नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार : अजित पवार

शनिवार, 15 जुलै 2023 (21:40 IST)
नाशिकमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने आलेल्या अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतूक केले. त्यांचा सारखा नेता भारतात दुसरा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सोबतच आगामी काळात होणाऱ्या एनडीएच्या बैठक आपण सहभागी राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीदरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
 
यावेळी राज्यात अजून पुरेसा पाऊस नाही, ही चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे. पदभार स्विकारल्यानंतर मी अर्थ आणि इतर विभागांचाही आढावा घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
शुक्रवारी रात्री अचानक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हरओक बंगल्यावर गेले. यावर अधिक माहिती देतांना अजित पवार म्हणाले, “काकींचं शुक्रवारी एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच ऑपरेशन झाल्या झाल्या त्यांना भेटायला जायचं होतं. मात्र, उशीर झाला. कारण खातेवाटप जाहीर झालं, मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्याने विधानसभा अध्यक्षांनाही भेटायचं होतं.”
 
माझं काम संपवल्यावर मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही आता सिल्व्हर ओककडे निघालो आहोत. तू तुझं काम झाल्यावर सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी वर्षानुवर्षांचं नातं आहे. आपण परिवाराला महत्त्व देतो ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच मी गेलो, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
 
आमच्या आजीआजोबांनी आम्हा पवार कुटुंबियांना ही परंपरा शिकवली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकी यांनी शिकवली. म्हणून मी काकींना भेटायला गेलो होतो. मी अर्धा तास तिथं होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली, खुशाली विचारली. त्यांना २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं की, तिथं गेलं पाहिजे आणि मी तिथं गेलो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती