डॉक्टरच्या कारनं चिरडलं, पोलिसांना कळवलं महिला 'बेशुद्ध' पडलीय, मुंबईतल्या या घटनेत आतापर्यंत काय घडलंय?
मंगळवार, 28 मे 2024 (09:28 IST)
"अगर आप भुखे हो और वो भी भुखी है, तो वो पहले आपका पेट भरेगी. खुदका नहीं सोचेगी. ऐसी थी वो."
भावनाविवश होत 31 वर्षीय शेहनवाज त्याच्या आईबद्दल सांगत होता. त्याचं हे वाक्य पूर्ण होतंय न होतंय, तोच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो रडू लागला.
शेहनवाजची आई रुबैदा शेख यांचं मुंबईतल्या सायन रुग्णालयाच्या आवारात चारचाकी गाडी अंगावरून गेल्यानं मृत्यू झाला. रुबैदा शेख 60 वर्षांच्या होत्या.
शुक्रवारी (24 मे) मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात हा भयंकर प्रकार घडला.
रुबैदा शेख यांच्या अंगावरून गाडी नेल्याप्रकरणी सायन रुग्णालयाच्या फाॅरेन्सिक विभागाचे प्रमुख डाॅ. राजेश डेरे यांना अटक करण्यात आली. मात्र, काही तासांतच त्यांची जामिनावर सुटका झाली.
या घटनेचा पूर्ण घटनाक्रम नीट पाहिल्यास, काही प्रश्न उपस्थित होतात आणि रुबैदा यांचा मुलगा शेहनवाज यानेही ते प्रश्न उपस्थित केले आहेत.
या संपूर्ण घटनेचा आढावा आणि घटनेवर उपस्थित होणारे प्रश्न आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.
अंगावरून चारचाकी गाडी गेल्यानं रुबैदा शेख यांना सायन रुग्णालयातच दाखल करण्यात आलं. मात्र, सुरुवातीला पोलिसांना कळवताना महिला 'बेशुद्ध' असल्याचं कळवण्यात आलं. पोलिसांनीच बीबीसी मराठीशी बोलताना हा दावा केला.
नेमकं काय घडलं?
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या रुबैदा शेख यांना मधूमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतरची पट्टी बदलण्यासाठी त्या शुक्रवारी (24 मे) सायन रुग्णालयात गेल्या होत्या.
रात्री उशीर झाल्याने त्या नातेवाईकांकडे थांबणार होत्या. पण कदाचित त्या थकल्या असतील किंवा त्यांना चक्कर येत असावी म्हणून त्या हाॅस्पिटलबाहेर थांबल्या असाव्या, असं त्यांचा मुलगा शेहनवाज सांगतो.
मात्र, रुग्णालयात उपचार करण्यासाठी, बरं होण्यासाठी आलेल्या रुबैदा यांनी कधी कल्पनाही केली नसावी की त्यांचा मृत्यू रुग्णालयातच अशाप्रकारे होईल!
शुक्रवारी (24 मे) संध्याकाळी साधारण सात वाजता डाॅ. राजेश डेरे हाॅस्पिटलच्या आवारातील निवासी इमारतीतून बाहेर येत होते. ते पंचीग मशीनकडे जात होते. तिथेच गेट क्रमांक सातजवळील महिलेला त्यांनी पाहिले आणि कारखाली चिरडले, असा आरोप त्यांच्यावर आहे.
रुग्णालयातून समोर आलेल्या सीसीटीव्हीमधील दृश्यांनुसार, रुबैदा या रुग्णालय परिसरात खाली आडव्या पडल्या होत्या. समोरून एक कार आली आणि त्यांना त्या कारने चिरडलं.
या घटनेनंतर काही लोक जमले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात सायन पोलिसांनी घटनेवेळी कार चालवत असलेले डॉ. राजेश डेरे यांच्या विरोधात आयपीसी कलम 304 (अ), 279 आणि 177 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे, भरधाव वेगाने गाडी चालवणे आणि खोटी माहिती देणे या कलमांचा समावेश आहे.
डॉ. राजेश डेरे हे मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. कोव्हिड काळात मुंबईतील बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचे ते प्रमुख होते.
महिला 'बेशुद्ध' पडल्याचं पोलिसांना कळवलं?
24 मे रोजी संध्याकाळी साधारण 7.30 वाजता सायन रुग्णालयाच्या परिसरात एका कारने महिलेला चिरडल्यानंतर, सायन पोलिसांना ते कळवण्यासाठी संपर्क करण्यात आलं. मात्र, ही माहिती पोलिसांना सुमारे रात्री 11 वाजता देण्यात आली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला महिला बेशुद्ध आहे असं सांगितलं. आमचं पोलीस पथक रुग्णालयात पोहचलं. त्या महिलेच्या अंगावरील जखमा पाहून पोलिसांना संशय आला. तिकडे रुग्णालय कॅम्पसमध्ये चौकशी केली. त्यावेळी आम्हाला कळाले की कारने अपघात झाला आहे. त्यानंतर आम्ही तपास सुरू केला."
