केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर केला जातोय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूरमध्ये नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचे भाषण केले, त्याच पद्धतीचे भाषण राज ठाकरेंनी केले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपने हे सर्व सुरू केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंसारख्या लोकांचा वापर करून धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या भुमिकेमुळे राज्यातील जनता भाजपला माफ करणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर राज ठाकरेंनी चार तारखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. परंतु त्यासाठी शासन सक्षम आहे आणि राज्य सरकार योग्य ती कारवाई नक्की करेल, असं पटोले म्हणाले.