सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले जातील. संतुलित आहार, सक्रिय लाईफस्टाईल आणि योग्य मानसिक आरोग्य या गोष्टी उत्तम सेक्स लाईफसाठी आवश्यक असतात. पण काही ठराविक नैसर्गिक अन्नपदार्थ तुमची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत का?
लैंगिक सुख मिळवण्यासाठी एंडॉर्फिन हा घटक आवश्यक आहे. या घटकात निरोगी लैंगिक आयुष्यासाठी लागणारी आवश्यक तत्त्वं असतात. यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये कामेच्छा जागृत होते.
लैंगिक आरोग्य सुदृढ राहावं यासाठी इतिहासात आणि विज्ञानात यामागे काही उपाय दिले आहेत. पण आहारामुळे खरंच सेक्स लाईफ सुधारतं का याचा आढावा घेऊ.
लैंगिक क्षमतेसाठी कालवं किती उपयुक्त?
लव्ह लाईफ उत्तम राखण्यासाठी दररोज 50 कालवं नाश्त्यामध्ये खावी असं म्हटलं जातं, पण लैंगिक आरोग्य आणि कालवं यांचं काय नातं आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही.
पण ही अफवा नेमकी कुठून पसरली?
असं सांगितलं जातं, जेव्हा अफ्रोडाईट या प्रेमाच्या ग्रीक देवतेचा जन्म झाला, ती समुद्रातून वर आली होती. या देवतेच्या नावावरुनच अॅफ्रोडिजियाक हे नाव पडलं आहे. कामेच्छा जागृत करणाऱ्या अन्नाला अफ्रोडिजियाक म्हटलं जातं.
कालवांना अॅफ्रोडिजियाक म्हटलं जातं. कालवांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक आढळतं. शरीरात टेस्टोस्टेरोनची निर्मिती करण्यासाठी झिंकचा उपयोग होतो. संशोधनानुसार, झिंकमुळे वीर्याची गुणवत्ता वाढून प्रजननक्षमतेतही वाढ होते.
शेलफिश, रेड मिट, भोपळा, अंबाडी, तीळ, काजू, बदाम, चवळीच्या शेंगा, वाटाणे, मटकी, दूध आणि चीज या पदार्थांमध्येही झिंक मुबलक प्रमाणात आढळतं.
चॉकलेट तुम्हाला उत्तम प्रेमी बनवेल का?
जास्त चॉकलेट खात असल्यास प्रेमात पडण्याची शक्यता जास्त असते, असं म्हणतात. चॉकलेटमध्ये फिनाईलईथिलॅमाईन (पीईए) असतं. त्याला लव केमिकल असंही म्हटलं जातं. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर काही दिवसांत ते शरिरात तयार होऊ लागतं. पीईए मेंदूतील ठराविक भागात डोपामाईनचा पुरवठा करण्यास सुरूवात करतं.
चॉकलेटमध्ये पीईए अत्यंत कमी प्रमाणात आढळत असलं तरी ते खाल्यानंतरही सक्रिय राहतं किंवा नाही याबाबत शंका आहेत. तसंच रक्तप्रवाह वाढवण्यासाठी कोको उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं.
तर मग चॉकलेट आणि लैंगिक क्षमता यांचा संबंध कधीपासून आहे?
16 व्या शतकातील स्पॅनिश संशोधक हर्नेस कोर्टेस यांनी चॉकलेटचा शोध लावल्याचं सांगितलं जातं. कॉर्टेस यांनी किंग कार्लोस पहिले यांना एक पत्र लिहिलं होतं. दक्षिण अमेरिकेत प्यायलं जाणारं चॉकलेट शरीरात प्रतिकारशक्ती वाढवतं तसंच थकवा दूर करतं, असं निरीक्षण नोंदवल्याचा उल्लेख त्या पत्रात आहे.
दुर्दैवाने, स्पॅनिश लोकांनी सांगितलेल्या चॉकलेटच्या वैद्यकीय आणि औषधी गुणांना दक्षिण अमेरिकेतील लोकांनी स्वीकारलं नाही. त्यामुळे चॉकलेटच्या अफ्रोडायसिक उपयोगाबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
याशिवाय अंडी, चिकन, पालक, कडधान्य, भुईमुगाच्या शेंगा, आणि सोयापासून बनलेल्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफन चांगल्या प्रमाणात आढळतं.