ते पुढे सांगतात,"आम्ही सीसीटीव्हीसाठी विचारणा केली. त्याचा अॅक्सेस तिथल्या लोकांकडे नव्हता. नवीन सीसीटीव्ही होतं.आता रक्त तपासणीसाठी दिलेलं आहे. एफआयरनंतरच तपास सुरू होतो. अपघाताच्या केसमध्ये वारस असेल तर पोलीस चौकीत रिपोर्ट होतो. बेवारस असेल तर दुसरीकडे रिपोर्ट जातो. सायकल मेसेंजर असतो त्याच्या माध्यमातून रिपोर्ट जातो. नाईटला सायकल मेसेंजर नव्हता."
रुबैदा शेख यांचा मुलगा शेहनवाज शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "सायन पोलिसांना रात्री 11 वाजता इपीआर प्राप्त झाला. (इमर्जन्सी पोलीस रजिस्टर) महिला बेशुद्ध असल्याची आणि पायाला दुखापत असल्याची माहिती दिली गेली. रात्रीचे भरारी पथक त्याठिकाणी पाठवले. कुटुंबाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही.
"जखमी महिलेला प्रथमदर्शनी पाहता आम्हाला अपघात झाल्याचा संशय आला. चौकशीनंतर काळलं की वैद्यकीय अधिकाऱ्याच्या काळ्या रंगाच्या कारने महिलेचा अपघात झालेला आहे. महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
हा संपूर्ण घटनाक्रम पाहता, यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत :
अपघात झाल्यानंतर पोलिसांना कळवण्यात रुग्णालयाकडून एवढा विलंब का झाला?
पोलिसांना कळवताना अपघाताची माहिती न देता 'संबंधित महिला बेशुद्ध पडली आहे' एवढीच माहिती का देण्यात आली?
कार चालक डाॅ. राजेश डेरे यांची वैद्यकीय तपासणी किंवा रक्त चाचणी एवढ्या उशिराने का करण्यात आली?
या प्रश्नांची उत्तरं अद्याप पोलीस, रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेनेही स्पष्ट केलेली नाहीत.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अद्याप रुग्णालय किंवा डाॅक्टरांनी कारवाईबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पोलीस तपास करत आहेत. या तपासातून काय माहिती समोर येते ते पाहू."
'आम्हाला न्याय तरी मिळणार का?'
रुबैदा यांच्या मागे पती, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा शेहनवाज शेख डिलिव्हरी बाॅयचे काम करतो.
60 वर्षीय रुबैदा शेख यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर एप्रिल महिन्यापासून सायन रुग्णालयात उपचार सुरू होते.
शेहनवाज शेख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मला रात्री 2:45 वाजता पोलिसांचा फोन आला. मी दिवसभर थकल्याने झोपलो होतो. त्यामुळे फोन उचलला नाही. मी पहाटे फोन पाहिले. त्यांनी सांगितलं की तुमच्या आईला रुग्णालयात भरती केलं आहे. नंतर सांगितलं की, तुमच्या आईचं निधन झालं आहे."
हे सांगताना शेहनवाज यांना पुन्हा रडू कोसळलं.
डाॅ. राजेश डेरे यांना रविवारी (26 मे) जामीन मिळाला. परंतु शेहनवाज शेख यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शेहनवाज म्हणतात, "रविवारच्या दिवशी डाॅक्टरला जामीनही मिळाला. डाॅक्टर विरोधात काहीतरी कारवाई केली पाहिजे. त्यांना शिक्षा व्हावी. त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे. व्हीडिओमध्ये दिसत आहे की त्यांना माहिती होतं तिथे महिला झोपली आहे तरी त्यांनी गाडी चालवली,"
डाॅ. डेरे यांची रक्त तपासणी खूप उशिराने केली जात असल्याप्रकरणीही शेहनवाज यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
शेहनवाज म्हणाले, "आमच्यासोबत न्याय होणार नाही का? कार चालवली त्याच दिवशी डाॅक्टरांची वैद्यकीय तपासणी व्हायला हवी होती. रक्त तपासणी व्हायला पाहिजे होती. दारू प्यायली असेल तर 24 तासांनंतर आता कसं कळणार? रुग्णालयाकडून विलंब केला गेलाय."
सेंट जाॅर्ज रुग्णालयाचे वरिष्ठ डाॅक्टर सिद्धार्थ गायकवाड सांगतात, "शरीरातील दारू किंवा दारूचं प्रमाण तपासण्यासाठी दारू प्यायल्याच्या पहिल्या 8 ते 12 तासात किंवा जास्तीत जास्त 24 तासांत रक्त तपासणी होणं गरजेचं असतं. तसे न झाल्यास रिपोर्टमध्ये दारूचे प्रमाण कमी होत जाते."
एकूणच या घटनेचा तपास कसा होता आणि उपस्थित प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधतात का, हे पाहावं लागेल.
आई रुबैदाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याला शिक्षा होईल का, अशा निरुत्तर प्रश्नाशी शेहनवाज आणि त्यांचे कुटुंबीय झगडतायेत.