स्लीप डिव्होर्स: नाते टिकवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपणारे नवरा-बायको
रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (07:28 IST)
लग्नानंतर जोडपी एकाच खोलीत झोपतात आणि हे अगदी सर्वमान्य आहे. पण कोरोना महासाथीनंतर ही परिस्थिती बदलल्याचं चित्र आहे.
एका खोलीत एका पलंगावर झोपणारी जोडपी आता वेगवेगळ्या खोलीत झोपू लागली आहेत. यामागे बरीच कारणं आहेत, मात्र त्यातलं मुख्य कारण म्हणजे झोपेत घोरणं.
अनेकांना आपल्या जोडीदाराचं घोरणं असह्य वाटतं. यापैकीच एक आहे सेसिलिया (नाव बदललेलं आहे).
तिच्या पतीने घोरू नये म्हणून ती त्याला अनेकदा झोपेतून जागं करते. तो घोरणं थांबवेल असं तिला वाटतं.
पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरतात.
35 वर्षांची सेसिलिया सांगते, हे आता सहन करण्यापलीकडे गेलंय. यातून तिने एक मार्ग काढलाय. त्यानुसार ते दोघेही एका खोलीत झोपणार नाहीत असं ठरलंय.
सेसिलिया बीबीसीशी बोलताना सांगते, "मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. दिवसभर थकवा जाणवतो. दोन-तीन रात्री सहन करायला हरकत नाही. पण, आयुष्यभर हे सहन करणं तुम्हाला परवडणार नसतं."
ती पुढे सांगते, "तो सोपा निर्णय नव्हता. यामुळे आमचं मन नक्कीच दुःखी झालंय. पण जेव्हा आपण शांत झोपतो तेव्हा खूप आनंद होतो, जो सांगण्या पलीकडचा आहे."
सेसिलिया आणि तिचा 43 वर्षीय जोडीदार दोघेही 'स्लीप डिव्होर्स' नावाच्या प्रक्रियेचे पालन करत आहेत.
आता स्लीप डिव्होर्स हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल पण हे खरं आहे.
अमेरिकेच्या मॅक्लीन रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ स्टेफनी कॉलियर सांगतात, "स्लीप डिव्होर्स म्हणजे झोपण्यासाठी वेगळं होणं. या जोडप्यांना शांत झोपायाचं असतं त्यामुळे ते वेगवेगळं झोपतात."
स्टेफनी सांगतात, "हा ट्रेंड नक्कीच लोकप्रिय होईल. मागच्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड आणखीन वेगाने वाढू लागलाय. बऱ्याचदा लोक घोरतात कारण त्यांना आरोग्याच्या समस्या असतात. कधीकधी लोक झोपेत चालतात, सतत लघवीला जातात, झोपेत हालचाल करतात. यामुळे त्यांच्या जोडीदाराला त्रास होतो."
फॅशन आणि ब्युटी पॉडकास्ट 'लिपस्टिक ऑन द रिम' वर बोलताना प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री कॅमेरॉन डियाज म्हणते की, ती आणि तिचा पती वेगवेगळ्या खोलीत झोपतात.
स्वतंत्र खोली असणं सामान्य असलं पाहिजे असं कॅमेरॉन डियाजला वाटतं.
कॅमेरॉन डियाज सांगते की, याबाबत तिला सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया आल्या. यानंतर माध्यमांमध्येही अनेक बातम्या आल्या.
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने (एएएसएम) 2023 मध्ये एक अभ्यास केला होता. या अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांनी असं म्हटलं होतं की, कधीकधी वेगवेगळ्या खोलीत झोपणं चांगल्या झोपेसाठी आवश्यक असतं.
अभ्यासातून असं दिसून आलंय की, हा ट्रेंड हजारो वर्षांमध्ये वाढताना दिसतोय.
अभ्यासात सहभाग घेतलेल्यांपैकी 43 टक्के लोक त्यांच्या जोडीदारापासून वेगळे झोपतात.
अभ्यासात असंही दिसून आलंय की, इतर वयोगटातील, म्हणजे 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेल्या पिढीतील 33 टक्के, 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीतील 28 टक्के आणि 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेल्यांपैकी 22 टक्के लोक स्वतंत्र खोलीत झोपतात.
स्टेफनी कॉलियर सांगतात की, "यामागचं नेमकं कारण सांगता येत नाही, मात्र आपण याकडे एक सांस्कृतिक बदल म्हणून बघू शकतो."
इतिहासकार म्हणतात की, पूर्वीच्या काळी जोडपी वेगवेगळ्या खोलीत झोपत असत. आणि हे सामान्य होतं. नंतर ही पद्धत हळूहळू बदलत गेली.
काही इतिहासकार सांगतात की "मॅट्रिमोनिअल बेड म्हणजेच दोघांना झोपण्यासाठीचा पलंग ही एक प्रगत व्यवस्था आहे. औद्योगिक क्रांतीनंतर लोक अधिक दाट लोकवस्तीच्या भागात राहायला गेले तेव्हा ही पद्धत रूढ झाली."
19 व्या शतकापूर्वी, विवाहित जोडप्यांनी वेगवेगळ्या खोलीत झोपणं सामान्य होतं.
कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ चिलीच्या वैद्यकीय शाळेतील निद्राविज्ञानी पाब्लो ब्रॉकमन सांगतात की, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असते तेव्हा हे शक्य असतं.
याचे फायदे काय?
वेगवेगळ्या खोलीत झोपण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि तज्ञांनी देखील हे मान्य केलंय.
गाढ झोप लागणं हा मुख्य फायदा आहे. कॉलियर सांगता की, माणसाला दीर्घायुष्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे.
त्या स्पष्ट करतात की, "एखादी व्यक्ती नीट झोपत नसेल, तर त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून त्याच्या अवयवांच्या कार्यप्रणालीपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. तसेच या व्यक्तींचा संयम संपतो आणि त्यांना लवकर राग येऊ लागतो. अशा व्यक्ती उदास असतात."
मानसोपचारतज्ञांच्या मते, 'स्लीप डिव्होर्स'मुळे जोडीदारासोबत नातं निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
कॉलियर म्हणतात की, "जी जोडपी नीट झोपत नाहीत त्यांच्यात मोठे वाद होण्याची शक्यता असते. ते अनेकदा चिडचिड करतात. मात्र काही लोक जेव्हा एकटे झोपतात तेव्हा त्यांची झोप चांगली होते आणि गोष्टीही चांगल्या राहतात."
एएएसएमच्या प्रवक्त्या आणि पल्मोनोलॉजिस्ट सीमा खोसला यांनीही ही गोष्ट मान्य केलीय.
त्या सांगतात, "झोप नीट झाली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या मूडवर होती. ज्यांना नीट झोप येत नाही त्यांचे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता असते. झोपेच्या व्यत्ययामुळे त्यांच्या नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो."
एएएसएमने देखील "स्लीप डिव्होर्स" या विषयावर आपला अभ्यास सुरू केलाय.
"आरोग्य आणि आनंदासाठी चांगली झोप आवश्यक आहे. काही जोडपे निरोगी, आनंदी जीवनासाठी वेगवेगळं झोपण्याचा मार्ग निवडतात आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही."
सेसिलिया सांगते की, वेगळं झोपायला लागल्यापासून त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आलेत.
ती पुढे सांगते की, "एकटं झोपणं खूप आरामदायी असतं. मला चांगली झोप येते हे खरं आहे, शिवाय पलंगावर मोकळी जागा असते. कोणाला तरी त्रास होईल या भीतीशिवाय मी पलंगावर कसंही झोपू शकते."
"तुमचा जोडीदार उठल्यावर तुम्हाला उठण्याची गरज नसते. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही उठू शकता.''
वेगळ्या खोलीत झोपल्यास काय समस्या येतात?
बऱ्याच लोकांसमोरील मुख्य समस्या म्हणजे त्यांना वेगवेगळं झोपण्यासाठी अतिरिक्त पलंग किंवा अतिरिक्त खोलीची आवश्यकता असते. आणि बऱ्याचदा या अतिरिक्त गोष्टी उपलब्ध होत नाहीत.
पण या निर्णयाचे काही नकारात्मक परिणाम देखील होतात.
तज्ञ इशारा देतात की, यामुळे जोडप्यांमधील जवळीक कमी होऊ शकते.
सेसिलिया सांगते, "यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. पण मला या गोष्टी तितक्याशा गंभीर वाटत नाहीत. माझ्या मते, याचे फायदेच जास्त आहेत."
जे लोक पूर्णवेळ काम करतात त्यांच्यासाठी जोडीदारासोबत झोपण्याची वेळ मौल्यवान असते, असं डॉ. कॉलियर म्हणतात.
डॉ. ब्रॉकमन म्हणतात, "स्लीप डिव्होर्स"चा उपाय सगळ्यांसाठीच काम करतो असं नाही.
जोडपी एकत्र झोपतात तेव्हा काही फायदे देखील होतात असं त्यांनी सांगितलं.
सोमनोलॉजिस्ट म्हणतात की, जे लोक वर्षानुवर्षे एकत्र झोपतात त्यांना आपल्या जोडीदाराची सवय लागते. आणि त्यांच्या झोपेची गुणवत्ता वाढते.
जेव्हा जोडपी "स्लीप डिव्होर्स घेण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वांचं देखील पालन केलं पाहिजे.
डॉ. कोलियर म्हणतात, "काही लोकांना एकटं झोपायची सवय नसते. या मुद्द्यावर दोघांनी समान सहमती घेऊन मगच निर्णय घ्यावा."
"घोरणे, झोपेत चालणे अशा समस्या असणाऱ्या लोकांसाठी काही गोष्टी कठीण असू शकतात. पण बऱ्याच लोकांना वेगवेगळं झोपायला आवडत नाही. सामान्यपणे, पुरुषांना असं झोपण्यात फारसा रस नसतो."