आफ्रिकेतून आणलेल्या सातव्या चित्त्याचा मृत्यू, हे आहे कारण
बुधवार, 12 जुलै 2023 (20:14 IST)
गेल्या वर्षी आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात ठेवण्यात आले होते. पण यापैकी काही चित्त्यांचा एकामागून एक मृत्यू होत असल्याने खळबळ माजली आहे.
मंगळवारी या अभयारण्यात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यातील मृत्युमुखी पडलेला हा सातवा चित्ता आहे.
कुनो अभयारण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भांडणामुळे या चित्त्याचा मृत्यू झाला असावा.
मंगळवारी दगावलेल्या या चित्त्याचं नाव तेजस असून हा नर चित्ता जखमी अवस्थेत सापडला होता.
भारताने 1952 मध्ये चित्ते नामशेष झाल्याचं घोषित केलं होतं. त्यावेळेस देशामध्ये एकही जिवंत चित्ता शिल्लक नव्हता.
पण या प्रजातीचं पुनरुत्थान करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग म्हणून त्यांना गेल्या वर्षी भारतात आणण्यात आलं.
सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियामधून आठ चित्ते आणल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते कुनोमध्ये आणले होते.
यापैकी तीन चित्त्यांचा गेल्या दोन महिन्यांत मृत्यू झाला आहे. मे महिन्यात नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्यांनी जन्माला घातलेल्या 4 बछड्यांपैकी 3 जण दगावले होते.
सर्व चित्ते बछडे हे नाजूक आणि कमी वजनाचे होते. त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाल्याचं कुनो येथील वन अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. तर प्रौढ चित्ते हे किडनी निकामी होऊन, वीण जखमा होऊन दगावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी प्रसिध्दी करत चित्ते आणल्याचं देशवासीयांना सांगितलं होतं. काही वन्यजीव तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केलं असलं तरी काहींनी संभाव्य धोके आणि मोठ्या मांसाहारी जनावराच्या शिकारीवरून इशारेही दिले होते.
मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चित्त्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करताना केंद्र सरकारला या चित्त्यांना लवकरात लवकर इतर पर्यायी ठिकाणी हलवण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास सांगितलं होतं.
भारतामध्ये चित्त्यांचं मोठं प्रतीकात्मक महत्त्व आहे कारण अनेक लोककथांमध्ये त्यांचा संदर्भ आढळतो. पण या प्राण्याची होत असलेली शिकार, अधिवासाच्या आणि भक्ष्याच्या कमतरतेमुळे 1947 नंतर भारतातून चित्ते नामशेष व्हायला सुरुवात झाली.