीदेवी यांचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
श्रीदेवी यांचे पती आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यासह सावत्र पुत्र अर्जुन कपूर यांनी श्रीदेवी यांचे पार्थिव ताब्यात घेतले आणि रात्री उशीरा मुंबईत पोहोचले असल्याचे कपूर कुटुंबियांच्या सूत्रांनी सांगितले. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर लगेच दुबईला एक खासगी विमान रवाना करण्यात आले होते. त्यातूनच हे पार्थिव मुंबईला आणले जात आहे.
अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब येथे आज सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब येथून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा सुरू होणार असून 3.30 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दुबई सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून अनेक ट्विटवरून यासंदर्भातील सर्व तपशील जाहीर करण्यात आला आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूचा तपास समाप्त झाला असल्याचे अखेरच्या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.