रशियानं 36 देशांमध्ये एअरलाईन्सवर घातली बंदी

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (20:57 IST)
रशियानं 36 देशांच्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. ब्रिटन, स्पेन, इटली आणि कॅनडा या देशांचा या 36 देशांमध्ये समावेश असून, या देशांच्या एअरलाईन्सवर रशियानं बंदी घातलीय.
 
युरोपियन युनियनने त्यांच्या हवाई क्षेत्रात रशियाच्या विमानांना वाहतुकीस मनाई केल्यानंतर रशियानं हा निर्णय घेतला.
 
ब्रिटनने एअरोफ्लोट विमानांना त्यांच्या धरतीवर उतरण्यास मनाई केली होती. त्यानंतर उत्तरादाखल ब्रिटिश एअरलाईन्सवर रशियानं बंदी आणली.
 
व्हाईट हाऊसबाहेर पुतिन यांच्याविरोधात निदर्शनं
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनस्थित व्हाईट हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येत आंदोलक गोळा झाले असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात ते निदर्शनं करत आहेत.
 
यातील अनेक लोकांनी यु्क्रेनचा झेंडा हाती घेतला आहे आणि पुतिन यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.
 
अनेक लोक युक्रेनवासियांसाठी प्रार्थना करत असून, युक्रेनच्या समर्थनार्थ घोषणाही देत आहेत.
 
युक्रेनमधून आतापर्यंत 1400 भारतीय मायदेशी परतले
युक्रेनमधून आतापर्यंत 1400 भारतीयांना मायदेशात आणल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली.
 
बुखारेस्ट (रोमानिया) मधून चार विमानं आणि बुडापेस्ट (हंगेरी) मधून दोन विमानं भारतीयांना घेऊन मायदेशी आल्याची माहिती बागचींनी दिली.
 
युक्रेनच्या शेजारील चार देशांमध्ये विशेष दूत तैनात करण्याचा निर्णयही भारतानं घेतल्याची माहिती बागचींनी दिली.
 
युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना जवळील शहरात आश्रय घेण्यास सांगितलं गेलंय, तसंच तिथं भारताची पथकं व्यवस्था करत आहेत, घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण विमानं उपलब्ध करून दिली जातायेत, असंही बागची म्हणाले.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती