राज ठाकरे यांनी शरद पवारांवरच टीकेची तोफ का डागली?
सोमवार, 2 मे 2022 (16:02 IST)
"शरद पवार हे दोन समाजात दुही माजवतायत" "शरद पवार हे नास्तिक आहेत. मी सांगायची गरज नाही, त्यांची कन्याच हे लोकसभेत बोलली आहे."
"शरद पवार यांच्यामुळेच बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धापकाळात त्रास सहन करावा लागला."
काल (1 मे) औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. एका बाजूला मुंबईत झालेल्या बूस्टर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली तर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली.
एका बाजूला फडणवीसांची सभा संपली आणि त्याच वेळी राज ठाकरे हे मंचावर जात होते, हा योगायोग निश्चितच असू शकत नाही असे देखील अनेकांना वाटते.
राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका का केली, जर राज ठाकरे यांच्या दृष्टीने भोंग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तर तो प्रशासकीय पातळीवरचा असताना त्या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांचा सातत्याने उल्लेख का केला हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, "शरद पवार म्हणाले हे दोन समाजात दुही माजवतायत, आपण जे जातीत भेद तयार करताय त्यानेच दुही माजतेय."
राज ठाकरे पुढे म्हणाले होते, "शरद पवार यांनी शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेतलं नव्हतं. मी सभेत म्हटल्यावर ते नाव घेऊ लागले. शरद पवार नास्तिक आहेत म्हटल्यावरही त्यांना लागलं, झोंबलं. आपली कन्या लोकसभेत माझे वडील नास्तिक आहेत असं बोललीय. यावर मी काय पुरावा देऊ. मी माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. ती पुस्तकं शरद पवार यांनी नीट वाचावीत. माझे आजोबा धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवणारे होते, भटभिक्षुकीला विरोध करणारे होते."
राज ठाकरे म्हणाले, "बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. केवळ ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्रास दिला गेला. मी कधीही जात पाहून व्यक्तीकडे जात नाही. जात पाहून वाचत नाही. रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांच्याकडे काय ब्राह्मण म्हणून पाहाणार काय? लोकमान्यांनी आपल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा ठेवलं. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत. हे सत्तेत असताना जेम्स लेनला कधी आणलं नाही." असं सांगून राज ठाकरे यांनी इंडिया टुडेच्या मुलाखतीचा काही भाग लोकांना पडद्यावर दाखवला होता.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर का टीका केली?
राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका का केली हा प्रश्न आम्ही तज्ज्ञांना विचारला. शरद पवार यांच्यावर टीका करण्याची अनेक कारणं असू शकतात त्यात मुख्य हे आहे की शरद पवार यांना राज्यातील महाविकासआघाडीचे प्रमुखच समजतात हे देखील असू शकतं असं तज्ज्ञांना वाटतं.
त्याच बरोबर 2019 मध्ये शरद पवार हे राज यांच्या जवळ होते पण नंतर शरद पवार उद्धव यांच्यासोबत गेले या गोष्टीचाही आकस राज यांच्या मनात असू शकतो असं देखील तज्ज्ञ म्हणत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात की, "राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 2019 मध्ये एक जवळीक पाहायला मिळाली होती. राज यांनी शरद पवारांची मुलाखत देखील घेतली होती. त्यात त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला कोण जवळचं आहे राज की उद्धव त्यावर पवार म्हणाले होते ठाकरे कुटुंबीय. पण शरद पवार हे नंतर उद्धव यांच्यासोबत गेले."
"शरद पवार यांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी उद्धव यांच्याशी हात मिळवला होता. ही राजकीय गोष्ट होती. पण कदाचित राज यांनी ही पर्सनली देखील घेतली असावी," असं चोरमारे यांना वाटतं.
"2019 वेळी शरद पवार यांची प्रतिमा एक लढवय्या नेता अशी बनली होती. इतक्या वयातही ते उन-पावसाचा विचार न करता पक्षाचा प्रचार करत होते, या प्रतिमेला छेद द्यावा असा देखील एक विचार असू शकतो.
"बाबासाहेब पुरंदरेंवर शरद पवारांनी केलेली टीका ही राज ठाकरेंना आवडलेलं नाही. कारण बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत त्यांच्या मनात नितांत आदर आहे. तेव्हा थेट त्यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तीवरच राज यांनी हा निशाणा साधला आहे," असं चोरमारे सांगतात.
राज ठाकरे आणि फडणवीसांची खेळी?
"राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून गेम करत आहेत," असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं.
राज आणि देवेंद्र हे दोघेही एकच भाषा बोलत आहे असं अनेकांना वाटत आहे आणि किशोरी पेडणेकरांनी नेमके यावरच बोट ठेवल्याचे दिसत आहे.
राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिकेचा अंगीकार केला, हनुमान चालिसा, योगी आदित्यनाथ यांची स्तुती यावरून त्यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवलाय हे देखील म्हटले जात आहे. राज ठाकरे आणि महाराष्ट्र भाजप एकत्र आहेत किंवा एकत्र होण्याची चिन्हं दिसत आहे का असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "एकाने उद्धव यांच्यावर टीका करायची तर दुसऱ्याने शरद पवार यांच्यावर. हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार असू शकतो. शरद पवार यांना जातीयवादी म्हणायचे त्याचबरोबर सर्व हिंदूंना एकाच छत्राखाली आणायचे हा मोदींचाच फॉर्म्युला ते वापरताना दिसत आहे. एका अर्थाने संभ्रम निर्माण करण्याची ही खेळी असू शकते."
"राष्ट्रवादीने ठामपणे भाजपविरोधात भूमिका घेतली आहे. ते आता भाजपकडे जाणारच नाहीत अशी अवस्था आहे. त्यावेळी एकाने या बाजूने हल्ला करायचा आणि दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने हल्ला करुन संभ्रम निर्माण करायचा ही स्ट्रॅटेजी असू शकते. महाआरती, भोंग्यांचा मुद्दा आणि समान नागरिक कायदा या गोष्टींवर भाजप आणि मनसे एक आहेत हे देखील लक्षात येते," असं देसाई यांना वाटतं.