भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? : आव्हाड

सोमवार, 2 मे 2022 (14:54 IST)
भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? असा सवाल राज्याचे गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना केला आहे. आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही आव्हाड यांनी ठाण्यात रविवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना केल्या.
 
भोंग्यांच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, “आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? पण, आपणाला मृगजळात अडकविण्यात आलेले आहे. एकवर्षापूर्वी कोविडमुळे अनेकजण रुग्णालयात होते. अनेकांची प्रेतांवर कोणी अंत्यसंस्कार केले, नातेवाईकांनाही कळले नाही. जे रुग्णालयात राहिले; त्यांची देखभाल कोणी केली? रुग्णांना प्लाझ्मा कोणी दिला? आपण रेमडेसीवर वाटताना जात-धर्म पाहिला नव्हता. पण, आज एक वर्षानंतर कोविडमध्ये माणुसकी दाखविणारा समाज अचानक माणुसकी विसरतो आणि एकमेकांच्या जीवावर उठायला तयार होतो? कारण काय भोंगे? इतका भरकटणारा आपला समाज आहे का? आपणाला बुद्धी नाही काय? तेव्हा एकमेकांच्या मदतीला सर्वजण धावायचे. हाच जातीपातीच्या पलिकडचा महाराष्ट्र धर्म आहे.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती