छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळ जवळ चारशे वर्षे होत आली तरी त्यांची कीर्ती, त्यांची महानता आणि तंच्या विषयीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत त्यांचे मोठेपण कायम अबाधित राहणार आहे. ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवरून दिसतो त्यापेक्षा लाखो पटीने तो मोठा आहे, त्याचप्रमाणे युगप्रवर्तक शिवाजीराजे इतिहासकारांना, संशोधकांना माहिती आहेत त्यापेक्षा लाखो पटीने मोठेआणि महान आहेत.
जगात अनेक राजे होऊन गेले पण जगातील सर्वोत्तम राजा ज्यांना म्हटलं जाऊ शकतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. पण हे सर्वोत्तम राजेपद असेच येत नाही. त्यासाठी खूप सारी गुणवैशिष्ट्ये अंगी असावी लागतात. तेव्हाच त्या सर्वोच्च पदावर पोहोचता येतं. शिवाजी महाराज यांच्या अंगी देखील विविध गुण होते. असे एकही क्षेत्र नसावे, ज्याची माहिती राजांना नसावी. सगळ्या विषयात निपुण असे ते राजे होते. माणसाला उच्च पदावर पोहचण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते, त्याची सुरुवात स्वतःच खासगी आयुष्यातून करावी लागते, स्वतःच सवयी, नियम त्याला आदर्शवादावर घेऊन जातात. खूप प्रयत्न केल्याने यश मिळते असे नाही परंतु यश मिळालेल्या माणसाने खूप सारे प्रत्न करून आणि कष्ट करून ते मिळवलेले असते. शिवाजी राजांच्या सर्वोच्चपदाची सुरुवात त्यांच्या वैयक्तिक दैनंदिन दिनचर्येत पाहायला मिळते. ते मितआहारी होते. युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती नसेल त्यावेळी कमीत कमी व वेळच वेळी जेवण हा त्यांचा परिपाठ होता. राजे उपवास तपास कधी करत नसत. उपवास करणारे अन्नाचे चिंतन करतात व काम थांबवितात. उपवास संपल्यानंतर एकदम भरपूर खातात व खाऊन झाल्यावर सुस्त होऊन स्वस्थ झोपतात. राजांचे राहणीमान, आहार, उठण्या झोपण्याच्या वेळा, व्यायाम या सगळ्या सवयी आदर्श म्हणून घ्याव्यात अशाच होत्या. यामुळे माणसाची कार्यक्षमता वाढते.
संयमीपणा, आत्मविश्वास, मुत्सद्दीपणा, शुद्धशीलता, प्रतिभावान, स्वाभिमानी, प्रेमळ, उदारपणा, निष्कपटीपणा, अक्रूरता, निःसंशयीपणा, अस्मिता, सर्वधर्मसमभाव, उत्तम संघटक, कुशल योद्धा, बहुभाषिक, उत्तम जाणकार, शास्त्रास पारंगत, स्वच्छ व पारदर्शक राजकारणी, समाजवादी व सुधारक, कुशल व्यक्ती परीक्षक, उत्कृष्ट आरमार प्रमुख, दुर्ग अभियंता, जनानखान्याचा द्वेष्टा, अचूकनियोजन, उत्तम वैद्य, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कृषिशास्त्रज्ञ, स्थापत्य तज्ज्ञ, प्रयत्नवादी व सत्यवादी, सातत्यवादी, कुळवाडीभूषण, उत्तम मित्र, पुत्र, पिता, पती, वैज्ञानिक दृष्टिकोन, महिलांचा सन्मानकर्ता, दूरदृष्टी, निर्व्यसनी, धर्मज्ञानी, सहृदयी, शत्रूशी वैर न बाळगता संवाद ठेवणारा, शेतकर्यांचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. इतके सारे गुण एकाच माणसामध्ये एकवटल्याने हा आपला राजा आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये आज देखील आहे.