मिरचीने लैंगिक आयुष्याला तडका?
मिरचीमध्ये कॅपसाईसिन आढळून येतं. अभ्यासानुसार, मिरचीच्या सेवनामुळे एंडॉर्फिन स्रवलं जातं. मिरचीमुळे चयापचय क्रिया योग्य प्रमाणात घडते. तसंच शारीरिक तापमान आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राखले जाते. पण मिरची खाल्यानंतर कोणतंही काम करण्याआधी हात धुवायला विसरू नका.
अल्कोहोलचा काय परिणाम?
अल्कोहोलमुळे लैंगिक भावना वाढतात, असं मानलं जातं. पण या अभ्यासात असं म्हटलं आहे की जरी अल्कोहोलमुळे लैंगिक भावना वाढत असल्या तरी त्यामुळे परफॉर्मन्सवर परिणाम होतो.
अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे पुरूष आणि स्त्री या दोघांमध्येही लैंगिक संवेदना कमी होतात. कालांतराने ही समस्या गंभीर होऊन त्यामुळे वंधत्वाची तक्रार पुढे येऊ शकते. त्यामुळे अल्कोहोलपासून दूर राहणंच योग्य राहील असं म्हटलं जातं.
लैंगिक ताठरतेमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या कसे रोखाल?
संशोधनानुसार, लैंगिक ताठरतेच्या समस्या रोखण्यासाठी फ्लॅव्होनाईट्स सेवन करणं आवश्यक आहे. अभ्यासानुसार ब्ल्यूबेरीमध्ये आढळणारं अॅन्थोसायनिन हे एक प्रकारचं फ्लॅव्होनाईड आहे.
तसंच इतर लिंबूवर्गीय फळांमध्ये ते आढळून येतं. फळांच्या सेवनामुळे लैंगिक समस्येत 14 टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊ शकते. फ्लॅव्होनाईडयुक्त आहाराचे सेवन तसेच व्यायाम यांच्या मदतीने ही समस्या 21 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारात फळांचा अधिक समावेश करायला हवा.
काही संशोधकांच्या मते, भूमध्य समुद्राच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या पद्धतीनुसार आहार घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. आहारात कडधान्य, फळे, भाज्या, हिरव्या शेंगा, भुईमूग आणि ऑलिव्ह ऑईल यांचा समावेश असावा.
तसंच चेरी, ब्लॅकबेरी, ब्लॅककरंट, क्रॅनबेरी, रसबेरी, द्राक्ष, ऑबरगेन आणि लाल पत्ताकोबी यांच्यात आढळणाऱ्या अँथोसायनिनचा उपयोग होऊ शकतो.
अॅफ्रोडिजियाक म्हणजे काय?
अफ्रोडाईट या नावावरून अफ्रोडिजियाक हे नाव प्रचलित झालं. त्यांची विभागणी तीन भागात होऊ शकते. ते म्हणजे, कामेच्छा जागृत करणारे, संभोगक्षम आणि लैंगिक सुखकारक. पण खरंच अफ्रोडिजियाकमुळे लैंगिक क्षमतेत वाढ होते की नाही हे वैज्ञानिकरीत्या सिद्ध होऊ शकलेलं नाही.
लैंगिक आरोग्याचे तज्ज्ञ असलेले डॉ. क्रिचमन सांगतात, अफ्रोडिजियाक आहार घेणाऱ्या व्यक्तींना फक्त ते काम करत असतील असा विश्वास असतो, म्हणून ते हा आहार घेतात. जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी उपयोगाची असेल, तर तिचा कशाप्रकारे उपयोग आहे याला महत्त्व नसते.
काही पदार्थ आरोग्यदायी आहेत. पण हा आहार घेतल्यानंतर शरीरावर त्याचे परिणाम कशाप्रकारे होतात, याची तपासणी करणंही गरजेचं आहे.
त्यामुळेच जर तुम्हाला तुमचा सेक्स ड्राईव्ह सुधारायचा असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच योग्य राहील. त्यामुळेच तुमच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी तुम्हाला समजतील.