सत्ता ही जनतेच्या उपयोगासाठी असायला पाहिजे. सत्तेचा वापर लोकाभिमुख कामे आणि विकासासाठी व्हायला पाहिजे,पक्ष,संघटना सत्तेत असूनही जर विकास होत नसेल तर वेगळा विचार करणे गरजेचे असते.गेल्या महिनाभरापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी,हालचाली घडत आहेत.त्यातूनच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले असून माझ्यासह राज्यातील बारा खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन दिले आहे .आमचा संघर्ष सत्तेसाठी नसून नाशिकच्या विकासासाठी असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे .
भाजपा— सेना ही खरी नैसर्गिक युती आहे . या दोन्ही पक्षाचा हिंदुत्वाचा विचार असून गेल्या पंचवीस वर्षांपासून दोन्ही पक्षांची युती आहे . नैसर्गिक युती तोडत अडीच वर्षांपूर्वी शिवसेना ,राष्ट्रवादी , कॉंग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी सत्तेत आली.महाविकास आघाडी सर्वसामान्यांच्या कधीच पचनी पडत नव्हती. सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस सेनेवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करत होती.एकनाथ शिंदे यांनी वेळीच आमदारांच्या मनातील भावना ओळखून बंड केले . अन्यथा राष्ट्रवादीने सेनेला संपवून सत्ता हातात घेतली असती हे वास्तव सत्य खासदार गोडसे यांनी समर्थकासमोर ठेवले. रोज सकाळी माध्यमांसमोर येत वाचाळगिरी केल्यामुळे अनेक नेते,आमदार दुखवल्या गेल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे स्पष्ट करत खा. गोडसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपशी युती करावी.केंद्रात भाजपचे सरकार असून भाजप – युती झाल्यास राज्याच्या विकासाला निश्चितच वेग येईल अशी आग्रही मागणी राज्यातील खासदारांच्या गटाने काही दिवसांपूर्वीच पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी केल्याचे खा.गोडसे यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार गोडसे यांनी आठ वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा उपस्थित समर्थकांसमोर ठेवला.
नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेलाईन,बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी सिपेट,द्वारका – दत्तमंदिर उडडाणपुल,निओ मेट्रो, वाहतुकीच्या कोंडीवर मात करण्यासाठी बाहय रिंगरोड,दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर , अंजनेरी- ब्रम्हगिरी रोप –वे,गांधीनगर प्रेसचे अत्याधुनिकरण, दमणगंगा व देवनदी हे नदीजोड योजना हे शहरासाठी महत्वाचे प्रकल्प असून या प्रकल्पांना मंजुरी,मान्यता मिळालेली आहे.येत्या चार महिन्यात वरील प्रस्तावित प्रकल्पांचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचा विश्वास खा . गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला.मेळाव्यास नाशिक लोकसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.