आज दिवसाढवळ्या महिलांना पेटवले जाते, दुष्कर्म होतात, क्षणाक्षणाला अत्यंत नीच पद्धतीने महिलांचा विनयभंग होत आहे. सर्व साधने, मंत्रणा असताना आज देखील महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण कमी पडत आहोत. परंतु शिवाजीराजांच्या स्वराज्यात महिलेला जितका सन्मान आणि संरक्षण मिळाले ते आजपर्यंत मिळाले नाही असे खेदाने म्हणावे लागेल. लष्करात बायको, बटकीन व कलावंतीण आणू नये, जो आणेल त्याची गर्दन उडवावी; शत्रूकडील स्त्रियांना छळू नये त्यांच्यावर बदअमल (बलात्कार) करू नये, असा सक्त हुकूम शिवाजीराजांच्या सैनिकांना होता. स्त्रियांच्या बाबतीत गैरवर्तन करणार्यांचा मग तो आपला असो की परका, नातेवाईक असो की सैनिक त्यांची गय न करता चौरंग केलेली अनेक उदाहरणे आहेत. शत्रूंच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवल्याची व तंची गढी परत दिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. शिवाजी राजांच्या सैन्यकडून जर पराभव होऊ लागला तर स्त्रियांची वस्त्रे घालून पलायन करा असे सांगून अनेकांनी आपले प्राण वाचवले आहेत. कारण त्यांना माहीत होते, शिवरायांचे सैन्य स्त्रियांवर अत्याचार करत नाही. एवढंच नाही तर स्वतःच्या सुनेला म्हणजेच संभाजी राजांची पत्नी येसूबाई यांना महाराजांनी स्वतंत्र कारभार नेमून दिला. हाताखाली चिटणीस मंडळ दिले व स्वतंत्र मुद्रा वापरण्याचा अधिकार दिला. आज घराच्या बाहेर महिलेला पडू न देणारे, पायाचे नख दिसले किंवा पदर जरी सरकला तर सुनेला दूषण देणारे शिवरायांचा आदर्श घेतील काय?
आपल्या घरातील महिलांवर विश्र्वास ठेवून त्यांना सन्मानाने वागवणारे शिवरायांसारखे वडील, सासरे, पती आणि भाऊ घराघरात जन्माला येणे आवश्यक आहे. शिवरायांनी विवाह ठरवताना कधी उच्च कुळी पहिली नाही. आपल्यासोबत असणार्या, सैन्यमधील, सरदारांमधील सर्व सामान्य मुलांना आपल्या राजकन्या दिल्या तर त्यांच्या मुली आपल्या राजपुत्र मुलांसाठी करून आदर्श निर्माण केला. प्रतापराव गुजर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी जानकीबाई हिचा विवाह आपला पुत्र राजाराम यांच्या सोबत लावून दिला होता. आज पदर, पत्रिका जुळते का? पार्टी जोरात आहे का? हे सर्व पाहून लग्ने केली जातात. त्या लोकांनी शिवचरित्रातून हे शिकले पाहिजे की विवाह अशांसोबत करा की ज्यामुळे समाजामध्ये समानता निर्माण होण्यास मदत होईल.
शिवचरित्रातून घेण्यासारखे खूप आहे. शिवरायांवर प्रेम आहे म्हणून फक्त दाढी वाढवून, टिळा लावून चालणार नाही तर त्यांचा एकतरी गुण अंगीकारावा लागेल, त्याचे आचरण करावे लागेल. शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर मिरवण्याचा नाही तर डोक्यात घालण्याचा आहे. स्वतःकडून स्त्रीवर अन्याय होणे किंवा स्वतः समोर अन्याय होताना पाहात राहणे म्हणजे शिवराय समजले नाहीत असेच म्हणावे लागेल. दारूच्या गुत्यावर जाऊन नशेत राहणार्यांनी कितीही दाढी वाढवली तरी त्याचा काय उपयोग? सकाळी उशिरार्पंत झोपणारे व आहाराची काळजी न घेणारे कसे काय शिवाजी राजांप्रमाणे बनू शकतात? चुकीच्या निर्णयाचे समर्थन करणार्यांना शिवराय सजलेच नाही असे समजावे. वर उल्लेख केलेल्या महाराजांच्या अनेक गुणांपैकी एक गुण जरी आपल्यात आला आणि एकदा जरी आचरणात आणला तर थोडे का होईना शिवाजी महाराज समजले असे म्हणता येईल.